उत्पत्ती ३३:१-२०

  • याकोब एसावला भेटतो (१-१६)

  • याकोब शखेमला प्रवास करतो (१७-२०)

३३  यानंतर, याकोबने समोर पाहिलं आणि त्याला एसाव ४०० माणसांसोबत येताना दिसला.+ तेव्हा त्याने लेआ, राहेल आणि त्याच्या दोन दासींकडे आपापली मुलं दिली.+ २  त्याने आपल्या दासींना आणि त्यांच्या मुलांना सर्वात पुढे ठेवलं.+ त्यांच्यामागे लेआला व तिच्या मुलांना+ आणि शेवटी राहेल+ व योसेफ यांना ठेवलं. ३  मग तो स्वतः त्यांच्यापुढे गेला आणि जेव्हा तो त्याच्या भावाजवळ आला, तेव्हा त्याने सात वेळा जमिनीवर डोकं टेकवून त्याला नमस्कार केला. ४  पण एसाव पळत त्याला भेटायला आला आणि त्याने त्याला मिठी मारून त्याचं चुंबन घेतलं आणि ते दोघं रडू लागले. ५  एसावने नजर वर करून पाहिलं, तेव्हा त्याला स्त्रिया आणि मुलं दिसली. त्याने विचारलं: “तुझ्यासोबत हे कोण आहेत?” त्यावर याकोब म्हणाला: “देवाने तुझ्या सेवकाला दिलेल्या आशीर्वादामुळे झालेली ही मुलं आहेत.”+ ६  तेव्हा दासी आपल्या मुलांना घेऊन पुढे आल्या आणि त्यांनी त्याला वाकून नमस्कार केला. ७  मग लेआही आपल्या मुलांना घेऊन पुढे आली आणि त्यांनी त्याला वाकून नमस्कार केला. त्यानंतर, योसेफ आणि राहेल पुढे आले आणि त्यांनीही त्याला वाकून नमस्कार केला.+ ८  एसाव म्हणाला: “मला जी माणसं आणि गुरंढोरं भेटली ती तू का पाठवलीस?”+ यावर याकोब म्हणाला: “माझ्या प्रभूची माझ्यावर कृपा व्हावी म्हणून.”+ ९  तेव्हा एसाव म्हणाला: “माझ्या भावा, माझ्याकडे खूप धनसंपत्ती आहे.+ तुझं आहे ते तुझ्याकडेच राहू दे.” १०  पण याकोब त्याला म्हणाला: “असं म्हणू नकोस. जर तुझी माझ्यावर कृपा झाली असेल, तर तू माझी भेट स्वीकारलीच पाहिजे. तुझा चेहरा पाहता यावा म्हणून मी ही भेट आणली होती. तू माझं प्रेमाने स्वागत केल्यामुळे, तुझा चेहरा पाहून मला देवाचा चेहरा पाहिल्यासारखं वाटलं.+ ११  तेव्हा आता कृपा करून माझी ही भेट स्वीकार.+ कारण देवाने मला आशीर्वाद दिला आहे आणि माझ्याकडे मला हवं असलेलं सर्वकाही आहे.”+ तो आग्रह करत राहिला, म्हणून एसावने त्याची भेट स्वीकारली. १२  नंतर एसाव म्हणाला: “चल, आता आपण निघू आणि पुढचा प्रवास सोबत करू.” १३  पण याकोब त्याला म्हणाला: “प्रभू, तुला तर माहीत आहे, की ही मुलं नाजूक आहेत.+ आणि दूध पाजणाऱ्‍या मेंढ्यांना आणि गुराढोरांनाही मला सांभाळलं पाहिजे. कारण त्यांना एक दिवस जरी जोरात हाकलं, तर सगळा कळप मरून जाईल. १४  म्हणून हे प्रभू, तू कृपा करून तुझ्या या सेवकाच्या पुढे नीघ. आणि मी मागून माझ्या गुराढोरांना आणि मुलाबाळांना सोसेल तसा प्रवास करीन आणि तुला सेईर इथे भेटीन.”+ १५  तेव्हा एसाव म्हणाला: “माझं ऐक. माझ्या काही माणसांना तुझ्यासोबतच राहू दे.” यावर याकोब म्हणाला: “कशासाठी? फक्‍त तुझी कृपा माझ्यावर असू दे प्रभू.” १६  म्हणून त्या दिवशी एसाव सेईरला परत जायला निघाला. १७  याकोब प्रवास करत सुक्कोथला+ पोहोचला. तिथे त्याने स्वतःसाठी घर आणि आपल्या गुराढोरांसाठी गोठे बांधले. म्हणून त्याने त्या ठिकाणाचं नाव सुक्कोथ* ठेवलं. १८  पदन-अराम+ इथून प्रवास करत याकोब कनान+ देशातल्या शखेम+ या शहरात सुखरूप येऊन पोहोचला. त्याने त्या शहराजवळ तळ दिला. १९  मग, ज्या मैदानात त्याने आपला तंबू ठोकला होता, त्याचा काही भाग त्याने शखेमचा पिता हमोर याच्या मुलांकडून १०० चांदीचे तुकडे देऊन विकत घेतला.+ २०  तिथे त्याने एक वेदी बांधली आणि तिला, देव हा इस्राएलचा देव आहे असं नाव दिलं.+

तळटीपा

म्हणजे, “मंडप, आसरा.”