उत्पत्ती १३:१-१८

  • अब्राम कनानला परत येतो (१-४)

  • अब्राम आणि लोट वेगळे होतात (५-१३)

  • देव अब्रामला दिलेल्या वचनाची आठवण करून देतो (१४-१८)

१३  मग अब्राम इजिप्तमधून त्याच्या बायकोला आणि त्याच्याकडे जे काही होतं ते सर्व घेऊन नेगेबला+ गेला. लोटही त्याच्यासोबत होता. २  अब्रामकडे खूप सोनं, चांदी आणि गुरंढोरं होती.+ ३  तो नेगेबपासून जागोजागी मुक्काम करत बेथेलच्या दिशेने निघाला. तो बेथेल आणि आयच्या+ मध्ये येऊन पोहोचला. त्याच ठिकाणी त्याने आधी तंबू ठोकला होता ४  आणि तिथेच त्याने वेदीही बांधली होती. त्या ठिकाणी त्याने यहोवाच्या नावाने प्रार्थना केली. ५  अब्रामसोबत प्रवास करणाऱ्‍या लोटकडेही मेंढरं, गुरंढोरं आणि तंबू होते. ६  म्हणून त्यांना एकाच ठिकाणी राहण्यासाठी जमीन कमी पडू लागली; त्यांची मालमत्ता इतकी वाढली होती, की त्यांना एकत्र राहणं शक्य नव्हतं. ७  यामुळे अब्रामच्या आणि लोटच्या मेंढपाळांमध्ये भांडण झालं. (त्या काळात कनानी आणि परिज्जी लोक त्या प्रदेशात राहत होते.)+ ८  तेव्हा अब्राम लोटला+ म्हणाला: “हे बघ, आपण दोघं भाऊ आहोत. म्हणून तुझ्यामध्ये व माझ्यामध्ये आणि तुझ्या मेंढपाळांमध्ये व माझ्या मेंढपाळांमध्ये भांडण व्हायला नको. ९  तेव्हा तू माझ्यापासून वेगळा हो आणि या प्रदेशाचा हवा तो भाग निवड. जर तू डावीकडे गेलास, तर मी उजवीकडे जाईन. आणि जर तू उजवीकडे गेलास, तर मी डावीकडे जाईन.” १०  तेव्हा लोटने आपली नजर सगळीकडे फिरवली आणि पाहिलं, की यार्देनच्या+ आसपासच्या प्रदेशात भरपूर पाणी होतं. (यहोवाने सदोम आणि गमोराचा नाश करण्याआधी असं होतं.) हा प्रदेश सोअरपर्यंत,+ यहोवाच्या बागेसारखा*+ आणि इजिप्त देशासारखा होता. ११  तेव्हा लोटने यार्देनच्या आसपासचा प्रदेश स्वतःसाठी निवडला आणि आपला तंबू पूर्वेकडे हलवला. अशा रितीने अब्राम आणि लोट एकमेकांपासून वेगळे झाले. १२  अब्राम कनान देशात राहायचा, पण लोट यार्देन प्रदेशातल्या शहरांमध्ये राहायचा.+ शेवटी लोटने सदोमजवळ आपला तंबू ठोकला. १३  सदोमचे लोक दुष्ट होते आणि यहोवाविरुद्ध घोर पापं करायचे.+ १४  लोट अब्रामपासून वेगळा झाल्यावर यहोवा अब्रामला म्हणाला: “तू ज्या ठिकाणी आहेस तिथून आपली नजर सगळीकडे फिरव आणि उत्तरेपासून दक्षिणेकडे व पूर्वेपासून पश्‍चिमेकडे बघ. १५  कारण जो देश तू पाहत आहेस, तो मी तुला आणि तुझ्या संततीला* कायमचा देईन.+ १६  आणि मी तुझी संतती* पृथ्वीवरच्या धुळीच्या कणांइतकी करीन. जर कोणाला पृथ्वीवरच्या धुळीचे कण मोजता आले, तर त्यांना तुझी संततीही* मोजता येईल.+ १७  तेव्हा ऊठ आणि जा, या संपूर्ण देशात फीर, कारण मी तो तुला देणार आहे.” १८  मग अब्राम वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन तंबूंमध्ये राहिला. काही काळाने तो हेब्रोनमध्ये+ मम्रे+ इथल्या मोठ्या झाडांजवळ राहू लागला. तिथे त्याने यहोवासाठी एक वेदी बांधली.+

तळटीपा

म्हणजे, एदेन बागेसारखा.
शब्दशः “बीज.”
शब्दशः “बीज.”
शब्दशः “बीज.”