एस्तेर ९:१-३२

  • यहुद्यांचा विजय (१-१९)

  • पुरीम सणाची सुरुवात (२०-३२)

 मग अदार* या १२ व्या महिन्याचा १३ वा दिवस उजाडला.+ त्या दिवशी राजाचा हुकूम आणि कायदा अंमलात आणायचा होता.+ यहुद्यांच्या शत्रूंना आशा होती, की ते यहुद्यांवर वरचढ ठरतील. पण घडलं उलटंच! कारण त्या दिवशी यहुदी लोकच त्यांचा द्वेष करणाऱ्‍यांवर वरचढ ठरले.+ २  अहश्‍वेरोश+ राजाच्या सगळ्या प्रांतांतले यहुदी, आपल्या जिवावर उठलेल्या शत्रूंशी लढण्यासाठी आपापल्या शहरांत एकत्र जमले. यहुद्यांपुढे कोणाचाही टिकाव लागला नाही, कारण सगळ्या लोकांना त्यांची दहशत बसली होती.+ ३  प्रांतांतल्या सगळ्या अधिकाऱ्‍यांनी, सुभेदारांनी,+ राज्यपालांनी आणि राजाचा कारभार पाहणाऱ्‍या सगळ्यांनी यहुद्यांना मदत केली. कारण त्या सर्वांना मर्दखयचा धाक वाटत होता. ४  राजमहालात मर्दखयला मोठं मानाचं स्थान होतं.+ आणि जसजसा त्याचा अधिकार वाढत गेला, तसतशी त्याची कीर्ती सर्व प्रांतांमध्ये पसरत गेली. ५  यहुद्यांनी आपल्या सगळ्या शत्रूंना तलवारीने मारलं आणि त्यांचा समूळ नाश केला. त्यांनी मनाला येईल तसं आपला द्वेष करणाऱ्‍यांचं केलं.+ ६  शूशन*+ राजवाड्यात यहुद्यांनी ५०० माणसांना ठार मारलं. ७  तसंच त्यांनी या माणसांनाही ठार मारलं: पर्शन्दाथा, दलफोन, अस्पाथा, ८  पोराथा, अदलिया, अरीदाथा, ९  पर्मश्‍ता, अरीसई, अरीदय आणि वैजाथा. १०  यहुद्यांचा शत्रू+ आणि हम्मदाथाचा मुलगा हामान याची ही दहा मुलं होती. पण त्यांना ठार मारल्यानंतर यहुद्यांनी त्यांची मालमत्ता मात्र लुटली नाही.+ ११  त्या दिवशी शूशन* राजवाड्यात एकूण किती लोक मारले गेले ती संख्या नंतर राजाला सांगण्यात आली. १२  मग राजा एस्तेर राणीला म्हणाला: “शूशन* राजवाड्यातच यहुद्यांनी ५०० माणसांना आणि हामानच्या दहा मुलांना मारून टाकलंय. तर मग राजाच्या इतर प्रांतांमध्ये त्यांनी आणखी किती लोकांना मारलं असेल?+ एस्तेर राणी, आता तुझी आणखी काही विनंती आहे का? तुला आणखी काही हवंय का? तू जे काही मागशील ते पूर्ण होईल.” १३  त्यावर एस्तेर म्हणाली: “राजाला जर हे ठीक वाटत असेल,+ तर राजाचा जो हुकूम आज लागू केला गेला तो उद्यासुद्धा शूशनमधल्या* यहुद्यांना लागू करायची परवानगी राजाने द्यावी.+ आणि हामानच्या दहा मुलांचे मृतदेह वधस्तंभांवर लटकवण्यात यावेत.”+ १४  तेव्हा राजाने तसं करण्याची आज्ञा दिली. मग शूशन* राजवाड्यात एक फर्मान काढलं गेलं आणि हामानच्या दहा मुलांचे मृतदेह वधस्तंभांवर लटकवण्यात आले. १५  शूशन* राजवाड्यातले यहुदी अदार महिन्याच्या १४ व्या दिवशी पुन्हा एकत्र आले+ आणि त्यांनी तिथल्या ३०० माणसांना ठार मारलं. पण त्यांनी त्यांची मालमत्ता मात्र लुटली नाही. १६  राजाच्या इतर प्रांतांतले यहुदीसुद्धा एकत्र जमले आणि स्वतःचा बचाव करण्यासाठी लढले.+ त्यांनी आपला द्वेष करणाऱ्‍या ७५,००० लोकांना ठार मारलं आणि आपल्या शत्रूंचा काटा काढला.+ पण त्यांनी त्यांची मालमत्ता मात्र लुटली नाही. १७  हे अदार महिन्याच्या १३ व्या दिवशी घडलं. १४ व्या दिवशी त्यांनी विश्रांती घेतली आणि मेजवान्या करून तो दिवस आनंदाने साजरा केला. १८  शूशनमधले* यहुदी १३ व्या+ आणि १४ व्या+ अशा दोन्ही दिवशी आपल्या शत्रूंशी लढण्यासाठी एकत्र आले. त्यांनी १५ व्या दिवशी विश्रांती घेतली आणि मेजवान्या करून तो दिवस आनंदाने साजरा केला. १९  बाकीच्या शहरांत राहणाऱ्‍या यहुद्यांनी अदार महिन्याच्या १४ व्या दिवशी मेजवान्या करून आनंदोत्सव साजरा केला.+ त्या दिवशी त्यांनी एकमेकांना खाण्यापिण्याच्या वस्तू पाठवल्या.+ २०  मर्दखयने+ या सगळ्या गोष्टी लिहून काढल्या. आणि त्याने अहश्‍वेरोश राजाच्या साम्राज्यातल्या जवळच्या आणि दूरच्या सर्व प्रांतांत राहणाऱ्‍या यहुद्यांना पत्रं पाठवली. २१  पत्रांत त्याने त्यांना अशी सूचना दिली, की त्यांनी दरवर्षी अदार महिन्यातला १४ वा आणि १५ वा दिवस सण म्हणून पाळावा. २२  कारण या दिवशी यहुद्यांना आपल्या शत्रूंपासून सुटका मिळाली. आणि त्या महिन्यात त्यांच्या दुःखाचं आनंदात आणि शोकाच्या+ दिवसाचं उत्सवाच्या दिवसात रूपांतर झालं. म्हणून या दिवशी यहुद्यांनी मेजवान्या करून आनंदोत्सव साजरा करावा. तसंच, एकमेकांना खाण्यापिण्याच्या वस्तू पाठवाव्यात आणि गोरगरिबांना दानधर्म करावा. २३  यहुद्यांनी कबूल केलं, की जो उत्सव त्यांनी सुरू केला होता तो ते दरवर्षी साजरा करतील, आणि मर्दखयने पत्रात त्यांना जे काही करायला सांगितलं होतं तेही ते करतील. २४  कारण अगागी+ हम्मदाथाचा मुलगा आणि यहुद्यांचा शत्रू हामान+ याने यहुद्यांचा नाश करण्याचा कट रचला होता.+ यहुद्यांना गोंधळात पाडून त्यांचा नायनाट करण्यासाठी त्याने पूर,+ म्हणजे चिठ्ठ्या टाकल्या होत्या. २५  पण एस्तेर राणी जेव्हा राजासमोर गेली तेव्हा राजाने असं लेखी फर्मान काढलं,+ की “हामानने यहुद्यांविरुद्ध जी दुष्ट योजना केली आहे+ ती त्याच्यावरच उलटावी.” त्यामुळे हामानला आणि त्याच्या मुलांना वधस्तंभांवर लटकवण्यात आलं.+ २६  म्हणून पूर*+ या शब्दावरून त्या सणाच्या दिवसांना पुरीम हे नाव पडलं. पत्रात जे काही लिहिलं होतं आणि यहुद्यांनी स्वतः जे काही पाहिलं होतं, तसंच त्यांच्यावर जो प्रसंग ओढवला होता त्यावरून, २७  त्यांनी असं ठरवलं की ते, त्यांचे वंशज आणि त्यांच्यात सामील झालेले लोक+ दरवर्षी न चुकता हे दोन दिवस सण म्हणून साजरा करतील. आणि त्या दिवसांविषयी पत्रांत जे काही सांगितलं होतं ते सगळं ते पाळतील. २८  यहुद्यांनी पुरीम सणाचे दिवस पाळण्याचं कधीच सोडू नये आणि त्या दिवसांची आठवण त्यांच्या वंशजांमधून कधीही नाहीशी होऊ नये, म्हणून ते दिवस पाळले जाणार होते; प्रत्येक प्रांतात, प्रत्येक शहरात आणि प्रत्येक कुटुंबात पिढ्या न्‌ पिढ्या त्या दिवसांची आठवण म्हणून ते पाळले जाणार होते. २९  मग पुरीम सण पाळण्याविषयी दुसरं एक पत्र लिहिण्यात आलं. आणि अबीहईलची मुलगी एस्तेर राणी आणि यहुदी मर्दखय यांनी त्यांना मिळालेल्या अधिकाराने असा आदेश दिला, की पत्रात लिहिलेल्या सर्व गोष्टी पाळल्या जाव्यात. ३०  मर्दखयने ही पत्रं, अहश्‍वेरोश+ राजाच्या साम्राज्यात असलेल्या १२७ प्रांतांतल्या+ सर्व यहुद्यांना पाठवली. त्यांत त्याने विश्‍वसनीय गोष्टी लिहिल्या आणि सदिच्छा व्यक्‍त केल्या. ३१  पत्राचा आशय असा होता, की यहुदी मर्दखय आणि एस्तेर राणी यांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे नेमलेल्या दिवसांत पुरीमचा सण पाळला जावा;+ आणि यहुद्यांनी स्वतःसाठी आणि त्यांच्या वंशजांसाठी ठरवलं होतं त्याप्रमाणे+ त्यांनी त्या दिवसांत उपास+ आणि याचना करावी.+ ३२  पुरीम+ सणाबद्दल सांगितलेल्या या गोष्टी एस्तेर राणीच्या आदेशावरून पक्क्या करण्यात आल्या आणि ग्रंथात लिहून ठेवण्यात आल्या.

तळटीपा

किंवा “सूसा.”
किंवा “सूसा.”
किंवा “सूसा.”
किंवा “सूसामधल्या.”
किंवा “सूसा.”
किंवा “सूसा.”
किंवा “सूसामधले.”
“पूर” म्हणजे “चिठ्ठ्या.” “पुरीम” हे त्याचं अनेकवचनी रूप असून ते यहुद्यांच्या सणाला सूचित करतं. हा सण, त्यांच्या पवित्र कॅलेंडरनुसार १२ व्या महिन्यात येतो. अति. ख१५ पाहा.