एस्तेर २:१-२३

  • नव्या राणीचा शोध (१-१४)

  • एस्तेर राणी बनते (१५-२०)

  • मर्दखय कट उधळून लावतो (२१-२३)

 या गोष्टी घडल्यावर काही काळाने राजा अहश्‍वेरोशचा+ राग शांत झाला. मग वश्‍तीने जे काही केलं होतं+ आणि तिच्या बाबतीत जे ठरवण्यात आलं होतं+ त्यावर राजा विचार करू लागला. २  तेव्हा राजाच्या खास सेवकांनी त्याला सुचवलं, की “राजासाठी तरुण आणि सुंदर कुमारींचा शोध केला जावा. ३  त्यासाठी राजाने आपल्या सगळ्या प्रांतांत अधिकारी नेमावेत.+ म्हणजे ते राज्यातल्या सगळ्या सुंदर, तरुण कुमारींना शूशन* राजवाड्यात घेऊन येतील. त्या तरुणींना राजाचा सेवक* आणि स्त्रियांचा रक्षक हेगे+ याच्या देखरेखीखाली स्त्रियांच्या कक्षात ठेवलं जावं आणि सुगंधी तेलांनी त्यांच्यावर सौंदर्य-उपचार करण्यात यावेत. ४  मग त्यांच्यापैकी जी मुलगी राजाला सगळ्यात जास्त आवडेल तिला वश्‍तीच्या जागी राणी बनवावं.”+ राजाला त्यांचं हे म्हणणं पटलं आणि त्याने तसंच केलं. ५  त्या वेळी शूशन*+ राजवाड्यात मर्दखय+ नावाचा एक यहुदी माणूस होता. तो बन्यामीन+ वंशातला असून याईरचा मुलगा होता; याईर शिमीचा, तर शिमी हा कीशचा मुलगा होता. ६  बाबेलचा* राजा नबुखद्‌नेस्सर याने यहूदाचा राजा यखन्या*+ याच्यासोबत ज्या लोकांना यरुशलेममधून बंदी बनवून नेलं होतं त्यांपैकी तो* एक होता. ७  मर्दखयने आपल्या काकांची मुलगी हदस्सा,* म्हणजे एस्तेर हिचं पालनपोषण केलं होतं;+ कारण ती अनाथ होती. तिच्या आईवडिलांच्या मृत्यूनंतर मर्दखयने तिचा आपली मुलगी म्हणून सांभाळ केला होता. ती दिसायला अतिशय सुंदर आणि बांधेसूद होती. ८  राजाचं फर्मान आणि त्याचा हुकूम जाहीर झाल्यानंतर जेव्हा अनेक तरुण मुलींना शूशन* राजवाड्यात आणून हेगेच्या+ देखरेखीखाली सोपवण्यात आलं, तेव्हा एस्तेरलाही राजाच्या महालात आणण्यात आलं, आणि स्त्रियांचा रक्षक असलेल्या हेगेच्या देखरेखीखाली सोपवण्यात आलं. ९  हेगेला एस्तेर आवडली आणि तो तिच्यावर प्रसन्‍न झाला.* त्यामुळे त्याने लगेच तिच्या सौंदर्य-उपचारांची आणि आहाराची व्यवस्था केली.+ एस्तेरला काय हवं काय नको ते पाहण्यासाठी त्याने राजाच्या महालातल्या सात तरुण स्त्रिया तिच्यासोबत ठेवल्या. इतकंच नाही, तर हेगेने तिला आणि तिच्या तरुण सेविकांना स्त्रियांच्या कक्षातली सगळ्यात चांगली जागासुद्धा राहायला दिली. १०  एस्तेरने आपल्या लोकांबद्दल किंवा नातेवाइकांबद्दल कोणालाही काही सांगितलं नाही;+ कारण मर्दखयने+ तिला तशी सूचना दिली होती.+ ११  एस्तेरचं कसं काय चाललं आहे आणि तिच्या बाबतीत काय होत आहे, हे जाणून घेण्यासाठी मर्दखय स्त्रियांच्या कक्षाच्या अंगणासमोर रोज फेऱ्‍या घालायचा. १२  सौंदर्य-उपचार झाल्यानंतर मुलींना आळीपाळीने अहश्‍वेरोश राजापुढे जावं लागायचं. सौंदर्य-उपचाराचा हा काळ १२ महिन्यांचा असायचा; सहा महिने गंधरसाचं तेल+ आणि सहा महिने बाल्सम* तेल+ व वेगवेगळ्या प्रकारची सौंदर्य प्रसाधनं लावून प्रत्येक मुलीचं रंगरूप खुलवलं जायचं. १३  मग राजासमोर जाण्यासाठी ती तयार असायची. स्त्रियांच्या कक्षातून राजकक्षात राजासमोर जाताना ती जे काही मागायची ते तिला दिलं जायचं. १४  ती संध्याकाळी राजकक्षात जायची आणि सकाळी शाशगजच्या देखरेखीखाली असलेल्या स्त्रियांच्या दुसऱ्‍या कक्षात यायची. शाशगज हा राजाचा सेवक*+ आणि त्याच्या उपपत्नींचा रक्षक होता. राजाने त्या मुलीवर प्रसन्‍न होऊन आणि तिचं नाव घेऊन बोलावल्याशिवाय ती परत कधीही त्याच्याकडे जायची नाही.+ १५  मग एस्तेरची राजापुढे जाण्याची पाळी आली. एस्तेर ही मर्दखयचा काका अबीहईल याची मुलगी होती आणि मर्दखयने तिला आपली मुलगी म्हणून सांभाळलं होतं.+ राजापुढे जाताना, स्त्रियांचा रक्षक आणि राजाचा सेवक* हेगे याने एस्तेरला जे काही दिलं होतं, त्यापेक्षा जास्त तिने काहीही मागितलं नाही. (या काळात ज्यांनी ज्यांनी एस्तेरला पाहिलं त्या सर्वांना ती आवडली.) १६  अहश्‍वेरोश राजाच्या शासनकाळाच्या सातव्या वर्षी दहाव्या महिन्यात, म्हणजे तेबेथ* महिन्यात एस्तेरला शाही महालात राजासमोर नेण्यात आलं.+ १७  राजाला एस्तेर पसंत पडली. तो तिच्यावर खूप प्रसन्‍न झाला आणि इतर सर्व कुमारींपेक्षा ती त्याला जास्त आवडली.* म्हणून त्याने तिच्या डोक्यावर शाही मुकुट ठेवला आणि वश्‍तीच्या जागी+ तिला राणी बनवलं.+ १८  मग राजाने खास एस्तेरच्या सन्मानात आपल्या सगळ्या अधिकाऱ्‍यांना आणि सेवकांना एक मोठी मेजवानी दिली. तसंच, त्या प्रसंगी त्याने आपल्या सर्व प्रांतांत माफीचा ठराव* जाहीर केला आणि आपल्या राजेशाही थाटाला शोभेल अशी बक्षिसं दिली. १९  सगळ्या कुमारींना+ दुसऱ्‍या वेळी एकत्र केलं गेलं, तेव्हा मर्दखय राजमहालाच्या दरवाजाजवळ बसला होता.* २०  मर्दखयने एस्तेरला सूचना दिली होती त्याप्रमाणे तिने आपल्या लोकांबद्दल किंवा नातेवाइकांबद्दल कोणालाही काही सांगितलं नाही.+ मर्दखय तिचा सांभाळ करत असताना ती जसं त्याचं ऐकायची, तसंच पुढेही ती त्याच्या आज्ञेत राहिली.+ २१  मर्दखय राजमहालाच्या दरवाजाजवळ बसायचा त्या काळात राजाच्या द्वारपालांपैकी बिग्थान आणि तेरेश हे दोन दरबारी भडकले आणि त्यांनी अहश्‍वेरोश राजाला मारून टाकण्याचा कट रचला. २२  पण, मर्दखयला ही गोष्ट समजली आणि त्याने लगेच एस्तेर राणीला त्याबद्दल सांगितलं. तेव्हा एस्तेर मर्दखयच्या वतीने राजाशी बोलली. २३  या गोष्टीची चौकशी करण्यात आली तेव्हा ती खरी असल्याचं समजलं. मग त्या दोन्ही माणसांना वधस्तंभांवर लटकवण्यात आलं. आणि या सगळ्या गोष्टी राजासमोर त्या काळातल्या इतिहासाच्या ग्रंथात लिहून ठेवण्यात आल्या.+

तळटीपा

किंवा “सूसा.”
शब्दशः “षंढ.” शब्दार्थसूचीत “षंढ” पाहा.
किंवा “सूसा.”
किंवा “बॅबिलॉनचा.”
२रा २४:८ मध्ये याला यहोयाखीन असं म्हटलं आहे.
हा कीश किंवा मर्दखय असू शकतो.
म्हणजे, “पांढऱ्‍या सुंदर सुगंधी फुलांचं सदाहरित झाड.”
किंवा “सूसा.”
किंवा “एकनिष्ठ प्रेम करू लागला.”
शब्दशः “षंढ.”
शब्दशः “षंढ.”
किंवा “तो तिच्यावर एकनिष्ठ प्रेम करू लागला.”
हा कदाचित कर-माफीला किंवा राजकीय कैद्यांच्या सुटकेला किंवा या दोन्ही गोष्टींना सूचित करत असावा.
किंवा “एक राजदरबारी होता.”