ईयोब ५:१-२७

  • अलीफजचं पहिलं भाषण पुढे सुरू (१-२७)

    • देव बुद्धिमानांना त्यांच्याच चलाखीत पकडतो (१३)

    • ईयोबने देवाची शिकवण नाकारू नये (१७)

 जरा हाक मारून पाहा! कोणी उत्तर देतं का? पवित्र जनांपैकी* तू कोणाला मदत मागशील?  २  कारण मूर्खाच्या रागामुळे त्याच्यावर मृत्यू ओढवतो,आणि भोळ्याच्या मनातला हेवा त्याचा जीव घेतो.  ३  मी मूर्खाची भरभराट होताना पाहिली आहे,पण अचानक त्याच्या घराला शाप लागतो.  ४  त्याच्या मुलांना संरक्षण मिळत नाही;शहराच्या फाटकांजवळ त्यांना चिरडलं जातं,+ पण कोणीही त्यांना वाचवत नाही.  ५  त्याने कापणी केलेलं पीक उपाशी माणूस खातो,तो काट्या-कुसळांतूनही धान्य काढून नेतो,आणि त्यांची संपत्ती बळकावली जाते.  ६  कारण संकटं काही धुळीतून उगवत नाहीत,आणि विपत्ती काही जमिनीतून निघत नाही.  ७  आगीतून ठिणग्या वर उडणारच,तसंच, माणसाच्या जीवनात संकटं ही येणारच.  ८  पण मी तर देवाकडे याचना केली असती,मी माझा वाद देवासमोर ठेवला असता.  ९  तो महान आणि गूढ गोष्टी घडवून आणतो,त्याची अद्‌भुत कार्यं मोजण्यापलीकडे आहेत. १०  तो पृथ्वीवर पाऊस पाडतोआणि शेतांना पाणी पुरवतो. ११  तो गरिबाला वर आणतो,तो निराश झालेल्याचं तारण करतो. १२  तो धूर्त लोकांचे कट हाणून पाडतो,तो त्यांचे प्रयत्न यशस्वी होऊ देत नाही. १३  तो बुद्धिमानांना त्यांच्याच चलाखीत पकडतो,+त्यामुळे त्या धूर्तांचे बेत निष्फळ होतात. १४  दिवसाढवळ्या त्यांना अंधार वेढतो,आणि भर दुपारी ते रात्र असल्याप्रमाणे चाचपडतात. १५  तो गरिबांना बलवानांच्या हातून सोडवतो,ज्यांच्या तोंडात तलवार आहे, त्यांच्यापासून तो त्यांचं रक्षण करतो. १६  म्हणून दीनदुबळ्यांना आशा आहे,पण दुष्टांचं तोंड बंद होतं. १७  पाहा! देव ज्याला ताडन देतो तो सुखी आहे;म्हणून सर्वशक्‍तिमान देवाची शिकवण कधीही नाकारू नकोस! १८  कारण तो जखम करतो, पण तिला पट्टीही बांधतो;तो घाव करतो, पण आपल्याच हातांनी बरंही करतो. १९  तो तुला सहा संकटांपासून वाचवेल,आणि सातव्यानेही तुला काही नुकसान होणार नाही. २०  तो तुला दुष्काळात मृत्यूपासून;आणि युद्धात तलवारीच्या धारेपासून सोडवेल. २१  तू जिभेच्या तडाख्यापासून सुरक्षित राहशील,+आणि विनाश येईल तेव्हा तुला त्याची भीती वाटणार नाही. २२  तू विध्वंसाला आणि उपासमारीला हसशील,आणि पृथ्वीवरच्या हिंस्र प्राण्यांना तू भिणार नाहीस. २३  शेतातले दगडगोटे तुला इजा करणार नाहीत,*आणि रानातले जंगली पशू तुझ्याशी प्रेमाने वागतील. २४  तुझा तंबू सुरक्षित आहे याची तुला खातरी असेल,तू आपल्या कुरणाची* पाहणी करशील,तेव्हा कळपातला एकही प्राणी कमी झालेला नसेल. २५  तुला पुष्कळ मुलंबाळं होतील,जमिनीतून उगवणाऱ्‍या गवतासारखे तुझे भरपूर वंशज होतील. २६  कापणीच्या वेळी गोळा केल्या जाणाऱ्‍या धान्याच्या पेंढ्यांसारखा,तू कबरेत जाईपर्यंत सुदृढ असशील. २७  पाहा! आम्ही या गोष्टी पारखल्या आहेत आणि त्या खऱ्‍या आहेत. म्हणून तू ऐक आणि त्या मान्य कर.”

तळटीपा

हे कदाचित स्वर्गदूतांना सूचित करत असावं.
किंवा “शेतातल्या दगडगोट्यांचा तुझ्याशी करार (ठराव) असेल.”
किंवा “गुरं चारण्याच्या जमिनीची.”