एस्तेर ४:१-१७

  • मर्दखय शोक करतो (१-५)

  • मर्दखय एस्तेरला मदत मागतो (६-१७)

 मर्दखयने+ या सगळ्या गोष्टी ऐकल्या+ तेव्हा त्याने दुःखाने आपले कपडे फाडले आणि गोणपाट* घालून अंगाला राख फासली. मग तो शहराच्या मध्यभागी गेला आणि मोठमोठ्याने आक्रोश करून रडू लागला. २  तो तसाच राजमहालाच्या दरवाजापर्यंत आला. पण तो आत गेला नाही, कारण गोणपाट घालून कोणालाही दरवाजाच्या आत जाण्याची परवानगी नव्हती. ३  राजाचा हुकूम आणि फर्मान ज्या-ज्या प्रांतात+ पोहोचला तिथे यहुदी लोकांमध्ये शोककळा पसरली. ते उपास करू लागले+ आणि आक्रोश करून मोठमोठ्याने रडू लागले. कित्येक जण गोणपाट घालून राखेत पडून राहिले.+ ४  एस्तेरच्या सेवकांनी* आणि सेविकांनी ही गोष्ट तिला येऊन सांगितली तेव्हा राणी अतिशय दुःखी झाली. मर्दखयने गोणपाटाऐवजी कपडे घालावेत म्हणून तिने त्याच्यासाठी कपडे पाठवले. पण त्याने ते घेतले नाहीत. ५  तेव्हा एस्तेरने राजाच्या एका सेवकाला,* हथाकला बोलावून घेतलं; राजाने त्याला तिच्या सेवेसाठी नेमलं होतं. एस्तेरने हथाकला अशी आज्ञा दिली, की त्याने मर्दखयकडे जाऊन तो असं का करत आहे आणि नेमकं काय घडलं आहे याची चौकशी करावी. ६  म्हणून हथाक राजमहालासमोर असलेल्या शहराच्या चौकात मर्दखयकडे गेला. ७  तेव्हा, आपल्यावर कोणतं संकट ओढवलं आहे आणि यहुदी लोकांचा नाश करण्यासाठी+ हामानने राजाच्या खजिन्यात नेमकी किती रक्कम+ जमा करण्याचं कबूल केलं आहे, ते सर्व मर्दखयने हथाकला सांगितलं. ८  तसंच, शूशनमध्ये*+ यहुद्यांचा समूळ नाश करण्याची जी राजाज्ञा देण्यात आली होती त्याची एक प्रतही त्याने त्याला दिली. मर्दखयने हथाकला सांगितलं, की त्याने जाऊन एस्तेरला ती प्रत दाखवावी आणि तिला परिस्थितीची कल्पना द्यावी.+ तसंच तिला असंही सांगावं, की तिने स्वतः राजाकडे जाऊन आपल्या लोकांसाठी दयेची भीक मागावी. ९  मग हथाक एस्तेरकडे परत आला आणि मर्दखयने सांगितलेल्या सगळ्या गोष्टी त्याने तिला सांगितल्या. १०  तेव्हा एस्तेरने मर्दखयसाठी+ हथाकजवळ असा निरोप पाठवला: ११  “राजाच्या सगळ्या सेवकांना आणि त्याच्या प्रांतातल्या सगळ्या लोकांना हे चांगलं माहीत आहे, की कोणतीही स्त्री किंवा कोणताही पुरुष राजाने बोलावल्याशिवाय आतल्या अंगणात राजाकडे गेला,+ तर त्याच्या बाबतीत एकच कायदा लागू होतो; तो म्हणजे मृत्युदंड! राजाने जर आपला सोन्याचा राजदंड+ त्याच्यापुढे केला, तरच तो जिवंत राहू शकतो. आणि मला तर गेल्या ३० दिवसांपासून राजाकडून बोलावणंही आलेलं नाही.” १२  एस्तेरचा हा निरोप मर्दखयला कळवण्यात आला, १३  तेव्हा त्याने एस्तेरला म्हटलं: “असं समजू नकोस, की तू राजाच्या घराण्यातली आहेस म्हणून वाचशील आणि इतर यहुद्यांसोबत तुझा नाश होणार नाही. १४  कारण आता जर तू शांत बसलीस, तर कोणत्या ना कोणत्या मार्गाने यहुद्यांची सुटका आणि उद्धार तर होईलच.+ पण तुझा आणि तुझ्या वडिलांच्या घराण्याचा मात्र नाश होईल. आणि कोण जाणे, कदाचित अशाच प्रसंगासाठी तुला राणीपद मिळालं असेल?”+ १५  मग एस्तेरने मर्दखयला असा निरोप पाठवला: १६  “जाऊन शूशनमधल्या* सगळ्या यहुद्यांना जमवा आणि माझ्यासाठी उपास करा.+ तीन दिवस आणि तीन रात्र काहीही खाऊपिऊ नका.+ मी आणि माझ्या सेविकासुद्धा उपास करू. नंतर मी राजाकडे जाईन; मग ते कायद्याविरुद्ध असलं तरीही. आणि त्यामुळे मला मरावं लागलं तरी चालेल.” १७  तेव्हा मर्दखय निघाला आणि एस्तेरने त्याला जे काही करायला सांगितलं होतं ते सर्व त्याने केलं.

तळटीपा

शब्दशः “षंढ.”
शब्दशः “षंढ.”
किंवा “सूसामध्ये.”
किंवा “सूसामधल्या.”