ईयोब ७:१-२१

  • ईयोबचं उत्तर पुढे सुरू (१-२१)

    • जीवन सक्‍तीच्या मजुरीसारखं आहे (१, २)

    • “तू मला आपलं निशाण का बनवलं आहेस?” (२०)

 पृथ्वीवर माणसाचं जीवन सक्‍तीच्या मजुरीपेक्षा काय वेगळं आहे? त्याचं आयुष्य मजुरासारखंच नाही का?+  २  गुलामासारखा तो सावलीची आस धरतो,मजुरासारखा आपल्या मजुरीची वाट पाहतो.+  ३  तसंच, मलाही व्यर्थतेचे कित्येक महिने नेमून देण्यात आले आहेत. आणि दुःखाच्या कित्येक रात्री मला मोजून देण्यात आल्या आहेत.+  ४  मी बिछान्यावर पडतो, तेव्हा मला वाटतं, ‘मी कधी उठेन?’+ रात्र सरत जाते, तसा मी पहाटेपर्यंत बेचैन होऊन कूस बदलत राहतो.  ५  माझं शरीर किड्यांनी भरलंय; घाणीने माखलंय,+माझ्या त्वचेवर खपल्या आहेत आणि त्यांतून पू निघतोय.+  ६  माझं आयुष्य विणकराच्या यंत्रापेक्षाही वेगाने सरत चाललंय,+ते आशेविनाच संपणार आहे.+  ७  माझं जीवन म्हणजे नुसती वाफ आहे;+मला पुन्हा कधीही आनंदाचे दिवस दिसणार नाहीत,* हे विसरू नकोस.*  ८  आज जे मला पाहतात, त्यांना मी पुन्हा दिसणार नाही;तुझी नजर मला शोधेल, पण मी नसेन.+  ९  विरळ होत होत नाहीशा होणाऱ्‍या ढगासारखा,कबरेत* जाणारा पुन्हा वर येत नाही.+ १०  तो पुन्हा आपल्या घरी परतणार नाही,त्याच्या ठिकाणचे लोक त्याला विसरून जातील.+ ११  म्हणूनच मी माझं तोंड आवरणार नाही. माझ्या मनातली व्याकूळता मी बोलून दाखवीन;माझ्या भयानक दुःखाची मी तक्रार करीन!+ १२  मी काय समुद्र किंवा समुद्रातला महाकाय प्राणी आहे,की तू माझ्यावर पहारा ठेवावास? १३  ‘मला माझ्या पलंगावर विश्रांती मिळेल;माझ्या बिछान्यावर माझं दुःख थोडं कमी होईल,’ असा जेव्हा मी विचार करतो, १४  तेव्हा तू मला स्वप्नं दाखवून घाबरवतोसआणि दृष्टान्त दाखवून भयभीत करतोस. १५  त्यामुळे, गुदमरून मरावं असं मला वाटतं,या शरीरापेक्षा* मृत्यू परवडला असं मला वाटतं.+ १६  मला माझ्या जीवनाचा वीट आलाय;+ मला आता आणखी जगायचं नाही. मला सोडून दे, कारण माझे दिवस श्‍वासासारखे आहेत.+ १७  नाशवंत मानव आहे तरी काय, की तू त्याच्याबद्दल विचार करावा,किंवा त्याच्याकडे लक्ष द्यावं?*+ १८  तू दररोज सकाळी त्याला का तपासतोस? क्षणोक्षणी त्याची परीक्षा का घेतोस?+ १९  तू क्षणभरही माझ्यावरून तुझी नजर हटवणार नाहीस का? आवंढा* गिळण्याचीही मला संधी देणार नाहीस का?+ २०  मानवांवर नजर ठेवणाऱ्‍या देवा,+ मी पाप केलं असलं,तरी मी तुझं काय नुकसान करू शकतो? तू मला आपलं निशाण का बनवलं आहेस? तुला माझं ओझं झालंय का? २१  तू माझ्या अपराधाची क्षमा का करत नाहीस? माझी चूक माफ का करत नाहीस? कारण लवकरच मी धुळीत पडेन,+तू मला शोधशील, पण मी नसेन.”

तळटीपा

शब्दशः “चांगलं काही दिसणार नाही.”
इथे ईयोब देवाशी बोलत आहे असं दिसतं.
हिब्रू भाषेत “शिओल.”  शब्दार्थसूची पाहा.
शब्दशः “माझ्या हाडांपेक्षा.”
शब्दशः “तुझं हृदय लावावं?”
किंवा “थुंकी.”