उपदेशक ३:१-२२
३ प्रत्येक गोष्टीची एक योग्य वेळ असते;आकाशाखालच्या प्रत्येक कामासाठी एक वेळ असते.
२ जन्म होण्याची वेळ आणि मरण्याची वेळ;रोप लावण्याची वेळ आणि लावलेलं रोप उपटून टाकण्याची वेळ;
३ मारून टाकण्याची वेळ आणि बरं करण्याची वेळ;पाडून टाकण्याची वेळ आणि बांधण्याची वेळ;
४ रडण्याची वेळ आणि हसण्याची वेळ;आक्रोश करण्याची वेळ आणि आनंदाने नाचण्याची* वेळ;
५ दगड फेकून देण्याची वेळ आणि दगड गोळा करण्याची वेळ;मिठी मारण्याची वेळ आणि मिठी मारण्यापासून स्वतःला आवरण्याची वेळ.
६ शोधण्याची वेळ आणि हरवलं म्हणून सोडून देण्याची वेळ;जवळ ठेवण्याची वेळ आणि फेकून देण्याची वेळ;
७ फाडून टाकण्याची वेळ+ आणि शिवण्याची वेळ;शांत राहण्याची वेळ+ आणि बोलण्याची वेळ;+
८ प्रेम करण्याची वेळ आणि द्वेष करण्याची वेळ;+युद्धाची वेळ आणि शांतीची वेळ.
९ काम करणाऱ्याला त्याच्या सगळ्या मेहनतीमुळे काय फायदा होतो?+
१० माणसांना गुंतवून ठेवण्यासाठी देवाने त्यांना जी कामं दिली आहेत, ती मी पाहिली आहेत.
११ त्याने प्रत्येक गोष्ट सुंदर* आणि योग्य वेळी घडवली आहे.+ त्याने माणसांना अनंतकाळाची जाणीव दिली आहे; तरीही, खऱ्या देवाने जे काही केलं आहे, ते माणसाला कधीही पूर्णपणे* समजणार नाही.
१२ मी या निष्कर्षावर आलोय, की माणसांनी आपल्या आयुष्यात आनंदी राहावं आणि योग्य ते करत राहावं; हेच त्यांच्यासाठी सर्वात चांगलं आहे.+
१३ तसंच, प्रत्येकाने खावं-प्यावं आणि आपल्या सगळ्या मेहनतीच्या फळाचा आनंद घ्यावा. ही देवाची देणगी आहे.+
१४ खरा देव जे काही बनवतो ते सर्वकाळ टिकून राहतं, हे मला कळलं आहे. त्यात कशाचीच भर घालता येत नाही आणि त्यातून काही कमीही करता येत नाही. माणसांनी खऱ्या देवाचं भय मानावं, म्हणून त्याने ते असं बनवलं आहे.+
१५ जे काही घडतं, ते आधीच घडलं आहे आणि जे होणार आहे, ते आधीच झालं आहे;+ पण मानवांनी जे मिळवण्याचा प्रयत्न केला,* त्याचा देव शोध घेतो.
१६ सूर्याखाली हेही माझ्या पाहण्यात आलं आहे: जिथे न्याय असायला हवा, तिथे अन्याय* होता आणि जिथे नीती असायला हवी, तिथे अनीती* होती.+
१७ म्हणून मी आपल्या मनात म्हणालो: “खरा देव नीतिमान आणि दुष्ट या दोघांचाही न्याय करेल,+ कारण प्रत्येक गोष्टीसाठी आणि प्रत्येक कामासाठी एक वेळ असते.”
१८ खरा देव मानवांची परीक्षा घेईल आणि ते प्राण्यांसारखेच आहेत, हे त्यांना दाखवून देईल, असंही मी आपल्या मनात म्हणालो.
१९ कारण माणसांचा शेवट होतो आणि प्राण्यांचाही शेवट होतो; त्या सर्वांचा शेवट एकच असतो.+ जसा एक मरतो, तसा दुसराही मरतो आणि त्या सर्वांमध्ये असलेला प्राण* सारखाच असतो.+ त्यामुळे माणूस प्राण्यांपेक्षा काही श्रेष्ठ नाही. सगळंच व्यर्थ आहे!
२० ते सर्व एकाच ठिकाणी जातात.+ सगळे मातीतून आले+ आणि सगळे पुन्हा मातीतच जाणार.+
२१ माणसांचा प्राण वर जातो, पशूंचा खाली जमिनीत जातो, हे खातरीने कोण सांगू शकतं?+
२२ त्यामुळे मला कळलं, की माणसाने आपल्या कामातून आनंद मिळवावा, हेच त्याच्यासाठी सर्वात चांगलं आहे.+ कारण ते त्याचं प्रतिफळ* आहे. शेवटी तो गेल्यानंतर काय घडेल, हे त्याला कोण दाखवू शकतं?+
तळटीपा
^ शब्दशः “उड्या मारण्याची.”
^ किंवा “व्यवस्थित; उचित.”
^ शब्दशः “सुरुवातीपासून शेवटपर्यंत.”
^ किंवा कदाचित, “पण जे होऊन गेलं आहे.”
^ किंवा “दुष्टता.”
^ किंवा “दुष्टता.”
^ किंवा “श्वास; जीवन-शक्ती.”
^ किंवा “वाटा.”