उपदेशक ७:१-२९

  • चांगलं नाव आणि मरणाचा दिवस (१-४)

  • बुद्धिमान माणसाचं ताडन (५-७)

  • सुरुवातीपेक्षा शेवट बरा (८-१०)

  • बुद्धीचा फायदा (११, १२)

  • चांगले आणि वाईट दिवस (१३-१५)

  • टोकाच्या गोष्टी टाळा (१६-२२)

  • उपदेशकाने केलेलं निरीक्षण (२३-२९)

 मौल्यवान तेलापेक्षा चांगलं नाव* बरं+ आणि जन्माच्या दिवसापेक्षा मरणाचा दिवस बरा. २  मेजवानीच्या घरी जाण्यापेक्षा शोकाच्या घरी जाणं चांगलं,+ कारण प्रत्येक माणसाचा शेवट हाच आहे. जे जिवंत आहेत त्यांनी हे आठवणीत ठेवलं पाहिजे. ३  हसण्यापेक्षा दुःखी असणं बरं,+ कारण चेहरा उदास झाल्यामुळे मन सुधारतं.+ ४  बुद्धिमान माणसाचं मन शोकाच्या घराकडे लागलेलं असतं, पण मूर्खाचं मन मात्र मेजवानीच्या* घराकडे लागलेलं असतं.+ ५  मूर्खांचं गाणं ऐकण्यापेक्षा बुद्धिमान माणसाचं ताडन ऐकणं बरं.+ ६  कारण मूर्खांचं हसणं, भांड्याखाली कडकड आवाज करत जळणाऱ्‍या काट्याकुट्यांसारखं असतं;+ हेही व्यर्थच आहे. ७  पण अत्याचार झाल्यामुळे कधीकधी बुद्धिमान माणूसही वेड्यासारखा वागू लागतो आणि लाचेमुळे मन भ्रष्ट होतं.+ ८  एखाद्या गोष्टीच्या सुरुवातीपेक्षा तिचा शेवट बरा. गर्विष्ठ असण्यापेक्षा सहनशील असणं बरं.+ ९  लगेच रागावू नकोस,+ कारण राग मूर्खांच्या मनात राहतो.*+ १०  “पूर्वीचे दिवस आजच्यापेक्षा चांगले होते,” असं म्हणू नकोस. कारण असं बोलणं बुद्धीचं लक्षण नाही.+ ११  वारशाने मिळालेल्या संपत्तीसोबत बुद्धीही असेल, तर ही एक चांगली गोष्ट आहे. जिवंत असलेल्यांसाठी बुद्धी फायद्याची गोष्ट आहे. १२  पैशामुळे जसं संरक्षण मिळतं,+ तसं बुद्धीमुळेही संरक्षण मिळतं;+ पण ज्ञानाचा फायदा असा, की ज्याच्याकडे बुद्धी असते, त्याच्या जिवाचं ती रक्षण करते.+ १३  खऱ्‍या देवाच्या कार्याकडे लक्ष दे, कारण जे त्याने वाकडं केलं आहे, ते कोण सरळ करू शकतं?+ १४  चांगल्या दिवशी, चांगुलपणा दाखव;+ पण, संकटाच्या* दिवशी हे लक्षात घे, की त्या दिवसाप्रमाणेच हा दिवसही देवाने बनवला आहे.+ याच कारणामुळे, भविष्यात आपल्यासोबत काय होईल हे माणूस खातरीने सांगू* शकत नाही.+ १५  माझ्या निरर्थक आयुष्यात+ मी सर्वकाही पाहिलं आहे. नीतीने वागत असून ज्याचा नाश होतो, असा नीतिमान माणूसही मी पाहिला आहे;+ आणि वाईट गोष्टी करत असून मोठं आयुष्य जगणारा दुष्टही मी पाहिला आहे.+ १६  खूप जास्त नीतिमान होऊ नकोस+ आणि खूप जास्त बुद्धिमान असल्याचंही दाखवू नकोस.+ तू स्वतःवर नाश का ओढवून घ्यावा?+ १७  मर्यादेबाहेर दुष्टपणा करू नकोस, तसंच मूर्खपणे वागू नकोस.+ तू आपल्या वेळेआधी का मरावं?+ १८  यांतली एक ताकीद मानणं आणि दुसरीही न विसरणं, हेच सर्वात चांगलं.+ कारण जो देवाचं भय मानतो, तो या दोन्हींचं पालन करेल. १९  बुद्धिमान माणूस आपल्या बुद्धीमुळे, शहरातल्या दहा शक्‍तिशाली माणसांपेक्षा ताकदवान ठरतो.+ २०  कारण जो नेहमीच चांगलं वागतो आणि कधीच पाप करत नाही, असा एकही नीतिमान माणूस या पृथ्वीवर नाही.+ २१  लोकांनी बोललेला प्रत्येक शब्द मनाला लावून घेऊ नकोस;+ नाहीतर, तुझ्या सेवकाने तुला दिलेला शाप तू ऐकशील. २२  कारण, तू स्वतःही बऱ्‍याच वेळा इतरांना शाप दिला आहेस, हे तुझ्या मनाला माहीत आहे.+ २३  या सर्व गोष्टी मी बुद्धीने पारखून पाहिल्या आणि म्हणालो: “मला बुद्धिमान व्हायचंय.” पण ते माझ्या शक्‍तिपलीकडे होतं. २४  जे घडून गेलंय ते आवाक्याबाहेर आणि खूप खोल आहे. ते कोण समजू शकतं?+ २५  बुद्धीच्या गोष्टी आणि जे काही घडतं त्यामागची कारणं जाणून घ्यावीत, त्यांचा तपास करावा आणि त्यांचा शोध घ्यावा; तसंच, मूर्खतेतला दुष्टपणा आणि वेडेपणातलं अज्ञान समजून घ्यावं, असं मी आपल्या मनाशी ठरवलं.+ २६  तेव्हा मला हे कळलं: जी स्त्री शिकाऱ्‍याच्या पाशासारखी असते, जिचं मन जाळ्यासारखं आणि जिचे हात तुरुंगाच्या साखळ्यांसारखे असतात, ती मृत्यूपेक्षा वाईट असते. खऱ्‍या देवाच्या इच्छेप्रमाणे वागणारा तिच्यापासून सुटतो,+ पण पापी माणूस तिच्या तावडीत सापडतो.+ २७  उपदेशक+ म्हणतो, “पाहा, मला जे समजलं ते हे आहे. मी एकापाठोपाठ एक गोष्टींचा तपास करून या निष्कर्षावर आलो, २८  पण मी* ज्याचा सतत शोध घेत राहिलो, ते मला अजूनही सापडलेलं नाही. हजार लोकांमध्ये एक सरळ मनाचा माणूस तर मला सापडला, पण स्त्री मात्र सापडली नाही. २९  मला ही एकच गोष्ट दिसून आली आहे: खऱ्‍या देवाने माणसांना सरळ मनाचं बनवलं होतं,+ पण त्यांनी आपल्याच योजनांप्रमाणे वागायचं ठरवलं.”+

तळटीपा

किंवा “चांगला नावलौकिक.” शब्दशः “नाव.”
किंवा “मौजमजेच्या.”
किंवा कदाचित, “मूर्खाचं लक्षण आहे.”
किंवा “समजू.”
किंवा “विपत्तीच्या.”
किंवा “माझा जीव.”