एस्तेर १:१-२२

  • शूशनमध्ये राजा अहश्‍वेरोशने ठेवलेली मेजवानी (१-९)

  • राणी वश्‍ती राजाज्ञा पाळत नाही (१०-१२)

  • राजा आपल्या ज्ञानी लोकांचा सल्ला घेतो (१३-२०)

  • राजाचं फर्मान पाठवण्यात येतं (२१, २२)

 अहश्‍वेरोश* राजाच्या काळात घडलेली ही घटना. त्याचं साम्राज्य हिंदुस्थानापासून इथियोपियापर्यंत* १२७ प्रांतांत+ पसरलेलं होतं. २  त्या काळात अहश्‍वेरोश राजा शूशन*+ राजवाड्यातून राज्य करायचा. ३  आपल्या शासनकाळाच्या तिसऱ्‍या वर्षी, त्याने आपल्या सगळ्या प्रधानांसाठी आणि अधिकाऱ्‍यांसाठी एक शाही मेजवानी ठेवली. त्या मेजवानीला पर्शिया+ आणि मेदचे+ सेनापती, मोठमोठे अधिकारी आणि सर्व प्रांतांचे राज्यपाल आले होते. ४  राजा त्यांना १८० दिवसांपर्यंत आपल्या वैभवशाली साम्राज्याची धनदौलत, ऐश्‍वर्य आणि शाही थाट दाखवत राहिला. ५  हे दिवस संपल्यावर राजाने शूशन* राजवाड्यात असलेल्या सगळ्या लहान-थोरांसाठी सात दिवस मेजवानी दिली. ही मेजवानी राजवाड्यातल्या अंगणात ठेवण्यात आली होती. ६  संपूर्ण अंगण मलमलीच्या* पांढऱ्‍या पडद्यांनी, तसंच शुद्ध सुताच्या आणि निळ्या पडद्यांनी सजवलेलं होतं. हे पडदे पांढऱ्‍या सुताच्या आणि जांभळ्या लोकरीच्या दोरांनी बांधलेले असून, ते संगमरवरी खांबांवर असलेल्या चांदीच्या गोल कड्यांमध्ये लटकवलेले होते. तसंच लाल दगडांनी, मोत्यांनी आणि पांढऱ्‍या व काळ्या संगमरवरी दगडांनी बनवलेल्या फरशीवर बसण्यासाठी सोन्या-चांदीचे दिवाण ठेवले होते. ७  द्राक्षारस सोन्याच्या प्याल्यांमध्ये दिला जात होता आणि प्रत्येक प्याला हा वेगळा होता. तसंच शाही द्राक्षारसाची रेलचेल राजाला शोभेल अशीच होती. ८  कोणावरही द्राक्षारस पिण्याची सक्‍ती केली जात नव्हती;* तसा नियमच त्या प्रसंगासाठी देण्यात आला होता. कारण प्रत्येकाला आपल्या मनासारखं करू द्यावं असा हुकूम स्वतः राजाने आपल्या महालातल्या कारभाऱ्‍यांना दिला होता. ९  राणी वश्‍तीनेसुद्धा+ अहश्‍वेरोश राजाच्या महालात स्त्रियांसाठी मेजवानी ठेवली. १०  सातव्या दिवशी राजा द्राक्षारस पिऊन अतिशय खूश होता. तेव्हा त्याने त्याच्या सेवेला नेहमी हजर असलेल्या सात अधिकाऱ्‍यांना, म्हणजे महूमान, बिजथा, हरबोना,+ बिगथा, अबगथा, जेथर आणि कर्खस यांना अशी आज्ञा दिली, की ११  त्यांनी राणी वश्‍तीला शाही मुकुट घालून त्याच्यापुढे आणावं. राजाला तिचं सौंदर्य जमलेल्या सगळ्या लोकांना आणि अधिकाऱ्‍यांना दाखवायचं होतं. कारण ती खूप सुंदर होती. १२  पण अधिकाऱ्‍यांद्वारे दिलेल्या राजाज्ञेप्रमाणे राजासमोर यायला राणी वश्‍ती नकार देत राहिली. तेव्हा राजाला खूप राग आला आणि त्याच्या तळपायाची आग मस्तकात गेली. १३  मग राजाने, पूर्वी घडून गेलेल्या अशा प्रकारच्या घटनांची माहिती असलेल्या ज्ञानी लोकांसोबत सल्लामसलत केली. (कारण कायद्याचे आणि न्यायाचे जाणकार असलेल्यांसमोर राजा अशाच प्रकारे आपले प्रश्‍न मांडायचा. १४  त्यांपैकी कर्शना, शेथार, अदमाथा, तार्शीश, मेरेस, मर्सना आणि ममुखान हे राजाचे खास सल्लागार होते. पर्शिया आणि मेदचे हे सात अधिकारी+ उच्च पदावर असून नेहमी राजाच्या सेवेला हजर असायचे.) १५  राजा त्यांना म्हणाला: “राजा अहश्‍वेरोशने आपल्या अधिकाऱ्‍यांद्वारे दिलेली आज्ञा राणी वश्‍तीने पाळली नाही. मग आता कायद्यानुसार तिच्या बाबतीत काय करायला हवं?” १६  त्यावर ममुखानने राजाला आणि अधिकाऱ्‍यांना म्हटलं: “राणी वश्‍तीने जो अपराध केलाय+ तो फक्‍त राजाविरुद्धच नाही, तर अहश्‍वेरोश राजाच्या सर्व प्रांतांतल्या अधिकाऱ्‍यांविरुद्ध आणि सगळ्या लोकांविरुद्ध केलाय. १७  कारण राणीने जे केलंय ते राज्यातल्या सगळ्या बायकांना समजल्यावर त्यासुद्धा आपल्या नवऱ्‍यांना तुच्छ लेखतील आणि म्हणतील: ‘राजा अहश्‍वेरोशने राणी वश्‍तीला आपल्यासमोर बोलावलं, तेव्हा तिने तरी कुठे ऐकलं?’ १८  पर्शिया आणि मेदमधल्या अधिकाऱ्‍यांच्या ज्या बायकांना राणीचं हे वागणं माहीत आहे, त्यासुद्धा आपल्या नवऱ्‍यांशी तसंच बोलतील. आणि त्यामुळे तिरस्काराची आणि संतापाची लाट उसळेल. १९  आता राजाला जर योग्य वाटत असेल, तर त्याने एक शाही फर्मान काढावं. आणि त्याची नोंद कधीही न बदलणाऱ्‍या पर्शियाच्या व मेदच्या कायद्यात करावी.+ त्या फर्मानानुसार वश्‍तीने पुन्हा कधीही अहश्‍वेरोश राजासमोर येऊ नये; आणि तिच्यापेक्षा चांगली अशी एक स्त्री राजाने तिच्या जागी राणी म्हणून निवडावी. २०  राजाचं हे फर्मान जेव्हा संपूर्ण साम्राज्यात जाहीर केलं जाईल, तेव्हा सगळ्या बायका आपल्या नवऱ्‍यांचा आदर करतील; मग त्यांचे नवरे कोणत्याही पदावर असले तरीही.” २१  ममुखानचा हा सल्ला राजाला आणि अधिकाऱ्‍यांना पटला आणि राजाने त्याप्रमाणे केलं. २२  राजाने आपल्या सर्व प्रांतांत पत्रं पाठवली.+ त्याने प्रत्येक प्रांतातल्या लोकांना त्यांच्या भाषेत आणि त्यांच्या लिपीत पत्रं पाठवली. पत्रात असं लिहिलं होतं, की प्रत्येक नवऱ्‍याने आपल्या घरावर अधिकार चालवावा आणि त्याच्या घरात त्याचीच भाषा बोलली जावी.

तळटीपा

असं मानलं जातं, की हा महान दारयावेश (दारयावेश हिस्टास्पिस) राजाचा मुलगा झेरेक्सिस पहिला असावा.
किंवा “कूशपर्यंत.”
किंवा “सूसा.”
किंवा “सूसा.”
किंवा “कोणी किती द्राक्षारस प्यावा यावर कोणतीही मर्यादा नव्हती.”