ओबद्या १:१-२१

  • गर्विष्ठ अदोमला खाली आणलं जाईल (१-९)

  • अदोमचा याकोबवर अत्याचार (१०-१४)

  • सर्व राष्ट्रांविरुद्ध यहोवाचा दिवस (१५, १६)

  • याकोबच्या घराण्याला पुन्हा वसवलं जाईल (१७-२१)

    • याकोब अदोमला भस्म करेल (१८)

    • राज्यपद यहोवाचं होईल (२१)

१  सर्वोच्च प्रभू यहोवाने* ओबद्या* याला अदोमबद्दल एक दृष्टान्त दाखवला. तो म्हणतो:+ “आम्हाला यहोवाकडून एक बातमी मिळाली आहे,राष्ट्रांकडे एका राजदूताला पाठवण्यात आलं आहे: ‘उठा, आपण अदोमविरुद्ध युद्धाची तयारी करू.’ ”+  २  “पाहा! मी तुला राष्ट्रांमध्ये कवडीमोल केलंय;ते तुला अगदी तुच्छ समजतात.+  ३  तुझ्या गर्विष्ठ मनाने तुला फसवलंय,+तू खडकाच्या कपारींमध्ये राहतोस,तू उच्च स्थानांमध्ये राहतोस आणि मनातल्या मनात म्हणतोस,‘मला खाली जमिनीवर कोण आणू शकेल?’  ४  जरी तू गरुडासारखं उंचावर घरटं बांधलंस,*किंवा ते ताऱ्‍यांमध्ये नेऊन ठेवलंस,तरी मी तुला तिथून खाली आणीन,” असं यहोवा म्हणतो.  ५  “रात्री तुझ्याकडे चोर किंवा दरोडेखोर आले,तर त्यांना हवं तेवढंच ते लुटून नेणार नाहीत का? किंवा जर द्राक्षं गोळा करणारे तुझ्याकडे आले,तर तेही काही द्राक्षं सोडून जाणार नाहीत का?+ पण तुझे शत्रू मात्र तुझा अगदी पूर्णपणे नाश करतील!*  ६  एसावला कसं शोधून काढण्यात आलंय! त्याचा लपवलेला खजिना कसा लुटण्यात आलाय!  ७  त्यांनी तुला सीमेवर हाकलून दिलंय. तुझ्या सर्व साथीदारांनी* तुला फसवलंय. जे तुझ्यासोबत शांतीने राहायचे, त्यांनी तुला मात दिली आहे. जे तुझ्यासोबत बसून जेवायचे, त्यांनीच तुझ्यासाठी जाळं पसरलं आहे,पण तुला समजत नाही.”  ८  यहोवा म्हणतो, “त्या दिवशी,मी अदोमच्या बुद्धिमानांचा नाश करणार नाही का?+ आणि एसावच्या डोंगराळ प्रदेशातून समज नाहीशी करणार नाही का?  ९  अरे तेमान,+ तुझे योद्धे भयभीत होतील,+कारण एसावच्या डोंगराळ प्रदेशातल्या प्रत्येकाची कत्तल केली जाईल.+ १०  तू आपला भाऊ याकोब याच्याशी क्रूरपणे वागलास,+म्हणून तू लज्जित होशील,+आणि तुझा कायमचा नाश होईल.+ ११  ज्या दिवशी परक्यांनी त्याच्या सैन्याला बंदिवासात नेलं,+त्या दिवशी तू नुसता बघत उभा राहिलास. ज्या दिवशी त्याच्या फाटकात विदेशी शिरले आणि त्यांनी यरुशलेमवर चिठ्ठ्या टाकल्या,+त्या दिवशी तू पण त्यांच्यासारखाच वागलास. १२  तुझ्या भावावर संकट आलं, त्या दिवशी तू आनंद साजरा करायला नको होतास,+यहूदाच्या लोकांच्या नाशाच्या दिवशी, तू खूश व्हायला नको होतंस,+आणि त्यांच्या दुःखाच्या दिवशी, तू गर्वाने बोलायला नको होतंस. १३  माझ्या लोकांच्या संकटाच्या दिवशी, तू त्यांच्या फाटकाच्या आत यायला नको होतंस,+त्याच्या विपत्तीच्या दिवशी, तू आनंद साजरा करायला नको होतास,आणि त्याच्या संकटाच्या दिवशी, तू त्याच्या संपत्तीवर हात टाकायला नको होतास.+ १४  तू चौकात उभं राहून, त्याच्या पळून जाणाऱ्‍या लोकांना ठार मारायला नको होतंस,+आणि संकटाच्या दिवशी त्याच्या वाचलेल्यांना, तू शत्रूंच्या हाती द्यायला नको होतंस.+ १५  कारण सर्व राष्ट्रांच्या विरुद्ध यहोवाचा दिवस येतोय.+ तू जसं केलं आहेस, तसंच तुझ्यासोबत केलं जाईल.+ तू इतरांशी जसा वागलास, तशीच वागणूक तुला मिळेल. १६  कारण जसा तू माझ्या पवित्र पर्वतावर द्राक्षारस पीत होतास,तशी सर्व राष्ट्रं माझ्या क्रोधाचा द्राक्षारस पीत राहतील.+ ती नक्कीच माझा क्रोध पितील आणि गिळतील,आणि ती राष्ट्रं कधीच अस्तित्वात नव्हती, अशी होतील. १७  पण जे वाचलेले आहेत, ते सीयोन पर्वतावर असतील,+आणि तो पर्वत पवित्र असेल;+आणि याकोबचं घराणं आपल्या मालकीच्या गोष्टींचा ताबा घेईल.+ १८  याकोबचं घराणं अग्नीसारखं होईल,योसेफचं घराणं ज्वालेसारखं होईल. तर एसावचं घराणं सुकलेल्या गवतासारखं होईल;ते त्यांना आग लावून भस्म करतील,आणि एसावच्या घराण्यातून कोणीही वाचणार नाही,+कारण यहोवा स्वतः असं बोललाय. १९  ते नेगेबचा आणि एसावच्या डोंगराळ प्रदेशाचा,+शेफीलाचा* आणि पलिष्ट्यांच्या देशाचा,+एफ्राईमच्या आणि शोमरोनच्या शेतांचा ताबा घेतील+ आणि बन्यामीन गिलादचा ताबा घेईल. २०  कनानी लोकांचा देश थेट सारफथपर्यंत,+या तटबंदीच्या बंदिवानांचा,+ म्हणजे इस्राएली लोकांचा होईल. यरुशलेमचे बंदिवान, जे सफारदमध्ये होते, ते नेगेबच्या शहरांचा ताबा घेतील.+ २१  एसावच्या डोंगराळ प्रदेशाचा न्याय करण्यासाठी,+वाचवणारे सीयोन पर्वतावर जातील,आणि राज्यपद यहोवाचं होईल.”+

तळटीपा

म्हणजे, “यहोवाचा सेवक.”
किंवा कदाचित, “उंच उडालास.”
किंवा कदाचित, “त्यांनी किती प्रमाणात नाश केला असता?”
किंवा “ज्यांनी तुझ्याशी करार केला त्यांनी.”
किंवा “टेकड्यांच्या प्रदेशाचा.”