उत्पत्ती ४२:१-३८
४२ इजिप्तमध्ये अन्नधान्य आहे,+ हे याकोबला कळलं, तेव्हा तो आपल्या मुलांना म्हणाला: “नुसतंच एकमेकांकडे का पाहताय?”
२ तो पुढे म्हणाला: “इजिप्तमध्ये अन्नधान्य आहे असं मी ऐकलंय. म्हणून तिथे जाऊन आपल्यासाठी धान्य विकत आणा, नाहीतर आपण भुकेने मरून जाऊ.”+
३ तेव्हा योसेफचे दहा भाऊ+ धान्य विकत घेण्यासाठी खाली इजिप्तला गेले.
४ पण याकोबने योसेफचा भाऊ बन्यामीन+ याला त्याच्या भावांसोबत पाठवलं नाही, कारण तो म्हणाला: “कदाचित त्याच्या जिवाचं काही बरंवाईट होईल.”+
५ मग इस्राएलची मुलं इतर लोकांसोबत धान्य विकत घ्यायला आली, कारण दुष्काळ कनान देशातही पसरला होता.+
६ इजिप्त देशावर योसेफचा अधिकार होता+ आणि इतर देशांतून येणाऱ्या लोकांना तोच धान्य विकायचा.+ म्हणून योसेफच्या भावांनी येऊन त्याला जमिनीवर डोकं टेकवून नमस्कार केला.+
७ योसेफने आपल्या भावांना पाहताच ओळखलं, पण त्याने स्वतःची ओळख दाखवली नाही.+ तो त्यांना कठोरपणे म्हणाला: “कुठून आलात तुम्ही?” यावर ते म्हणाले: “आम्ही कनान देशातून इथे धान्य विकत घ्यायला आलो आहोत.”+
८ योसेफने आपल्या भावांना ओळखलं होतं, पण त्यांनी त्याला ओळखलं नाही.
९ त्याला लगेच आपल्या भावांबद्दल पाहिलेली त्याची स्वप्नं आठवली.+ तो त्यांना म्हणाला: “तुम्ही गुप्तहेर आहात! आमचा देश कुठे कमजोर आहे, हे तुम्ही पाहायला आला आहात!”
१० तेव्हा ते त्याला म्हणाले: “नाही प्रभू, तुझे सेवक इथे धान्य विकत घ्यायला आले आहेत.
११ आम्ही सर्व एकाच वडिलांची मुलं आहोत. आम्ही गुप्तहेर नाही, तर सरळसाधी माणसं आहोत.”
१२ पण तो त्यांना म्हणाला: “हे खरं नाही! तुम्ही हा देश कुठे कमजोर आहे हे पाहायला आला आहात.”
१३ यावर ते त्याला म्हणाले: “प्रभू, आम्ही १२ भाऊ आहोत+ आणि कनान देशात राहणाऱ्या एकाच माणसाची+ मुलं आहोत. आमचा सर्वात धाकटा भाऊ आमच्या वडिलांसोबत आहे+ आणि एक भाऊ आता आमच्यात नाही.”+
१४ तेव्हा योसेफ त्यांना म्हणाला: “मी म्हणतो तसंच आहे; तुम्ही गुप्तहेरच आहात!
१५ फारोच्या जिवाची शपथ, जोपर्यंत तुमचा धाकटा भाऊ इथे येत नाही, तोपर्यंत तुम्ही इथून जाऊ शकत नाही.+ याच गोष्टीने तुमची परीक्षा होईल.
१६ तुमच्यापैकी एकाला, तुमच्या भावाला आणायला पाठवा आणि तोपर्यंत तुम्ही इथेच कैदेत राहाल. यावरून कळेल, की तुम्ही बोलत आहात ते खरं आहे की नाही. जर असं नसेल, तर फारोच्या जिवाची शपथ, तुम्ही गुप्तहेर आहात.”
१७ असं म्हणून, त्याने त्या सर्वांना तीन दिवस कैदेत ठेवलं.
१८ तिसऱ्या दिवशी योसेफ त्यांना म्हणाला: “मी देवाचं भय मानतो, म्हणून मी जे सांगतो ते करा, म्हणजे जिवंत राहाल.
१९ जर तुम्ही सरळसाधी माणसं असाल, तर तुमच्यापैकी एकाला कैदेत राहू द्या आणि बाकी सर्व भाऊ धान्य घेऊन जाऊ शकता, म्हणजे तुमच्या घरच्यांची उपासमार होणार नाही.+
२० मग तुमच्या धाकट्या भावाला माझ्याकडे घेऊन या, म्हणजे तुम्ही खरं बोलत आहात हे सिद्ध होईल आणि तुमचा जीव वाचेल.” तेव्हा त्यांनी त्याचं म्हणणं मान्य केलं.
२१ मग ते एकमेकांना म्हणू लागले: “आपल्या भावामुळेच आपल्याला ही शिक्षा सहन करावी लागत आहे.+ तो आपल्याकडे दयेची भीक मागत होता. त्याला किती दुःख* झालं हे आपण पाहिलं, तरी आपण त्याचं ऐकलं नाही. म्हणून हे दुःख आज आपल्यावर आलं आहे.”
२२ तेव्हा रऊबेन त्यांना म्हणाला: “‘त्या लेकराविरूद्ध पाप करू नका,’ असं मी म्हणालो होतो ना? पण तुम्ही माझं ऐकलं नाही.+ आता त्याच्या रक्ताचा हिशोब आपल्याकडून घेतला जातोय.”+
२३ पण आपलं बोलणं योसेफला कळत आहे हे त्यांना माहीत नव्हतं, कारण त्यांच्यामध्ये अनुवादक* होता.
२४ मग तो त्यांच्यापासून लांब जाऊन रडू लागला.+ जेव्हा तो त्यांच्याशी बोलायला परत आला, तेव्हा त्याने शिमोनला+ त्यांच्यातून वेगळं करून त्यांच्यासमोर बांधलं.+
२५ नंतर योसेफने त्यांच्या गोणींमध्ये धान्य भरण्याची, त्यासोबतच त्यांच्यापैकी प्रत्येकाने दिलेले पैसे ज्याच्या त्याच्या गोणीत परत ठेवण्याची, तसंच त्यांना प्रवासासाठी लागणाऱ्या वस्तू देण्याची आज्ञा दिली. अशा प्रकारे त्यांची व्यवस्था करण्यात आली.
२६ मग त्यांनी त्यांचं धान्य गाढवांवर लादलं आणि ते तिथून निघाले.
२७ एका ठिकाणी मुक्कामासाठी थांबले असताना, त्यांच्यापैकी एकाने गाढवाला चारा देण्यासाठी आपली गोण उघडली, तेव्हा त्याला गोणीत आपले पैसे दिसले.
२८ हे पाहून तो आपल्या भावांना म्हणाला: “माझे पैसे मला परत दिले आहेत आणि ते माझ्या गोणीत आहेत!” तेव्हा ते घाबरले आणि थरथर कापू लागले. ते एकमेकांना म्हणू लागले: “देवाने हे आपल्यासोबत काय केलं आहे?”
२९ कनान देशात आपला पिता याकोब याच्याकडे परत आल्यानंतर, त्यांनी आपल्यासोबत घडलेली सगळी हकिगत त्याला सांगितली. ते म्हणाले:
३० “त्या देशाचा मुख्य अधिकारी आमच्याशी कठोरपणे बोलला+ आणि आम्ही त्या देशात गुप्तहेर म्हणून गेलो असा आरोप त्याने लावला.
३१ पण आम्ही त्याला म्हणालो: ‘आम्ही गुप्तहेर नाही, तर सरळसाधी माणसं आहोत.+
३२ आम्ही १२ भाऊ+ एकाच माणसाची मुलं आहोत. आमचा एक भाऊ आता आमच्यात नाही+ आणि सर्वात धाकटा भाऊ आमच्या वडिलांसोबत कनान देशात आहे.’+
३३ पण तो मुख्य अधिकारी आम्हाला म्हणाला: ‘तुम्ही सरळसाधी माणसं असाल, तर तुमच्यापैकी एकाला माझ्याकडे राहू द्या+ आणि तुमच्या घरच्यांची उपासमार व्हायला नको म्हणून धान्य घेऊन जा.+
३४ आणि तुमच्या धाकट्या भावाला माझ्याकडे घेऊन या, म्हणजे मला कळेल की तुम्ही गुप्तहेर नाही तर सरळसाधी माणसं आहात. तेव्हाच मी तुम्हाला तुमचा भाऊ परत देईन आणि तुम्ही या देशातून धान्य विकत घेऊ शकता.’”
३५ जेव्हा ते आपल्या गोणी रिकाम्या करत होते, तेव्हा प्रत्येकाला आपापल्या गोणीत आपले पैसे मिळाले. त्यांनी आणि त्यांच्या पित्याने पैशांच्या थैल्या पाहिल्या तेव्हा ते घाबरले.
३६ त्यांचा पिता याकोब त्यांना म्हणाला: “तुम्ही माझ्या मुलांना माझ्यापासून दूर नेत आहात!+ योसेफ गेला,+ शिमोनही गेला,+ आणि आता तुम्ही बन्यामीनलाही नेत आहात! माझ्यावरच ही सर्व दुःखं का येत आहेत?”
३७ तेव्हा रऊबेन आपल्या पित्याला म्हणाला: “तुम्ही त्याला माझ्याकडे सोपवा. मी त्याची काळजी घेईन आणि त्याला परत तुमच्याकडे आणीन.+ जर मी त्याला तुमच्याकडे परत आणलं नाही, तर तुम्ही माझ्या दोन मुलांना मारून टाका.”+
३८ पण याकोब म्हणाला: “मी माझ्या मुलाला तुमच्यासोबत पाठवणार नाही, कारण त्याचा भाऊ आधीच मेला आहे आणि तो एकटाच उरला आहे.+ वाटेत त्याचं काही बरंवाईट झालं, तर तुमच्यामुळे मला म्हातारपणी दुःख करत कबरेत*+ जावं लागेल.”+
तळटीपा
^ किंवा “त्याच्या जिवाला किती दुःख.”
^ किंवा “दुभाषी.”
^ हिब्रू भाषेत “शिओल.” शब्दार्थसूची पाहा.