कलस्सैकर यांना पत्र ३:१-२५
३ पण जर तुम्हाला ख्रिस्तासोबत उठवण्यात आलं होतं,+ तर मग स्वर्गातल्या, म्हणजे जिथे ख्रिस्त देवाच्या उजव्या हाताला बसला आहे,+ तिथल्या गोष्टी मिळवायचा प्रयत्न करत राहा.
२ पृथ्वीवरच्या गोष्टींवर नाही,+ तर स्वर्गातल्या गोष्टींवर लक्ष लावा.+
३ कारण तुम्ही मेला आहात आणि तुमचं जीवन देवाबरोबर ऐक्यात असलेल्या ख्रिस्तासोबत गुप्त ठेवण्यात आलं आहे.
४ ख्रिस्त, जो आपलं जीवन आहे,+ तो प्रकट होईल तेव्हा तुम्हालासुद्धा त्याच्यासोबत गौरवात प्रकट केलं जाईल.+
५ म्हणून अनैतिक लैंगिक कृत्यं,* अशुद्धपणा, अनावर लैंगिक वासना,+ वाईट इच्छा आणि लोभीपणा (जी एक प्रकारची मूर्तिपूजाच आहे), यांसारख्या गोष्टी उत्पन्न करणाऱ्या पृथ्वीवरच्या आपल्या शरीराच्या अवयवांना मारून टाका.+
६ अशाच गोष्टींमुळे लोकांवर देवाचा क्रोध भडकेल.
७ तुमची पूर्वीची जीवनशैली अशीच होती. तुम्हीसुद्धा याच गोष्टी करत होता.*+
८ पण आता तुम्ही क्रोध, राग, वाईटपणा,+ शिवीगाळ,+ अश्लील बोलणं,+ या सर्व गोष्टी आपल्यामधून काढून टाकल्या पाहिजेत.
९ एकमेकांशी खोटं बोलू नका.+ आपलं जुनं व्यक्तिमत्त्व* त्याच्या वाईट सवयींसोबत काढून टाका.+
१० आणि देवाकडून असलेलं नवीन व्यक्तिमत्त्व घाला.+ हे व्यक्तिमत्त्व देवाने निर्माण केलं आणि त्याच्याच प्रतिरूपानुसार ते अचूक ज्ञानाद्वारे नवीन केलं जात आहे.+
११ यात ग्रीक किंवा यहुदी, सुंता झालेला किंवा सुंता न झालेला, विदेशी किंवा स्कुथी,* दास किंवा स्वतंत्र माणूस, असा भेदभाव नाही; त्याऐवजी, ख्रिस्तच सर्वांमध्ये सर्वकाही आहे.+
१२ त्यामुळे पवित्र आणि प्रिय असे देवाचे निवडलेले लोक या नात्याने+ करुणा,+ दयाळूपणा, प्रेमळपणा, नम्रता,+ सौम्यता+ आणि सहनशीलता+ यांचं वस्त्र घाला.
१३ कोणाविरुद्ध काही तक्रार असली,+ तरी एकमेकांचं सहन करत राहा आणि एकमेकांना मोठ्या मनाने क्षमा करत जा.+ यहोवाने* जशी तुम्हाला मोठ्या मनाने क्षमा केली, तशी तुम्हीही करा.+
१४ पण या सर्व गोष्टींसोबतच प्रेमाचं वस्त्र घाला,+ कारण हे ऐक्याचं परिपूर्ण बंधन आहे.+
१५ तसंच, तुम्हाला एकाच शरीराचे अवयव या नात्याने ख्रिस्ताच्या शांतीमध्ये बोलावण्यात आलं होतं. म्हणून या शांतीला तुमच्या मनावर राज्य* करू द्या+ आणि कृतज्ञता दाखवा.
१६ ख्रिस्ताचं वचन सर्व बुद्धीसोबत तुमच्यामध्ये भरपूर प्रमाणात राहावं. स्तुतिगीतं गाऊन, देवाचं गुणगान करून आणि कृतज्ञ मनाने उपासनेची गीतं गाऊन एकमेकांना शिकवत राहा. तसंच एकमेकांना प्रोत्साहन देत राहा* आणि आपल्या हृदयात यहोवासाठी* गीतं गा.+
१७ तुम्ही जे काही बोलता किंवा जे काही करता ते सगळं प्रभू येशूच्या नावाने करा आणि त्याच्याद्वारे देव, जो आपला पिता आहे त्याचे आभार माना.+
१८ पत्नींनो, आपल्या पतींच्या अधीन राहा,+ कारण असं करणं प्रभूमध्ये योग्य आहे.
१९ पतींनो, आपल्या पत्नींवर प्रेम करा+ आणि त्यांच्याशी कठोरपणे वागू नका.*+
२० मुलांनो, सगळ्या बाबतींत आपल्या आईवडिलांच्या आज्ञेत राहा,+ कारण यामुळे प्रभूला आनंद होतो.
२१ वडिलांनो, आपल्या मुलांना वैताग आणू नका,*+ नाहीतर ती खचून जातील.*
२२ दासांनो, सगळ्या बाबतींत आपल्या मालकांच्या आज्ञेत राहा.+ फक्त माणसांना खूश करण्यासाठी, ते पाहत असतानाच नाही,* तर यहोवाची* भीती बाळगून प्रामाणिक मनाने असं करा.
२३ तुम्ही जे काही करता ते माणसांसाठी नाही, तर यहोवासाठी* करत आहात असं समजून ते जीव* ओतून करा.+
२४ कारण तुम्हाला माहीत आहे, की यहोवाकडूनच* तुम्हाला बक्षिसाच्या रूपात वारसा मिळेल.+ आपला मालक, ख्रिस्त याचे दास होऊन त्याची सेवा करा.
२५ जो वाईट काम करतो त्याला त्याचं फळ नक्कीच मिळेल+ आणि या बाबतीत कोणताही भेदभाव नाही.+
तळटीपा
^ ग्रीक, पोर्निया. शब्दार्थसूची पाहा.
^ किंवा “अशा प्रकारे चालत होता.”
^ शब्दशः “जुना मनुष्य.”
^ या ठिकाणी “स्कुथी” या शब्दाचा अर्थ असंस्कृत लोक.
^ किंवा “नियंत्रण.”
^ किंवा “समजावत जा.”
^ किंवा “त्यांच्यावर संतापू नका.”
^ किंवा “चीड आणू नका.”
^ किंवा “निराश होतील.”
^ किंवा “माणसांची खुशामत करण्यासाठी तोंडदेखलेपणाने नाही.”
^ शब्दार्थसूची पाहा.