उत्पत्ती १९:१-३८
१९ संध्याकाळपर्यंत ते दोन स्वर्गदूत सदोमला पोहोचले, तेव्हा लोट शहराच्या फाटकाजवळ बसला होता. लोटने त्यांना पाहिलं, तेव्हा तो त्यांना भेटायला उठला आणि त्याने जमिनीवर डोकं टेकवून त्यांना नमस्कार केला.+
२ तो त्यांना म्हणाला: “माझ्या प्रभूंनो, कृपा करून आज रात्री या दासाच्या घरी येऊन मुक्काम करा आणि मला तुमचे पाय धुऊ द्या. हवं तर पहाटेच तुम्ही आपल्या प्रवासाला निघू शकता.” यावर ते म्हणाले: “नाही, आम्ही चौकातच रात्र काढू.”
३ पण त्याने इतका आग्रह केला की शेवटी ते त्याच्या घरी गेले. मग त्याने त्यांच्यासाठी मेजवानी केली आणि बेखमीर* भाकरी बनवल्या आणि ते जेवले.
४ ते झोपणार, इतक्यात सदोम शहराच्या माणसांनी त्या घराला घेरलं. तरुण मुलांपासून म्हाताऱ्यांपर्यंत शहरातले सर्व पुरुष तिथे जमले.
५ ते लोटला हाका मारून म्हणू लागले: “तुझ्या घरी मुक्कामाला आलेली माणसं कुठे आहेत? त्यांना बाहेर आण. आम्हाला त्यांच्याशी संभोग करायचा आहे.”*+
६ मग लोट त्यांच्याकडे बाहेर गेला आणि त्याने आपल्यामागे दार लावून घेतलं.
७ तो म्हणाला: “माझ्या भावांनो, कृपा करून असा दुष्टपणा करू नका.
८ बघा, मला दोन मुली आहेत आणि त्या अजून कुमारी आहेत. मी त्यांना बाहेर तुमच्याकडे आणतो. तुम्हाला त्यांच्यासोबत जे योग्य वाटेल ते करा. पण कृपा करून या माणसांना काही करू नका, कारण त्यांनी माझ्या घरी आश्रय घेतला आहे.”*+
९ तेव्हा ते म्हणाले: “हो बाजूला!” मग ते म्हणाले: “हा परदेशी इथे राहायला आला आणि याची हिंमत तर पाहा, आपला न्याय करायला निघालाय! आता आम्ही तुझे त्यांच्यापेक्षाही वाईट हाल करू.” मग ते लोटला धक्काबुक्की करू लागले आणि दार तोडायला पुढे आले.
१० तेव्हा घरातल्या त्या दोन माणसांनी हात बाहेर काढून लोटला घरात घेतलं आणि दार बंद केलं.
११ मग घराच्या दाराजवळ जमलेल्या लहानमोठ्या सर्व माणसांना त्यांनी आंधळं करून टाकलं आणि त्यामुळे ती माणसं दार शोधताशोधता थकून गेली.
१२ तेव्हा ती दोन माणसं लोटला म्हणाली: “इथे तुझे कोणी नातेवाईक आहेत का? तुझे जावई, मुलं, मुली आणि शहरातल्या तुझ्या सर्व माणसांना इथून बाहेर काढ!
१३ आम्ही या शहराचा नाश करणार आहोत, कारण यहोवासमोर यांच्याविरुद्धची तक्रार खूप वाढली आहे,+ आणि म्हणून यहोवाने आम्हाला या शहराचा नाश करायला पाठवलं आहे.”
१४ तेव्हा लोट बाहेर गेला आणि त्याच्या मुलींची लग्नं ज्यांच्याशी ठरली होती, त्या आपल्या जावयांना म्हणू लागला: “चला लवकर! या शहरातून बाहेर निघा कारण यहोवा या शहराचा नाश करणार आहे!” पण त्याच्या जावयांना वाटलं की तो मस्करी करत आहे.+
१५ पहाट होत आली तेव्हा स्वर्गदूत घाई करत लोटला म्हणाले: “चल लवकर! आपल्या बायकोला आणि दोन मुलींना घेऊन इथून निघ, म्हणजे या दुष्ट शहरासोबत तुझा नाश होणार नाही!”+
१६ तो उशीर करू लागला, तेव्हा यहोवाची त्याच्यावर दया असल्यामुळे+ त्या माणसांनी त्याचा, त्याच्या बायकोचा आणि मुलींचा हात धरून त्यांना शहराबाहेर आणून उभं केलं.+
१७ ते शहराच्या बाहेर येताच स्वर्गदूतांपैकी एक जण म्हणाला: “आपला जीव वाचवण्यासाठी पळून जा. मागे वळून पाहू नका+ आणि या भागात कुठेही थांबू नका!+ डोंगरांकडे पळून जा म्हणजे तुमचा नाश होणार नाही.”
१८ पण लोट त्यांना म्हणाला: “यहोवा, कृपा करून मला तिथे जायला सांगू नकोस.
१९ तू आपल्या या दासावर कृपा केली आहेस आणि मला जिवंत ठेवून खूप दया* दाखवली आहेस.+ पण मला डोंगरांकडे पळून जाता येणार नाही, कारण तिथे पोहोचण्याआधीच माझ्यावर संकट येऊन मी मरून जाईन अशी मला भीती वाटते.+
२० जवळच एक नगर आहे, मी तिथे पळून जाऊ शकतो. ते नगर लहान आहे. मी तिथे गेलो तर चालेल का? त्या लहानशा नगरात गेलो तर माझा जीव वाचेल.”
२१ तेव्हा तो त्याला म्हणाला: “ठीक आहे. मी तुझी विनंती मान्य करतो+ आणि तू म्हणतोस त्या नगराचा मी नाश करणार नाही.+
२२ चल लवकर! इथून निघ. कारण तू तिथे पोहोचेपर्यंत मी काही करू शकत नाही.”+ म्हणून त्या नगराचं नाव सोअर*+ पडलं.
२३ लोट सोअरला पोहोचला तोपर्यंत सकाळ झाली होती.
२४ मग यहोवाने सदोम आणि गमोरा शहरांवर गंधकाचा आणि आगीचा वर्षाव केला. तो वर्षाव आकाशातून, यहोवाकडून झाला.+
२५ अशा रितीने त्याने त्या शहरांचा, खरंतर त्या संपूर्ण भागाचा आणि तिथल्या सगळ्या लोकांचा आणि झाडांचाही नाश केला.+
२६ लोटची बायको त्याच्या मागे चालत होती. तिने मागे वळून पाहिलं, तेव्हा ती मिठाचा खांब बनली.+
२७ अब्राहाम पहाटेच उठून, ज्या ठिकाणी तो यहोवासमोर उभा होता तिथे गेला.+
२८ त्याने खाली सदोम आणि गमोराच्या दिशेने पाहिलं, तेव्हा त्या संपूर्ण भागाचं भयानक दृश्य त्याला दिसलं! भट्टीतून निघतो तसा धूर तिथून निघत होता.+
२९ अशा प्रकारे देवाने त्या शहरांचा नाश केला, तेव्हा त्याने तिथे राहणाऱ्या लोटला बाहेर पाठवून+ अब्राहामची आठवण ठेवली.
३० नंतर लोट आपल्या दोन मुलींना घेऊन डोंगराळ भागात राहायला गेला,+ कारण त्याला सोअरमध्ये+ राहायची भीती वाटत होती. तो आपल्या मुलींसोबत एका गुहेत राहू लागला.
३१ नंतर त्याची मोठी मुलगी आपल्या धाकट्या बहिणीला म्हणाली: “आपल्या वडिलांचं वय झालं आहे आणि जगाच्या रीतीप्रमाणे आपल्याशी लग्न करण्यासाठी कोणीही पुरुष नाही.
३२ म्हणून चल, आपण आपल्या वडिलांना द्राक्षारस पाजू आणि त्यांचा वंश टिकवून ठेवण्यासाठी त्यांच्याशी संबंध ठेवू.”
३३ म्हणून त्या रात्री त्यांनी आपल्या वडिलांना खूप द्राक्षारस पाजला; मग मोठी मुलगी आपल्या वडिलांजवळ जाऊन झोपली. पण ती केव्हा झोपली आणि केव्हा उठून गेली हे त्याला कळलं नाही.
३४ दुसऱ्या दिवशी मोठी मुलगी धाकटीला म्हणाली: “मी काल रात्री आपल्या वडिलांजवळ झोपले होते. आज रात्रीही आपण त्यांना द्राक्षारस पाजू. मग तू त्यांच्याजवळ जाऊन झोप, म्हणजे आपल्या वडिलांचा वंश टिकून राहील.”
३५ म्हणून त्या रात्रीही त्यांनी आपल्या वडिलांना खूप द्राक्षारस पाजला; मग धाकटी मुलगी आपल्या वडिलांजवळ जाऊन झोपली. पण ती केव्हा झोपली आणि केव्हा उठून गेली हे त्याला कळलं नाही.
३६ अशा रितीने, लोटच्या दोन्ही मुली आपल्या वडिलांपासून गरोदर राहिल्या.
३७ मोठ्या मुलीला एक मुलगा झाला आणि तिने त्याचं नाव मवाब+ ठेवलं. तो आजच्या मवाबी लोकांचा मूळपुरुष आहे.+
३८ धाकटीलाही मुलगा झाला आणि तिने त्याचं नाव बेनअम्मी ठेवलं. तो आजच्या अम्मोनी लोकांचा+ मूळपुरुष आहे.
तळटीपा
^ शब्दार्थसूची पाहा.
^ किंवा “त्यांच्याशी संबंध ठेवायचा आहे.”
^ किंवा “संरक्षणासाठी आले आहेत.” शब्दशः “छाया.”
^ किंवा “एकनिष्ठ प्रेम.”
^ म्हणजे, “लहान.”