उत्पत्ती ५०:१-२६

  • योसेफ याकोबला कनानमध्ये पुरतो (१-१४)

  • योसेफ भावांना क्षमा केल्याची खातरी देतो (१५-२१)

  • योसेफचे शेवटचे दिवस आणि त्याचा मृत्यू (२२-२६)

    • योसेफ आपल्या अस्थींबद्दल आज्ञा देतो (२५)

५०  मग योसेफ आपल्या वडिलांच्या अंगावर पडून+ त्यांचे मुके घेऊ लागला आणि खूप रडला. २  त्यानंतर योसेफने आपल्या सेवकांना, म्हणजे वैद्यांना त्याच्या वडिलांच्या मृतदेहाला सुगंधी पदार्थ लावून तो दफनविधीसाठी तयार करण्याची+ आज्ञा दिली. तेव्हा वैद्यांनी इस्राएलचा मृतदेह दफनविधीसाठी तयार केला. ३  या कामाला ४० दिवस लागले. कारण मृतदेहाला सुगंधी पदार्थ लावून तो दफनविधीसाठी तयार करायला इतका काळ लागायचा. मग इजिप्तचे लोक याकोबसाठी ७० दिवसांपर्यंत शोक करत राहिले. ४  त्याच्यासाठी शोक करण्याचे दिवस संपल्यावर योसेफ फारोच्या दरबारातल्या अधिकाऱ्‍यांना म्हणाला: “माझ्यावर तुमची कृपा झाली असेल, तर फारोला माझा हा निरोप द्या: ५  ‘माझ्या वडिलांनी मला शपथ घ्यायला लावली होती+ आणि ते मला म्हणाले होते: “मी आता मरणार आहे.+ कनान देशात, माझ्या मालकीच्या पुरण्याच्या जागेत जी कबर मी खोदून घेतली आहे,+ तिथे नेऊन मला पूर.”+ म्हणून आता मला जाऊन माझ्या वडिलांना पुरू द्या. त्यानंतर मी परत येईन.’” ६  फारो त्याला म्हणाला: “तुझ्या वडिलांनी तुला जी शपथ घ्यायला लावली होती, त्याप्रमाणे त्यांना जाऊन पूर.”+ ७  म्हणून योसेफ आपल्या पित्याला पुरायला गेला आणि फारोचे सर्व सेवक, दरबारातले उच्च अधिकारी+ आणि इजिप्त देशातली सगळी वडीलधारी मंडळी त्याच्यासोबत गेली. ८  तसंच, योसेफच्या कुटुंबातले सर्व जण, त्याचे भाऊ आणि त्याच्या वडिलांच्या घराण्यातले सर्व जण+ त्याच्यासोबत गेले. फक्‍त लहान मुलांना, गुराढोरांना आणि मेंढरांना त्यांनी गोशेनमध्येच ठेवलं. ९  त्याच्यासोबत रथ+ आणि घोडेस्वारही गेले. अशा रितीने पुष्कळ लोकांचा एक मोठा समूह कनानला जायला निघाला. १०  मग ते यार्देनच्या प्रदेशात असलेल्या अटादाच्या खळ्याजवळ* आले. तिथे त्यांनी त्याच्यासाठी खूप मोठ्याने रडून शोक केला. योसेफ तिथेच सात दिवस आपल्या पित्यासाठी शोक करत राहिला. ११  कनान देशातल्या लोकांनी त्यांना अटादाच्या खळ्यात* शोक करताना पाहिलं, तेव्हा ते आश्‍चर्याने म्हणाले: “इजिप्तचे लोक किती शोक करत आहेत!” म्हणून यार्देनच्या प्रदेशात असलेल्या त्या ठिकाणाचं नाव अबेलमिस्राइम* पडलं. १२  अशा रितीने याकोबने आपल्या मुलांना सांगितल्याप्रमाणेच त्यांनी केलं.+ १३  त्याच्या मुलांनी त्याला कनान देशात नेऊन, मम्रेसमोर मकपेलाच्या शेतात असलेल्या गुहेत पुरलं. हे शेत अब्राहामने हित्ती एफ्रोनकडून पुरण्याची जागा म्हणून विकत घेतलं होतं.+ १४  आपल्या पित्याला पुरल्यानंतर योसेफ, त्याचे भाऊ आणि त्याच्यासोबत त्याच्या पित्याला पुरायला गेलेले सर्व जण इजिप्तला परत आले. १५  आपल्या पित्याचा मृत्यू झाला आहे हे योसेफच्या भावांनी पाहिलं, तेव्हा ते एकमेकांना म्हणाले: “कदाचित योसेफच्या मनात आपल्याबद्दल राग असेल, कारण आपण त्याच्यासोबत खूप वाईट वागलो होतो आणि आता तो त्या सर्व गोष्टींचा सूड उगवेल.”+ १६  म्हणून त्यांनी योसेफला असा निरोप पाठवला: “आपल्या पित्याने मरण्याआधी अशी आज्ञा दिली होती: १७  ‘योसेफला असं सांगा: “मी तुला विनंती करतो, की तुझ्या भावांनी तुझा छळ करून तुझ्याविरुद्ध जो अपराध आणि जे पाप केलं, त्याबद्दल तू त्यांना क्षमा कर.”’ म्हणून, कृपा करून तुझ्या वडिलांच्या देवाच्या या सेवकांना तू क्षमा कर.” त्यांचं हे बोलणं ऐकून योसेफ रडू लागला. १८  मग त्याचे भाऊ स्वतः त्याच्याकडे आले आणि त्याच्यासमोर वाकून म्हणाले: “आम्ही तुझे दास आहोत!”+ १९  योसेफ त्यांना म्हणाला: “घाबरू नका. मी काय देव आहे? २०  तुम्हाला जरी माझं वाईट करायचं होतं,+ तरी यातून काहीतरी चांगलं घडावं आणि पुष्कळ लोकांचा जीव वाचावा, अशी देवाची इच्छा होती. आणि आज तो हेच करत आहे.+ २१  म्हणून तुम्ही घाबरू नका. मी तुम्हाला आणि तुमच्या मुलाबाळांना अन्‍न पुरवत राहीन.”+ अशा रितीने योसेफने आपल्या भावांशी प्रेमाने बोलून त्यांना दिलासा दिला. २२  योसेफ आणि त्याच्या वडिलांच्या घराण्यातले सर्व जण पुढे इजिप्तमध्येच राहिले. योसेफ एकूण ११० वर्षं जगला. २३  त्याने एफ्राईमच्या मुलांची तिसरी पिढी पाहिली.+ तसंच त्याने मनश्‍शेचा मुलगा माखीर,+ याच्या मुलांनाही पाहिलं. योसेफला ही मुलं स्वतःच्या मुलांसारखी होती.* २४  नंतर योसेफ आपल्या भावांना म्हणाला: “मी आता जास्त जगणार नाही, पण देव नक्की तुमच्याकडे लक्ष देईल+ आणि तो तुम्हाला या देशातून काढून, त्याने अब्राहाम, इसहाक आणि याकोब यांना ज्या देशाबद्दल वचन दिलं, त्या देशात नेईल.”+ २५  मग योसेफने इस्राएलच्या मुलांना शपथ घ्यायला लावली आणि त्यांना म्हणाला: “देव नक्कीच तुमच्याकडे लक्ष देईल आणि तेव्हा तुम्ही माझ्या अस्थी* आपल्यासोबत घेऊन जा.”+ २६  मग योसेफ ११० वर्षांचा झाल्यावर त्याचा मृत्यू झाला आणि त्यांनी त्याच्या मृतदेहाला सुगंधी पदार्थ लावले+ आणि त्याला इजिप्तमध्ये एका शवपेटीत ठेवण्यात आलं.

तळटीपा

म्हणजे, “इजिप्तच्या लोकांचा शोक.”
शब्दशः “त्या मुलांचा योसेफच्या गुडघ्यांवर जन्म झाला.” म्हणजे, त्याने त्यांना आपलीच मुलं समजून त्यांच्यावर खास कृपा केली.
किंवा “माझी हाडं.”