ईयोब ६:१-३०
६ मग ईयोबने उत्तर दिलं:
२ “जर कोणी माझ्या दुःखाचं+ वजन करून पाहिलं;माझं संकट तराजूत तोलून पाहिलं,
३ तर ते समुद्रातल्या वाळूपेक्षाही जड असेल.
म्हणून मी वेड्या माणसासारखा बडबडलो.*+
४ कारण सर्वशक्तिमान देवाचे बाण माझ्या शरीरात रुतले आहेत,त्यांचं विष माझ्या सगळ्या शरीरात पसरत आहे;+देवाकडून आलेल्या संकटांनी माझ्यावर आक्रमण केलं आहे.
५ रानगाढवाला+ गवत मिळालं तर ते कशाला ओरडेल?
किंवा बैलाला चारा मिळाला तर तो कशासाठी हंबरडा फोडेल?
६ बेचव अन्न मीठ न घालता कोण खाईल?
किंवा चव नसलेला झाडाचा रस कोण आवडीने पिईल?
७ मी अशा गोष्टींना हातही लावत नाही.
त्या मला नासलेल्या अन्नासारख्या वाटतात.
८ देवाने माझी विनंती मान्य केली असतीआणि माझी इच्छा पूर्ण केली असती,तर किती बरं झालं असतं!
९ देवाने मला चिरडून टाकलं असतं,आणि त्याचा हात पुढे करून मला मारून टाकलं असतं,तर किती बरं झालं असतं!+
१० कारण त्यामुळे माझी दुःखातून सुटका झाली असती;भयंकर वेदना होऊनही मी आनंदाने मृत्यूला कवटाळलं असतं,कारण पवित्र देवाचे+ शब्द मी कधीही नाकारले नाहीत.
११ आणखी वाट पाहण्याची ताकद मी कुठून आणू?+
आता माझ्यासाठी उरलंच काय आहे, की मी आणखी जगू?
१२ मी काय दगडाचा बनलोय?
की, माझं शरीर तांब्याचं आहे?
१३ मी अगदी असाहाय्य झालोय.
मला अगदी निराधार करून टाकण्यात आलंय.
१४ जो आपल्या मित्राला एकनिष्ठ प्रेम दाखवत नाही+
तो सर्वशक्तिमान देवाचं भय मानण्याचं सोडून देतो.+
१५ माझे स्वतःचे भाऊ* हिवाळ्यातल्या ओढ्यासारखे धोकेबाज+ निघाले आहेत,हिवाळ्यातल्या कोरड्या पडणाऱ्या ओढ्यांसारखे ते आहेत.
१६ वितळणाऱ्या बर्फामुळे आणि हिमामुळे,ते ओढे गढूळ झाले आहेत.
१७ पण काही काळाने ते कोरडे पडतात आणि नाहीसे होतात;उष्णता वाढल्यावर ते सुकून जातात.
१८ ते वळसे घेत वाहत राहतात;वाळवंटात वाहत जाऊन ते दिसेनासे होतात.
१९ तेमावरून+ येणारे काफिले त्यांचा शोध घेतात;शबाचे+ प्रवासी* त्यांची वाट पाहतात.
२० त्यांच्यावर विनाकारण भरवसा ठेवल्यामुळे त्यांची फजिती होते;तिथे येऊन फक्त निराशा त्यांच्या पदरी पडते.
२१ तुम्हीही माझ्याशी असंच वागला आहात;+माझ्यावर आलेलं भयंकर संकट पाहून तुम्ही घाबरून गेला.+
२२ ‘मला अमुक द्या,’ असं मी तुम्हाला म्हणालो का?
किंवा तुमच्या दौलतीतून मला काही भेट देण्याची विनंती केली का?
२३ तुम्ही एखाद्या शत्रूपासून माझं संरक्षण करावं;किंवा जुलूम करणाऱ्यांपासून मला वाचवावं,* अशी मी अपेक्षा केली का?
२४ मी काय केलंय ते सांगा, मी शांतपणे तुमचं ऐकीन;+माझं काय चुकलं हे मला समजावून सांगा.
२५ प्रामाणिक शब्द मनावर घाव करत नाहीत!+
पण तुमच्या ताडनाचा काय फायदा?+
२६ तुम्ही मला शब्दांत पकडण्याच्या प्रयत्नात आहात का?
हे तर वाऱ्यासोबत विरून जाणारे; एका असाहाय्य माणसाचे बोल आहेत.+
२७ तुम्ही तर एखाद्या अनाथावरही चिठ्ठ्या टाकाल,+आणि आपल्याच मित्राचा सौदा कराल!*+
२८ म्हणून आता माझ्याकडे निरखून पाहा.
मी तुमच्या तोंडावर खोटं कसं बोलीन?
२९ कृपा करून पुन्हा विचार करा; मला विनाकारण दोषी ठरवू नका.
हो, पुन्हा विचार करा, कारण मी अजूनही नीतिमान आहे.
३० मी खोटं बोलतोय का?
काही चुकीचं असतं, तर माझ्या जिभेला ते जाणवलं नसतं का?
तळटीपा
^ किंवा “विचार न करता, बेपर्वाईने बोललो.”
^ किंवा “मित्र.”
^ किंवा “शबाई लोकांचा काफिला.”
^ शब्दशः “सोडवावं.”
^ किंवा “विकून टाकाल.”