उत्पत्ती ८:१-२२
८ पण देव नोहाला आणि त्याच्यासोबत जहाजात असलेल्या सर्व जंगली व पाळीव प्राण्यांना विसरला नव्हता.*+ म्हणून देवाने पृथ्वीवर वारा वाहायला लावला आणि पाणी हळूहळू कमी होऊ लागलं.
२ आकाशातले पाण्याचे झरे आणि पाण्याची दारं बंद झाली आणि त्यामुळे पाऊस पडायचा थांबला.+
३ मग हळूहळू पृथ्वीवरचं पाणी कमी होऊ लागलं. १५० दिवसांनी पाणी ओसरलं.
४ सातव्या महिन्याच्या १७ व्या दिवशी, जहाज अरारात पर्वतांवर येऊन टेकलं.
५ दहाव्या महिन्यापर्यंत पाणी सतत ओसरत राहिलं. दहाव्या महिन्याच्या पहिल्या दिवशी, पर्वतांची शिखरं दिसू लागली.+
६ मग ४० दिवसांनंतर, नोहाने जहाजाला जी खिडकी+ बनवली होती, ती त्याने उघडली
७ आणि एक कावळा बाहेर सोडला. पृथ्वीवरचं पाणी सुकेपर्यंत तो इकडेतिकडे उडून परत यायचा.
८ त्यानंतर, जमिनीवरचं पाणी ओसरलं आहे की नाही, हे पाहण्यासाठी त्याने एक कबुतर बाहेर सोडलं.
९ पण अजूनही संपूर्ण पृथ्वी पाण्याने झाकलेली असल्यामुळे,+ त्याला कुठेही बसायला* जागा मिळाली नाही. म्हणून ते कबुतर नोहाकडे जहाजात परत आलं. तेव्हा नोहाने हात पुढे करून त्याला जहाजात घेतलं.
१० त्याने आणखी सात दिवस वाट पाहिली आणि मग पुन्हा एकदा कबुतराला जहाजाबाहेर सोडलं.
११ संध्याकाळी जेव्हा ते कबुतर परत आलं, तेव्हा नोहाने पाहिलं की त्याच्या चोचीत नुकतंच तोडलेलं जैतुनाचं पान होतं! तेव्हा नोहाला कळलं, की पृथ्वीवरून पाणी ओसरलं आहे.+
१२ त्याने आणखी सात दिवस वाट पाहिली. मग त्याने पुन्हा कबुतराला बाहेर सोडलं, पण या वेळी ते त्याच्याकडे परत आलं नाही.
१३ नोहा ६०१ वर्षांचा झाला त्या वर्षी,+ पहिल्या महिन्याच्या पहिल्या दिवशी पृथ्वीवरून पाणी ओसरलं होतं. नोहाने जहाजाचं छत उघडून पाहिलं, तेव्हा त्याला दिसलं की जमीन सुकत आहे.
१४ दुसऱ्या महिन्याच्या २७ व्या दिवशी, पृथ्वी पूर्णपणे कोरडी झाली होती.
१५ मग देव नोहाला म्हणाला:
१६ “तू तुझ्या बायकोला, मुलांना आणि सुनांना घेऊन जहाजाबाहेर जा.+
१७ आपल्यासोबत सर्व प्रकारचे प्राणी,+ आकाशात उडणारे पक्षी आणि जीवजंतू, तसंच जमिनीवर राहणारे जीवजंतू आणि रांगणारे प्राणी यांना जहाजाबाहेर आण. म्हणजे ते फलदायी होऊन त्यांची संख्या वाढत जाईल आणि ते पृथ्वीला भरून टाकतील.”+
१८ तेव्हा नोहा आपल्या मुलांना,+ बायकोला आणि आपल्या सुनांना घेऊन जहाजाबाहेर गेला.
१९ सर्व प्राणी, म्हणजे रांगणारे प्राणी, उडणारे पक्षी व जीवजंतू आणि पृथ्वीवर चालणारे सर्व जीवजंतू हे आपापल्या जातींप्रमाणे जहाजाबाहेर गेले.+
२० मग नोहाने यहोवासाठी एक वेदी बांधली+ आणि सर्व शुद्ध प्राणी आणि सर्व शुद्ध पक्षी+ यांपैकी काही घेऊन त्या वेदीवर होमार्पणं दिली.+
२१ त्या सुवासाने यहोवाला आनंद झाला.* यहोवा आपल्या मनात म्हणाला: “मानवाच्या मनातल्या कल्पना लहानपणापासून वाईटच असतात.+ म्हणून यापुढे मी कधीही मानवामुळे जमिनीला शाप देणार नाही+ आणि पुन्हा कधीही सर्व प्राण्यांचा असा नाश करणार नाही.+
२२ आतापासून पृथ्वीवर पेरणी व कापणी, थंडी व उष्णता, उन्हाळा व हिवाळा आणि दिवस व रात्र हे सर्व व्हायचे थांबणार नाहीत.”+