उत्पत्ती २०:१-१८

  • अबीमलेखपासून साराची सुटका (१-१८)

२०  अब्राहामने आपला मुक्काम हलवला+ आणि तो नेगेब देशात गेला. तो कादेश+ आणि शूर+ यांच्या मध्ये असलेल्या एका ठिकाणी राहू लागला.* अब्राहाम गरारमध्ये+ राहत होता तेव्हा, २  त्याने पुन्हा आपली बायको सारा हिच्याबद्दल म्हटलं: “ही माझी बहीण आहे.”+ तेव्हा गरारचा राजा अबीमलेख याने आपल्या माणसांना पाठवून साराला आपल्याकडे आणलं.+ ३  नंतर, देव अबीमलेखला रात्री स्वप्नात येऊन म्हणाला: “तू या स्त्रीला आणून स्वतःवर मृत्यू ओढवून घेतला आहेस.+ कारण तिचं लग्न झालेलं आहे आणि ती दुसऱ्‍या माणसाची बायको आहे.”+ ४  पण अबीमलेख अजून तिच्या जवळ गेला नव्हता.* म्हणून तो म्हणाला: “यहोवा, तू खरंच एका निर्दोष* राष्ट्राचा नाश करणार आहेस का? ५  ‘ती माझी बहीण आहे’ असं तोच म्हणाला नव्हता का, आणि ‘तो माझा भाऊ आहे’ असं तीही म्हणाली नव्हती का? माझं मन साफ आहे आणि मी निर्दोष आहे.” ६  तेव्हा स्वप्नात खरा देव त्याला म्हणाला: “तू हे साफ मनाने केलंस हे मला माहीत आहे. म्हणूनच मी तुला माझ्याविरुद्ध पाप करण्यापासून अडवलं आणि तिला हात लावू दिला नाही. ७  आता त्या माणसाची बायको त्याला परत कर, कारण तो एक संदेष्टा आहे.+ तो तुझ्यासाठी याचना करेल+ आणि तू जिवंत राहशील. पण जर तू तिला परत केलं नाहीस, तर लक्षात ठेव, तू आणि तुझे सर्व लोक नक्की मरतील.” ८  अबीमलेखने पहाटेच उठून आपल्या सगळ्या सेवकांना बोलावलं आणि त्यांना या सर्व गोष्टी सांगितल्या. हे ऐकून ते खूप घाबरले. ९  तेव्हा अबीमलेख अब्राहामला बोलावून म्हणाला: “तू आमच्यासोबत असं का केलंस? मी तुझ्याविरुद्ध कोणतं पाप केलं होतं, की तू माझ्यावर आणि माझ्या राज्यावर इतकं मोठं संकट आणणार होतास? तू जे केलंस ते योग्य नाही.” १०  अबीमलेख अब्राहामला पुढे म्हणाला: “तू कोणत्या उद्देशाने हे केलंस?”+ ११  अब्राहाम म्हणाला: “मी विचार केला, की ‘इथे कोणालाही देवाची भीती नाही आणि माझ्या बायकोमुळे हे लोक मला मारून टाकतील.’+ १२  आणि तसं पाहिलं तर ती माझी बहीणच आहे, कारण ती माझ्या वडिलांची मुलगी आहे, पण माझ्या आईची नाही आणि मी तिच्याशी लग्न केलं.+ १३  त्यामुळे देवाच्या सांगण्यावरून जेव्हा मी माझ्या वडिलांचं घर सोडून+ ठिकठिकाणी प्रवास करू लागलो, तेव्हा मी तिला म्हणालो: ‘आपण जिथेजिथे जाऊ तिथेतिथे, “हा माझा भाऊ आहे”+ असं सांगून तू माझ्याबद्दल एकनिष्ठ प्रेम दाखव.’” १४  मग अबीमलेखने अब्राहामला त्याची बायको परत केली. तसंच, त्याने त्याला मेंढरं, गुरंढोरं आणि दास व दासीही दिल्या. १५  शिवाय, तो अब्राहामला म्हणाला: “माझा सगळा देश तुझ्यासमोर आहे. तुला वाटेल तिथे तू राहू शकतोस.” १६  मग तो साराला म्हणाला: “बघ, मी तुझ्या भावाला+ १,००० चांदीचे तुकडे देत आहे. तुझ्यासोबत असलेल्यांसाठी आणि इतर सर्व लोकांसाठी, तू निर्दोष असल्याचं हे चिन्ह आहे. तू निष्कलंक आहेस.” १७  तेव्हा अब्राहामने खऱ्‍या देवाकडे याचना केली आणि देवाने अबीमलेख, त्याची बायको व त्याच्या दासींना बरं केलं आणि त्यांना मुलं होऊ लागली. १८  कारण यहोवाने अब्राहामची बायको सारा+ हिच्यामुळे, अबीमलेखच्या घरातल्या सर्व स्त्रियांना वांझ केलं होतं.*

तळटीपा

किंवा “विदेशी म्हणून राहू लागला.”
किंवा “नीतिमान.”
म्हणजे, त्याने तिच्याशी संबंध ठेवले नव्हते.
किंवा “अबीमलेखच्या घरातल्या सगळ्या स्त्रियांचं गर्भाशय बंद केलं होतं.”