उपदेशक १:१-१८
१ यरुशलेममध्ये असलेला राजा, दावीदचा मुलगा,+ उपदेशक*+ याचे हे शब्द आहेत.
२ उपदेशक म्हणतो, “व्यर्थ* आहे! व्यर्थ आहे!
सगळंच व्यर्थ आहे!”+
३ माणूस इतके कष्ट करतो,सूर्याखाली* राब राब राबतो, तरी त्याला काय मिळतं?+
४ एक पिढी जाते आणि दुसरी येते,पृथ्वी मात्र सर्वकाळ राहते.*+
५ सूर्य उगवतो आणि मावळतो;मग परत तिथेच धावत जाऊन,* पुन्हा उगवतो.+
६ वारा दक्षिणेला जातो आणि परत फिरून उत्तरेकडे येतो;तो असा गोल गोल फिरतच राहतो; वाऱ्याच्या या फेऱ्या सतत सुरू राहतात.
७ सगळ्या नद्या* सागराला जाऊन मिळतात, तरी सागर भरून जात नाही;+त्या जिथून वाहत आल्या, तिथेच परत जातात आणि पुन्हा वाहू लागतात.+
८ सगळ्याच गोष्टी थकवणाऱ्या आहेत;कोणीच त्यांचं वर्णन करू शकत नाही.
कितीही पाहिलं, तरी डोळ्यांचं समाधान होत नाही;कितीही ऐकलं, तरी कानांचं समाधान होत नाही.
९ जे घडून गेलंय, तेच परत घडणार
आणि जे करून झालंय, तेच पुन्हा केलं जाणार;सूर्याखाली नवीन असं काहीच नाही.+
१० अशी एकतरी गोष्ट आहे का, जिला पाहून म्हणावं, “पाहा, ही नवीन आहे”?
ती तर फार पूर्वीपासूनच होती;आपल्या काळाच्या आधीपासूनच ती होती.
११ पूर्वीच्या लोकांची कोणालाही आठवण राहत नाही;जे पुढे येतील त्यांचीही राहणार नाही.
आणि जे त्यांच्यानंतर येतील, त्यांचीही कोणाला आठवण राहणार नाही.+
१२ मी, उपदेशक, यरुशलेममध्ये इस्राएलवर राजा म्हणून राज्य करत आलोय.+
१३ मी आपल्या बुद्धीचा+ वापर करून, आकाशाखाली चाललेल्या सर्व कामांचा अभ्यास आणि परीक्षण करायचं ठरवलं.+ देवाने माणसांना दिलेल्या या त्रासदायक उद्योगात, ते आयुष्यभर गुंतून राहतात.
१४ सूर्याखाली केली जाणारी सर्व कामं मी पाहिली,पण सगळंच व्यर्थ आणि वाऱ्यामागे धावण्यासारखं होतं.+
१५ जे वाकडं आहे, ते सरळ केलं जाऊ शकत नाही,आणि जे नाही, ते मोजणं अशक्य आहे.
१६ तेव्हा मी मनात म्हणालो: “मी भरपूर बुद्धी मिळवली आहे. यरुशलेममध्ये आजपर्यंत होऊन गेलेल्या कोणत्याही माणसापेक्षा जास्त बुद्धी मी मिळवली आहे.+ मी आपल्या हृदयात पुष्कळ बुद्धीच्या गोष्टी आणि ज्ञान साठवलं.”+
१७ बुद्धी, वेडेपणा* आणि मूर्खपणा काय असतो, हे जाणून घेण्याकडे मी आपलं मन लावलं.+ पण हेही वाऱ्यामागे धावण्यासारखंच आहे.
१८ कारण जितकी बुद्धी वाढते, तितकीच निराशाही वाढते.
त्यामुळे जो जास्त ज्ञान मिळवतो, तो आपल्या दुःखात भर घालतो.+
तळटीपा
^ शब्दशः “सभा भरवणारा.”
^ किंवा “निरर्थक.”
^ बायबलच्या या पुस्तकात, “सूर्याखाली” या शब्दाचा अर्थ “या पृथ्वीवर” किंवा “या जगात” असा होतो.
^ शब्दशः “उभी आहे.”
^ किंवा “धापा टाकत.”
^ किंवा “हिवाळ्यात वाहणाऱ्या नद्या; मोसमी नद्या.”
^ किंवा “कमालीचा मूर्खपणा.”