उत्पत्ती ३१:१-५५

  • याकोब न सांगता कनानला जायला निघतो (१-१८)

  • लाबान याकोबला गाठतो (१९-३५)

  • याकोब लाबानशी करार करतो (३६-५५)

३१  काही काळानंतर, याकोबने लाबानच्या मुलांना असं बोलताना ऐकलं: “याकोबने आमच्या वडिलांचं सगळं काही घेतलं. त्यातूनच त्याने त्याची संपत्ती जमवली आहे.”+ २  लाबानकडे पाहिल्यावर याकोबला कळायचं, की आपल्याशी त्याचं वागणं पहिल्यासारखं राहिलं नव्हतं.+ ३  शेवटी यहोवा याकोबला म्हणाला: “तू आपल्या वडिलांच्या आणि नातेवाइकांच्या देशात परत जा+ आणि मी नेहमी तुझ्यासोबत राहीन.” ४  मग याकोबने राहेल आणि लेआ यांना मैदानात आपल्या कळपाजवळ येण्यासाठी निरोप पाठवला. ५  तो त्यांना म्हणाला: “मला असं दिसतंय की आता तुमचा पिता माझ्याशी पहिल्यासारखा वागत नाही.+ पण माझ्या वडिलांचा देव माझ्यासोबत आहे.+ ६  मी माझी सगळी ताकद लावून तुमच्या पित्याची सेवा केली,+ हे तुम्हाला चांगलं माहीत आहे. ७  पण त्याने मला फसवण्याचा प्रयत्न केला आणि माझी मजुरी दहा वेळा बदलली; तरी देवाने त्याला माझं काही नुकसान करू दिलं नाही. ८  जेव्हा तो म्हणायचा: ‘ठिपकेदार मेंढरं ही तुझी मजुरी असेल,’ तेव्हा सगळ्या कळपात ठिपकेदार मेंढरं जन्माला यायची. पण जेव्हा तो म्हणायचा: ‘चट्टेपट्टे असणारी मेंढरं ही तुझी मजुरी असेल,’ तेव्हा सगळ्या कळपात चट्टेपट्टे असणारी मेंढरं जन्माला यायची.+ ९  म्हणून देव तुमच्या वडिलांची मेंढरं घेऊन, ती मला देत राहिला. १०  एकदा जेव्हा कळपाची समागम करण्याची वेळ आली होती, तेव्हा मी स्वप्नात पाहिलं, की समागम करणारे बकरे चट्टेपट्टे असलेले, ठिपकेदार आणि रंगीत डाग असलेले होते.+ ११  तेव्हा खऱ्‍या देवाचा दूत मला स्वप्नात म्हणाला: ‘याकोब!’ त्यावर मी उत्तर दिलं, ‘मी इथे आहे.’ १२  तो पुढे म्हणाला, ‘जरा नजर वर करून बघ, समागम करणारे सगळे बकरे चट्टेपट्टे असलेले, ठिपकेदार आणि रंगीत डाग असलेले आहेत. कारण लाबानने तुझ्यासोबत जे काही केलं,+ ते मी पाहिलं आहे. १३  मी बेथेल+ इथला खरा देव आहे. तिथे तू स्मारक उभारून त्याचा अभिषेक केला होतास आणि शपथ घेतली होतीस.+ आता ऊठ आणि जिथे तुझा जन्म झाला त्या आपल्या देशात जायला नीघ.’”+ १४  तेव्हा राहेल आणि लेआ त्याला म्हणाल्या: “आमच्या वडिलांच्या घरात, आता आमच्या वारसाचा काही भाग उरला आहे का? १५  ते आम्हाला परकं समजतात, कारण ते आम्हाला विकून मिळालेल्या धनावर जगत आहेत.+ १६  देवाने आमच्या वडिलांकडून काढून घेतलेलं सगळं धन, आमचं आणि आमच्या मुलांचं आहे.+ तेव्हा देवाने तुम्हाला जसं सांगितलं आहे, त्याप्रमाणेच करा.”+ १७  मग याकोब उठला आणि त्याने आपल्या बायकामुलांना उंटांवर बसवलं.+ १८  त्याने पदन-अराम इथे जमवलेली सगळी गुरंढोरं आणि सगळी संपत्ती+ घेतली आणि तो आपला पिता इसहाक याच्या कनान देशात जायला निघाला.+ १९  लाबान आपल्या मेंढरांची लोकर कातरायला गेला होता, तेव्हा राहेलने त्याच्या कुलदैवतांच्या मूर्ती*+ चोरल्या.+ २०  इतकंच नाही तर याकोब, अरामी लाबानशी चलाखीने वागला, कारण आपण निघून जात आहोत हे त्याने त्याला सांगितलं नव्हतं. २१  मग त्याच्याकडे जे काही होतं ते सर्व घेऊन तो पळून गेला आणि त्याने नदी* पार केली.+ तिथून तो गिलादच्या डोंगराळ प्रदेशाकडे+ जायला निघाला. २२  याकोब पळून गेला आहे, ही गोष्ट लाबानला तिसऱ्‍या दिवशी कळली. २३  तेव्हा आपल्या भावांना* घेऊन तो याकोबचा पाठलाग करत निघाला आणि सात दिवस प्रवास करून त्याने त्याला गिलादच्या डोंगराळ प्रदेशात गाठलं. २४  मग त्या रात्री देव अरामी लाबानच्या+ स्वप्नात+ येऊन म्हणाला: “तू याकोबशी चांगलंवाईट जे काही बोलशील, ते सांभाळून बोल.”+ २५  याकोबने आपला तंबू गिलादच्या डोंगराळ भागात ठोकला होता आणि लाबाननेही आपल्या भावांसोबत जवळच तंबू ठोकला. मग तो याकोबला भेटायला गेला. २६  तेव्हा लाबान याकोबला म्हणाला: “तू हे काय केलंस? मला फसवून, माझ्या मुलींना युद्धातल्या कैद्यांसारखं का घेऊन आलास? २७  तू चोरासारखा का पळून आलास? मला का फसवलंस, काही सांगितलं का नाहीस? सांगितलं असतंस, तर मी तुला आनंदाने गाणी गात, डफ आणि वीणा वाजवत पाठवलं असतं. २८  तू मला माझ्या नातवांचं* आणि मुलींचं चुंबनही घेऊ दिलं नाहीस. तू मूर्खासारखा वागलास. २९  मला हवं तर मी तुझं बरंवाईट करू शकतो. पण तुझ्या वडिलांचा देव काल रात्री माझ्या स्वप्नात येऊन म्हणाला, ‘तू याकोबशी चांगलंवाईट जे काही बोलशील, ते सांभाळून बोल.’+ ३०  तुला तुझ्या वडिलांच्या घरी जाण्याची ओढ लागली होती, म्हणून तू निघालास. पण तू माझे देव का चोरलेस?”+ ३१  याकोबने लाबानला उत्तर दिलं: “कारण मी घाबरलो आणि मनात म्हणालो, ‘तू तुझ्या मुलींना माझ्याकडून जबरदस्तीने घेऊन जाशील.’ ३२  आता आपल्या भाऊबंदांसमोर माझ्या वस्तूंची झडती घे आणि जे काही तुझं असेल ते घे. तुझे देव तुला ज्याच्याकडे सापडतील तो जिवंत राहणार नाही.” पण राहेलने मूर्ती चोरल्या आहेत हे याकोबला माहीत नव्हतं. ३३  तेव्हा लाबान याकोबच्या तंबूमध्ये गेला. मग तो लेआच्या आणि दोन दासींच्या तंबूंमध्ये गेला,+ पण त्याला मूर्ती सापडल्या नाहीत. तो लेआच्या तंबूमधून बाहेर आल्यावर राहेलच्या तंबूमध्ये गेला. ३४  पण यादरम्यान, राहेलने कुलदैवतांच्या मूर्ती घेऊन त्या उंटाच्या खोगिरात* लपवल्या होत्या आणि ती त्यांच्यावर बसली होती. म्हणून लाबानने पूर्ण तंबूत शोधूनही त्याला त्या सापडल्या नाहीत. ३५  तेव्हा ती तिच्या वडिलांना म्हणाली: “प्रभू, माझ्यावर रागवू नका. माझी मासिक पाळी सुरू असल्यामुळे मी तुमच्यासमोर उठून उभी राहू शकत नाही.”+ मग लाबानने खूप शोधलं पण त्याला कुलदैवतांच्या मूर्ती सापडल्या नाहीत.+ ३६  यावर याकोब चिडला आणि लाबानला म्हणू लागला: “एखाद्या गुन्हेगारासारखा माझा पाठलाग का करत आहेस? मी कोणतं पाप केलंय? ३७  तू माझ्या सगळ्या गोष्टींची झडती घेतलीस, तेव्हा तुला तुझ्या घरचं काय सापडलं? जर काही सापडलं असेल, तर ते इथे आपल्या भाऊबंदांसमोर ठेव आणि त्यांना तुझ्यामाझ्यात न्याय करू दे. ३८  मी तुझ्यासोबत २० वर्षं होतो, तेव्हा कधीही तुझ्या मेंढ्यांचा व बकऱ्‍यांचा गर्भपात झाला नाही+ आणि मी कधीही तुझ्या कळपातले मेंढे खाल्ले नाहीत. ३९  जंगली प्राण्यांनी मारलेली गुरंढोरं+ मी कधीही तुला दाखवायला आणली नाहीत. मी स्वतः त्यांचं नुकसान सहन करायचो. गुरंढोरं दिवसा चोरीला गेली असोत किंवा रात्री, तू माझ्याकडून भरपाई मागायचास. ४०  मी दिवसा गरमीने आणि रात्री थंडीने बेजार व्हायचो आणि माझी झोप उडून जायची.+ ४१  मी १४ वर्षं तुझ्या मुलींसाठी आणि ६ वर्षं तुझ्या कळपासाठी, अशी २० वर्षं तुझ्या घरी तुझी सेवा केली. आणि तू दहा वेळा माझी मजुरी बदलत राहिलास.+ ४२  जर माझ्या वडिलांचा देव,+ अब्राहामचा देव आणि ज्या देवाचं इसहाक भय मानतो*+ तो माझ्यासोबत नसता, तर तू मला रिकाम्या हाताने पाठवलं असतंस. देवाने माझं दुःख आणि माझी मेहनत पाहिली आहे, म्हणून त्याने काल रात्री तुला ताकीद दिली.”+ ४३  तेव्हा लाबान याकोबला म्हणाला: “या मुली माझ्या मुली आहेत आणि ही मुलं माझी नातवंडं आहेत आणि हे कळप माझे कळप आहेत. जे काही तुझ्यासमोर आहे, ते माझं आणि माझ्या मुलींचं आहे. मी माझ्याच मुलींचं आणि नातवंडांचं नुकसान कसं करू शकतो? ४४  चल आता आपण दोघं आपसात एक करार करू. हा करार आपल्यामधला साक्षीदार असेल.” ४५  तेव्हा याकोबने एक दगड घेतला आणि तो स्मारक म्हणून ठेवला.+ ४६  त्यानंतर तो त्याच्या भाऊबंदांना म्हणाला: “दगड उचलून आणा.” त्यांनी दगड आणले आणि त्यांची रास बनवली. मग ते त्या दगडांच्या राशीजवळ जेवले. ४७  लाबानने त्या राशीला यगर-सहदूथा* असं नाव दिलं पण याकोबने तिला गालेद* म्हटलं. ४८  मग लाबान म्हणाला: “ही दगडांची रास आज आपल्यात साक्षीदार आहे.” म्हणून तिचं नाव गालेद+ ४९  आणि टेहळणी बुरूज असं पडलं. कारण तो म्हणाला: “आपण एकमेकांपासून दूर जाऊ, तेव्हा यहोवाचं तुझ्यामाझ्यावर लक्ष असू दे. ५०  जर तू माझ्या मुलींशी वाईट वागलास किंवा माझ्या मुलींशिवाय आणखीन बायका केल्यास, तर लक्षात ठेव, की जरी कोणी माणसाने हे पाहिलं नाही, तरी देव आपल्यात साक्षीदार असेल.” ५१  लाबान पुढे याकोबला म्हणाला: “ही दगडांची रास इथे आहे आणि हे स्मारक मी आपल्यामध्ये उभं केलं आहे. ५२  ही दगडांची रास साक्षीदार असेल आणि हे स्मारक साक्ष देईल,+ की ही रास ओलांडून मी तुझं बरंवाईट करायला येणार नाही आणि तूसुद्धा ही रास आणि हे स्मारक ओलांडून माझं बरंवाईट करायला येणार नाहीस. ५३  अब्राहामचा देव,+ नाहोरचा देव आणि त्यांच्या वडिलांचा देव तुझ्यामाझ्यामध्ये न्याय करो.” तेव्हा याकोबने त्याचा पिता इसहाक ज्या देवाचं भय मानायचा,*+ त्या देवाच्या नावाने शपथ घेतली. ५४  मग याकोबने डोंगरावर बलिदान अर्पण केलं आणि आपल्या भाऊबंदांना जेवायला बोलावलं. तेव्हा ते जेवले आणि त्यांनी रात्री डोंगरावरच मुक्काम केला. ५५  लाबान पहाटे उठला आणि त्याने आपल्या नातवंडांचं* आणि मुलींचं चुंबन घेऊन त्यांना आशीर्वाद दिला.+ मग तो आपल्या घरी परत गेला.+

तळटीपा

किंवा “तेराफीम मूर्ती.”
म्हणजे, “फरात.”
किंवा “नातेवाइकांना.”
शब्दशः “मुलं.”
अशा प्रकारच्या खोगिरांमध्ये वस्तू ठेवण्यासाठी जागा असायची.
शब्दशः “इसहाकचं भय.”
ॲरामेईक (अरामी) भाषेतला एक वाक्यांश, ज्याचा अर्थ “साक्षीदाराची रास” असा होतो.
एक हिब्रू वाक्यांश, ज्याचा अर्थ “साक्षीदाराची रास” असा होतो.
शब्दशः “त्याचा पिता इसहाक याच्या भयाने.”
शब्दशः “मुलं.”