एस्तेर ६:१-१४

  • राजा मर्दखयचा सन्मान करतो (१-१४)

 त्या रात्री राजाला झोप येत नव्हती.* म्हणून त्याने त्या काळातला इतिहासाचा ग्रंथ मागवला+ आणि तो त्याच्यापुढे वाचण्यात आला. २  त्यात असं लिहिलं होतं, की अहश्‍वेरोश राजाला मारून टाकण्याचा कट रचणाऱ्‍या दोन दरबाऱ्‍यांची, म्हणजे बिग्थान आणि तेरेश या द्वारपालांची मर्दखयने खबर दिली होती.+ ३  तेव्हा राजाने विचारलं: “यासाठी मर्दखयचा मानसन्मान केला होता का? त्याला काही बक्षीस दिलं होतं का?” त्यावर राजाचे खास सेवक त्याला म्हणाले: “नाही, त्याच्यासाठी असं काहीही केलं नव्हतं.” ४  नंतर राजाने विचारलं: “अंगणात कोण आहे?” त्या वेळी हामान महालातल्या बाहेरच्या अंगणात+ आला होता. आपण तयार केलेल्या वधस्तंभावर मर्दखयला लटकवण्याची विनंती करायला तो राजाकडे आला होता.+ ५  तेव्हा सेवक राजाला म्हणाले: “अंगणात हामान+ उभा आहे.” त्यावर राजा म्हणाला: “त्याला आत बोलवा.” ६  हामान आत आला तेव्हा राजाने त्याला विचारलं: “राजाला जर कोणाचा मानसन्मान करायची इच्छा असेल, तर त्याने त्याच्यासाठी काय केलं पाहिजे?” हामान मनातल्या मनात म्हणाला: “मला सोडून राजाला आणखी कोणाचा मानसन्मान करायचा असेल?”+ ७  मग हामान राजाला म्हणाला: “राजाला ज्याचा मानसन्मान करायची इच्छा आहे, ८  त्याच्यासाठी राजा घालतो ती शाही वस्त्रं+ आणि राजा स्वारी करतो तो घोडा आणावा. त्या घोड्याचं डोकं शाही मुकुटाने सजवलेलं असावं. ९  त्यानंतर ती शाही वस्त्रं आणि तो घोडा राजाच्या एका मोठ्या अधिकाऱ्‍याकडे सोपवावा. मग राजाला ज्याचा सन्मान करायची इच्छा आहे त्याला राजाच्या सेवकांनी शाही वस्त्रं घालावीत आणि घोड्यावर बसवून शहराच्या चौकात फिरवावं. तसंच त्यांनी त्याच्यापुढे अशी घोषणा करावी: ‘राजाला ज्याचा सन्मान करायची इच्छा असते त्याचा असा सन्मान केला जातो!’”+ १०  त्यावर राजा हामानला म्हणाला: “लगेच जा! शाही वस्त्रं आणि घोडा घे आणि तू आता जे काही बोललास ते सगळं राजमहालाच्या दरवाजाजवळ बसलेल्या यहुदी मर्दखयसाठी कर. त्यातली एकही गोष्ट अपुरी ठेवू नकोस.” ११  म्हणून हामानने शाही वस्त्रं घेऊन ती मर्दखयला+ घातली आणि घोड्यावर बसवून त्याला शहरातल्या चौकात फिरवलं. त्याने त्याच्यापुढे अशी घोषणा केली: “राजाला ज्याचा सन्मान करायची इच्छा असते त्याचा असा सन्मान केला जातो!” १२  त्यानंतर मर्दखय परत राजमहालाच्या दरवाजाकडे गेला. पण हामान मात्र आपलं डोकं कपड्याने झाकून शोक करत घाईघाईने आपल्या घरी गेला. १३  आणि आपल्यासोबत जे काही घडलं होतं ते सर्व त्याने आपली बायको जेरेश+ आणि आपले सगळे मित्र यांना सांगितलं. तेव्हा त्याची बायको आणि त्याचे सल्लागार त्याला म्हणाले: “ज्या मर्दखयसमोर तुमचा पराभव होऊ लागला आहे, तो जर यहुदी वंशातला असेल, तर त्याच्यापुढे तुमचं काहीही चालणार नाही. तुम्ही नक्की अपयशी व्हाल.” १४  ते हामानशी बोलत होते इतक्यात राजाचे दरबारी तिथे आले आणि हामानला एस्तेरने ठेवलेल्या मेजवानीला घाईघाईने घेऊन गेले.+

तळटीपा

शब्दशः “राजाची झोप उडाली.”