उपदेशक १२:१-१४
१२ आपल्या तारुण्याच्या दिवसांत आपल्या महान निर्माणकर्त्याला आठव,+ कारण पुढे दुःखाचे* दिवस येतील+ आणि अशी वर्षं येतील जेव्हा तू म्हणशील: “माझ्या जीवनात काहीच आनंद नाही.”
२ तेव्हा सूर्य आणि प्रकाश, चंद्र आणि तारे अंधूक होतील+ आणि पाऊस पडल्यावर* आभाळ पुन्हा भरून येईल.
३ त्या दिवसांत घराचे पहारेकरी* लटपटू लागतील* आणि ताकदवान माणसं वाकतील; दळणाऱ्या कमी झाल्यामुळे त्या दळायचं सोडून देतील आणि खिडक्यांतून डोकावणाऱ्या स्त्रियांना बाहेर अंधार दिसेल.+
४ तेव्हा रस्त्याकडे उघडणारी दारं बंद झालेली असतील; जात्याचा आवाज मंद होईल. पक्ष्याच्या आवाजानेही माणसाला जाग येईल आणि सगळ्या मुली अगदी हळू आवाजात गातील.+
५ तसंच, माणसाला उंच ठिकाणांची भीती वाटेल आणि रस्त्यावर जायची कल्पनाही त्याला भीतिदायक वाटेल. बदामाच्या झाडाला बहर येईल+ आणि नाकतोडा रखडत, पाय ओढत चालेल. माणसाची भूक* मरेल, कारण तो आपल्या कायमच्या घराकडे चालला आहे+ आणि शोक करणारे रस्त्यावर फिरत आहेत.+
६ मग चांदीचा दोर कापला जाईल आणि सोन्याच्या कटोऱ्याचा चुराडा होईल; झऱ्याजवळचा घडा फुटेल आणि विहिरीचा रहाट मोडेल.
७ तेव्हा माती पूर्वीप्रमाणेच मातीला मिळेल+ आणि जी जीवनशक्ती खऱ्या देवाने दिली होती, ती त्याच्याकडे परत जाईल.+
८ उपदेशक+ म्हणतो, “व्यर्थ* आहे! सगळंच व्यर्थ आहे!”+
९ उपदेशकाने बुद्धी तर मिळवलीच, पण तो सतत आपल्याजवळ असलेलं ज्ञान लोकांना द्यायचा.+ त्याने बराच विचार करून आणि बारकाईने संशोधन करून पुष्कळ नीतिवचनं रचली.*+
१० उपदेशकाने सुंदर* शब्द+ आणि सत्याची अचूक वचनं शोधण्यासाठी बरेच परिश्रम घेतले.
११ बुद्धिमानांचे शब्द पराणीसारखे* असतात+ आणि संग्रहित केलेले त्यांचे बोल, घट्ट ठोकलेल्या खिळ्यांसारखे असतात; ते एकाच मेंढपाळाकडून मिळालेले आहेत.
१२ पण माझ्या मुला, यांपलीकडे जे काही आहे, त्यापासून सांभाळून राहा. कारण, पुस्तकं लिहिण्याला अंतच नाही आणि त्यांचं खूप जास्त वाचन केल्यामुळे माणूस थकून जातो.+
१३ आता सर्वकाही ऐकून झाल्यावर, सर्व गोष्टींचा सारांश हा आहे: खऱ्या देवाचं भय मान+ आणि त्याच्या आज्ञा पाळ;+ हेच माणसाचं कर्तव्य आहे.+
१४ कारण खरा देव प्रत्येक कृत्याचा आणि प्रत्येक गुप्त गोष्टीचा न्याय करेल, मग ती चांगली असो किंवा वाईट.+
तळटीपा
^ किंवा “संकटाचे.”
^ किंवा कदाचित, “पावसासोबत.”
^ किंवा “राखणदार.”
^ किंवा “थरथर कापू लागतील.”
^ हा वाक्यांश अशा एका फळाला सूचित करतो, जे भूक वाढवण्यासाठी वापरलं जायचं.
^ किंवा “निरर्थक.”
^ किंवा “योग्य क्रमाने लावली.”
^ किंवा “मनाला आनंद देणारे.”
^ शब्दार्थसूची पाहा.