एज्रा ३:१-१३

  • वेदी पुन्हा बांधून बलिदानं दिली जातात (१-७)

  • मंदिराची पुनर्बांधणी सुरू होते (८, ९)

  • मंदिराचा पाया घातला जातो (१०-१३)

 इस्राएली लोक* आपापल्या शहरांमध्ये राहू लागल्यावर, सातव्या महिन्याच्या+ सुरुवातीला ते सर्व यरुशलेममध्ये एकमताने जमा झाले. २  खऱ्‍या देवाचा सेवक मोशे याच्या नियमशास्त्रात लिहिल्याप्रमाणे होमार्पणं देता यावीत,+ म्हणून यहोसादाकचा मुलगा येशूवा,+ त्याच्यासोबतचे याजक, तसंच, शल्तीएलचा+ मुलगा जरूब्बाबेल+ आणि त्याचे भाऊ यांनी मिळून इस्राएलच्या देवाची वेदी बांधली. ३  आजूबाजूच्या देशांतल्या लोकांची भीती असूनही,+ त्यांनी ती वेदी तिच्या मूळ ठिकाणी बांधली. ते दररोज तिच्यावर यहोवाला सकाळची आणि संध्याकाळची होमार्पणं देऊ लागले.+ ४  मग नियमशास्त्रात सांगितल्याप्रमाणे, त्यांनी मंडपांचा* सण साजरा केला+ आणि प्रत्येक दिवसासाठी जितकी होमार्पणं सांगितली होती, तितकी त्यांनी दररोज दिली.+ ५  यानंतर त्यांनी नियमित होमार्पणं,+ नवचंद्राच्या दिवशी* द्यायची अर्पणं,+ यहोवाच्या सर्व पवित्र सणांच्या वेळी द्यायची अर्पणं,+ शिवाय, लोकांनी यहोवासाठी स्वेच्छेने आणलेली अर्पणंही+ दिली. ६  यहोवाच्या मंदिराचा पाया अजून घालण्यात आला नव्हता, तरीही त्यांनी सातव्या महिन्याच्या पहिल्या दिवसापासूनच+ यहोवासाठी होमार्पणं द्यायला सुरुवात केली. ७  त्यांनी दगड फोडणाऱ्‍यांना+ आणि कारागिरांना+ पैसे दिले. तसंच, पर्शियाचा राजा कोरेश+ याने परवानगी दिल्याप्रमाणे, त्यांनी सीदोनच्या आणि सोरच्या लोकांना लबानोनवरून यापो इथे समुद्रमार्गाने देवदाराची लाकडं आणण्याच्या+ मोबदल्यात, खाण्यापिण्याच्या वस्तू आणि तेल दिलं. ८  जिथे खऱ्‍या देवाचं मंदिर होतं, त्या यरुशलेममध्ये आल्याच्या दुसऱ्‍या वर्षाच्या दुसऱ्‍या महिन्यात, शल्तीएलचा मुलगा जरूब्बाबेल, यहोसादाकचा मुलगा येशूवा, त्यांचे बाकीचे सगळे भाऊ, याजक व लेवी आणि बंदिवासातून यरुशलेमला आलेले सर्व लोक+ यांनी कामाला सुरुवात केली. त्यांनी २० वर्षं आणि त्यापेक्षा जास्त वयाच्या लेव्यांना यहोवाच्या मंदिराच्या कामावर देखरेख करण्यासाठी नेमलं. ९  तेव्हा येशूवा, त्याची मुलं व त्याचे भाऊ, कदमीएल व त्याची मुलं, तसंच यहूदाची मुलं, हे सर्व जण एकत्र येऊन खऱ्‍या देवाच्या मंदिराचं काम करणाऱ्‍यांवर देखरेख करू लागले. त्यांच्यासोबत लेवी वंशातल्या हेनादादची मुलं,+ त्यांची मुलं व त्यांचे भाऊ होते. १०  बांधकाम करणाऱ्‍यांनी जेव्हा यहोवाच्या मंदिराचा पाया घातला,+ तेव्हा याजक आपली खास वस्त्रं घालून आणि हातात कर्णे घेऊन,+ तसंच, लेव्यांपैकी आसाफची मुलं हातात झांजा घेऊन, इस्राएलचा राजा दावीद याने ठरवलेल्या पद्धतीप्रमाणे यहोवाची स्तुती करायला उभी राहिली.+ ११  मग, एक गट गाऊ लागला आणि दुसरा त्याला प्रतिसाद देऊ लागला.+ त्यांनी असं म्हणून यहोवाची उपकारस्तुती केली: “तो चांगला आहे, इस्राएलबद्दल त्याचं एकनिष्ठ प्रेम सर्वकाळ टिकून राहतं.”+ तेव्हा सर्व लोकांनी मोठ्या आवाजात यहोवाची स्तुती केली, कारण यहोवाच्या मंदिराचा पाया घालण्यात आला होता. १२  याजक, लेवी आणि कुळांचे प्रमुख यांच्यापैकी ज्यांनी जुनं मंदिर पाहिलं होतं,+ अशा वृद्धांनी जेव्हा या मंदिराचा पाया घातला जात असताना पाहिलं, तेव्हा ते मोठमोठ्याने रडू लागले. तर, इतर लोक आनंदाने जयजयकार करू लागले.+ १३  लोकांना जयजयकाराच्या आणि रडण्याच्या आवाजांत फरक करता येत नव्हता. कारण लोक इतक्या मोठ्याने ओरडत होते, की त्यांचा आवाज दूरपर्यंत ऐकू येत होता.

तळटीपा

शब्दशः “इस्राएलची मुलं.”
किंवा “तात्पुरत्या आश्रयांचा.”
चंद्राची पहिली कोर दिसते तो दिवस.