एज्रा १०:१-४४

  • विदेशी बायकांना परत पाठवण्याबद्दलचा करार (१-१४)

  • विदेशी बायकांना परत पाठवण्यात येतं (१५-४४)

१०  खऱ्‍या देवाच्या मंदिरासमोर एज्रा जेव्हा प्रार्थना करत,+ लोकांच्या पापांची कबुली देत आणि रडत पालथा पडला होता, तेव्हा बरेच इस्राएली पुरुष, स्त्रिया आणि मुलं त्याच्याभोवती गोळा झाली; आणि ते लोकही मोठ्याने रडत होते. २  तेव्हा एलामच्या मुलांपैकी+ यहीएलचा+ मुलगा शखन्याह एज्राला म्हणाला: “इतर राष्ट्रांच्या स्त्रियांशी लग्न करून* आम्ही आपल्या देवाशी अविश्‍वासूपणे वागलो आहोत.+ असं असलं, तरी इस्राएलसाठी अजूनही आशा आहे. ३  तर आता, आपण यहोवाच्या आणि जे त्याच्या आज्ञेचा आदर करतात+ त्यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे वागू या. आपण आपल्या देवाशी एक करार करू या+ आणि त्याप्रमाणे सर्व विदेशी स्त्रियांना आणि त्यांच्यापासून झालेल्या मुलांना परत पाठवून देऊ या. असं करून, आपण नियमशास्त्रात सांगितल्याप्रमाणे वागू या. ४  म्हणून आता ऊठ. हिंमत धर आणि हे काम पूर्ण कर. कारण ही सगळी तुझी जबाबदारी आहे. आम्ही सर्व जण तुझ्यासोबत आहोत.” ५  तेव्हा एज्रा उठला आणि याजक, लेवी व सर्व इस्राएली लोक यांचे प्रमुख जे बोलले होते, त्याप्रमाणे करण्याची त्याने त्यांना शपथ घ्यायला लावली.+ म्हणून त्यांनी तशी शपथ घेतली. ६  मग एज्रा खऱ्‍या देवाच्या मंदिराजवळून निघाला आणि एल्याशीबचा मुलगा यहोहानान याच्या खोलीत* गेला. पण, तिथे गेल्यावरही त्याने खाणंपिणं केलं नाही. कारण बंदिवासातून आलेल्या लोकांच्या अविश्‍वासूपणामुळे तो खूप दुःखी होता.+ ७  मग, सबंध यहूदामध्ये आणि यरुशलेममध्ये अशी घोषणा करण्यात आली, की बंदिवासातून परत आलेल्या सर्वांनी यरुशलेममध्ये एकत्र जमावं. ८  अधिकाऱ्‍यांनी आणि वडीलजनांनी घेतलेल्या निर्णयाप्रमाणे, जो कोणी तीन दिवसांत येणार नाही त्याची सर्व मालमत्ता जप्त केली जाईल आणि त्याला बंदिवासातून परत आलेल्यांच्या मंडळीतून हद्दपार केलं जाईल.+ ९  तेव्हा तीन दिवसांच्या आत, म्हणजे नवव्या महिन्याच्या २० व्या दिवशी, यहूदा आणि बन्यामीन वंशातले सर्व पुरुष यरुशलेममध्ये एकत्र जमले. ते सर्व खऱ्‍या देवाच्या मंदिराच्या अंगणात बसले होते. या प्रश्‍नाच्या गंभीरतेमुळे आणि मुसळधार पावसामुळे ते सर्व थरथरत होते. १०  मग एज्रा याजक उठला आणि त्यांना म्हणाला: “विदेशी स्त्रियांशी लग्नं करून तुम्ही देवाशी अविश्‍वासूपणे वागला आहात.+ आणि यामुळे इस्राएलच्या अपराधांमध्ये भर पडली आहे. ११  म्हणून आता तुमच्या वाडवडिलांचा देव यहोवा याच्यासमोर आपलं पाप कबूल करा आणि त्याच्या इच्छेप्रमाणे वागा. इतर राष्ट्रांच्या लोकांपासून आणि या विदेशी स्त्रियांपासून स्वतःला वेगळं करा.”+ १२  यावर मंडळीतले सर्व लोक मोठ्या आवाजात म्हणाले: “तू म्हणतोस तसंच आम्ही करू. १३  पण पावसाळा सुरू आहे, म्हणून बाहेर उभं राहणं शक्य नाही आणि लोकही बरेच आहेत. शिवाय, हा प्रश्‍न एकदोन दिवसांत सुटणारा नाही, कारण आमच्यापैकी बऱ्‍याच लोकांनी हे पाप केलंय. १४  तेव्हा आता सबंध मंडळीच्या वतीने आमच्या अधिकाऱ्‍यांना हे काम पाहू दे;+ म्हणजे आमच्या शहरांत, ज्यांनी विदेशी स्त्रियांशी लग्नं केली आहेत, ते सर्व आपापल्या शहरातल्या वडीलजनांसोबत आणि न्यायाधीशांसोबत ठरलेल्या वेळी इथे येतील. अशा प्रकारे, या पापामुळे आमच्यावर भडकलेला देवाचा क्रोध शांत होईल.” १५  या गोष्टीला, असाएलचा मुलगा योनाथान आणि तिकवाचा मुलगा यहज्या यांनी विरोध केला आणि मशुल्लाम व शब्बथई+ या लेव्यांनी त्यांना साथ दिली. १६  पण बंदिवासातून परत आलेल्या लोकांनी ठरवल्याप्रमाणे केलं. मग फक्‍त एज्रा याजक आणि ज्यांच्या नावांची नोंद होती ते कुळांचे प्रमुख, दहाव्या महिन्याच्या पहिल्या दिवशी या प्रश्‍नाबद्दल चौकशी करण्यासाठी एकत्र आले. १७  मग ज्या पुरुषांनी विदेशी बायका केल्या होत्या, त्या सर्वांबद्दलचा निर्णय त्यांनी पहिल्या महिन्याच्या पहिल्या दिवसापर्यंत दिला. १८  तेव्हा असं दिसून आलं, की याजकांच्या मुलांपैकी काही जणांनी विदेशी स्त्रियांशी लग्न केलं होतं.+ त्यांत येशूवाच्या+ मुलांपैकी यहोसादाकचा मुलगा आणि त्याचे भाऊ, म्हणजे मासेया, अलियेजर, यारिब आणि गदल्या हे होते. १९  पण त्यांनी आपल्या बायकांना परत पाठवण्याचं, तसंच आपल्या दोषासाठी, कळपातून एकेक मेंढा अर्पण करण्याचंही वचन दिलं.*+ २०  दोषी असलेल्यांपैकी इतरांची नावं पुढीलप्रमाणे होती: इम्मेरच्या मुलांपैकी+ हनानी आणि जबद्याह; २१  हारीमच्या मुलांपैकी+ मासेया, एलीया, शमाया, यहीएल आणि उज्जीया; २२  पशहूरच्या मुलांपैकी+ एल्योवेनय, मासेया, इश्‍माएल, नथनेल, योजाबाद आणि एलासाह. २३  लेव्यांपैकी दोषी असलेल्यांची नावं पुढीलप्रमाणे होती: योजाबाद, शिमी, कलाया (म्हणजेच कलीता), पथायाह, यहूदा आणि अलियेजर; २४  आणि गायकांपैकी एल्याशीब व द्वारपालांपैकी शल्लूम, तेलेम आणि उरी हेही दोषी होते. २५  इतर इस्राएली लोकांपैकी दोषी असलेल्यांची नावं पुढीलप्रमाणे होती: परोशच्या मुलांपैकी+ रमीयाह, यिज्जीया, मल्कीया, मियामीन, एलाजार, मल्कीया आणि बनाया; २६  एलामच्या मुलांपैकी+ मत्तन्याह, जखऱ्‍या, यहीएल,+ अब्दी, यरेमोथ आणि एलीया; २७  जत्तूच्या मुलांपैकी+ एल्योवेनय, एल्याशीब, मत्तन्याह, यरेमोथ, जाबाद आणि अजीजा; २८  बेबाईच्या मुलांपैकी+ यहोहानान, हनन्या, जब्बइ आणि अथलइ; २९  बानीच्या मुलांपैकी मशुल्लाम, मल्लूख, अदाया, याशूब, शाल आणि यरेमोथ; ३०  पहथ-मवाबच्या मुलांपैकी+ अदना, कलाल, बनाया, मासेया, मत्तन्याह, बसालेल, बिन्‍नुई आणि मनश्‍शे; ३१  हारीमच्या मुलांपैकी+ अलियेजर, इश्‍शीयाह, मल्कीया,+ शमाया, शिमोन, ३२  बन्यामीन, मल्लूख आणि शमरयाह; ३३  हाशूमच्या मुलांपैकी+ मत्तनई, मत्तथा, जाबाद, अलीफलेट, यरेमई, मनश्‍शे आणि शिमी; ३४  बानीच्या मुलांपैकी मादइ, अम्राम, ऊएल, ३५  बनाया, बेदया, कलूही, ३६  वन्याह, मरेमोथ, एल्याशीब, ३७  मत्तन्याह, मत्तनई आणि यासू; ३८  बिन्‍नुईच्या मुलांपैकी शिमी, ३९  शलेम्याह, नाथान, अदाया, ४०  मखनदबइ, शाशइ, शारइ, ४१  अजरेल, शलेम्याह, शमरयाह, ४२  शल्लूम, अमऱ्‍या आणि योसेफ; ४३  नबोच्या माणसांपैकी ईयेल, मत्तिथ्या, जाबाद, जबीना, इद्दो, योएल आणि बनाया. ४४  या सर्वांनी विदेशी बायका केल्या होत्या,+ पण त्यांनी आपल्या विदेशी बायकांना त्यांच्या मुलांसोबत परत पाठवलं.+

तळटीपा

किंवा “स्त्रियांना आपल्या घरात घेऊन.”
किंवा “जेवणाच्या खोलीत.”
शब्दशः “त्यांनी आपले हात दिले.”