एस्तेर ७:१-१०

  • एस्तेर हामानचं खरं रूप राजापुढे आणते (१-६क)

  • हामानने बनवलेल्या वधस्तंभावर त्यालाच लटकवण्यात येतं (६ख-१०)

 मग राजा आणि हामान+ हे दोघं एस्तेर राणीने ठेवलेल्या मेजवानीला आले. २  मेजवानीच्या या दुसऱ्‍या दिवशी जेव्हा द्राक्षारस दिला जात होता तेव्हा राजाने पुन्हा एकदा एस्तेरला विचारलं: “सांग तुला काय हवंय? तू जे मागशील ते तुला मिळेल. अगदी अर्धं राज्य जरी मागितलंस तरी ते मी तुला देईन. सांग काय हवंय?”+ ३  त्यावर एस्तेर राणी म्हणाली: “राजा जर माझ्यावर प्रसन्‍न असेल आणि राजाची जर इच्छा असेल, तर राजाने माझा आणि माझ्या लोकांचा+ जीव वाचवावा, इतकीच माझी विनंती आहे. ४  कारण मला आणि माझ्या लोकांना मारून टाकण्यासाठी आणि आमचा समूळ नाश करण्यासाठी आम्हाला विकण्यात आलंय.+ फक्‍त गुलाम म्हणून आम्हाला विकलं असतं, तर मी शांत बसले असते. पण आमच्यावर आलेल्या या संकटामुळे राजाचंही मोठं नुकसान होणार आहे. म्हणून राजाने कसंही करून हे संकट थांबवावं.” ५  त्यावर अहश्‍वेरोश राजा एस्तेर राणीला म्हणाला: “कोण आहे तो? कोणाची एवढी हिंमत झाली असं करायची?” ६  तेव्हा एस्तेर म्हणाली: “तो विरोधी आणि शत्रू दुसरा कोणी नाही; हा दुष्ट हामानच आहे!” हे ऐकून राजा आणि राणी यांच्यासमोर हामानचा भीतीने थरकाप उडाला. ७  राजा अतिशय संतापला आणि मेजवानीतून उठून राजमहालाच्या बागेत गेला. हामान मात्र आपला जीव वाचवण्यासाठी उठून एस्तेर राणीपुढे गयावया करू लागला. कारण राजा आता आपल्याला शिक्षा दिल्याशिवाय राहणार नाही हे हामानला कळून चुकलं होतं. ८  राजमहालाच्या बागेतून राजा परत मेजवानी-गृहात आला, तेव्हा हामान एस्तेरच्या दिवाणावर टेकलेला त्याला दिसला. तेव्हा राजा ओरडून म्हणाला: “आता हा माझ्याच घरात राणीवर जबरदस्तीही करणार काय?” राजाच्या तोंडून हे शब्द बाहेर पडले न पडले तोच हामानचं तोंड कपड्याने झाकण्यात आलं. ९  राजाच्या दरबाऱ्‍यांपैकी एक असलेला हरबोना+ हा राजाला म्हणाला: “ज्या मर्दखयमुळे राजाचा जीव वाचला,+ त्याच्यासाठी हामानने एक वधस्तंभही बनवलाय.+ तो ५० हात* उंचीचा वधस्तंभ हामानच्या घराजवळ उभा केलेला आहे.” तेव्हा राजा म्हणाला: “त्यावर यालाच लटकवून टाका.” १०  म्हणून हामानने मर्दखयसाठी जो वधस्तंभ बनवला होता, त्यावर त्यांनी हामानला लटकवलं. मग राजाचा राग शांत झाला.

तळटीपा

जवळजवळ २२.३ मी. (७३ फूट). अति. ख१४ पाहा.