गणना १०:१-३६

  • चांदीचे कर्णे (१-१०)

  • सीनायपासून पुढे प्रवास (११-१३)

  • छावण्यांचा क्रमानुसार प्रवास (१४-२८)

  • इस्राएलला मार्ग दाखवण्याची होबाबला विनंती (२९-३४)

  • तळ हलवताना मोशेची प्रार्थना (३५, ३६)

१०  मग यहोवा मोशेला म्हणाला: २  “तू आपल्यासाठी हातोडीने ठोकून चांदीचे दोन कर्णे बनव.+ इस्राएली लोकांना एकत्र करण्यासाठी आणि तळ हलवण्याचा इशारा देण्यासाठी त्यांचा उपयोग कर. ३  दोन्ही कर्णे सोबत वाजवले जातील, तेव्हा सर्व इस्राएली लोकांनी तुझ्याकडे भेटमंडपाच्या प्रवेशद्वाराजवळ एकत्र जमावं.+ ४  पण जर एकच कर्णा वाजवला गेला, तर फक्‍त इस्राएलच्या हजारांवर प्रमुख असलेल्यांनी, म्हणजेच त्यांच्यातल्या प्रधानांनी तुझ्याकडे यावं.+ ५  जेव्हा तुम्ही चढत्या-उतरत्या स्वरात कर्णे वाजवाल, तेव्हा पूर्वेकडच्या छावण्यांनी+ जायला निघावं. ६  तुम्ही दुसऱ्‍यांदा चढत्या-उतरत्या स्वरात कर्णे वाजवाल, तेव्हा दक्षिणेकडच्या छावण्यांनी+ जायला निघावं. प्रत्येक गट जायला निघेल, तेव्हा त्यांनी अशाच प्रकारे कर्णा वाजवावा. ७  जेव्हा मंडळीला एकत्र बोलवायचं असेल, तेव्हा तुम्ही कर्णे चढत्या-उतरत्या स्वरात वाजवू नका.+ ८  अहरोनच्या मुलांनी, म्हणजेच याजकांनी कर्णे वाजवावेत+ आणि तुमच्या सर्व पिढ्यांमध्ये कर्णे वाजवण्याचा हा नियम एक कायमचा नियम असावा. ९  तुम्ही आपल्या देशात, आपल्यावर अत्याचार करणाऱ्‍या एखाद्या शत्रूविरुद्ध लढायला जाल, तेव्हा कर्णे वाजवून युद्धाची घोषणा करा;+ म्हणजे तुमचा देव यहोवा तुमची आठवण करेल आणि तुम्हाला तुमच्या शत्रूंपासून वाचवेल. १०  तसंच, तुमच्या आनंदाच्या प्रसंगांत,+ म्हणजेच तुमच्या सणांच्या दिवशी+ व तुमच्या महिन्यांच्या सुरुवातीला जेव्हा तुम्ही होमार्पणं+ व शांती-अर्पणं+ द्याल, तेव्हा कर्णे वाजवा. त्यांच्यामुळे तुमचा देव तुमची आठवण करेल. मी तुमचा देव यहोवा आहे.”+ ११  दुसऱ्‍या वर्षाच्या दुसऱ्‍या महिन्यात, २० व्या दिवशी,+ साक्षपेटीच्या मंडपावरून ढग वर गेला.+ १२  त्यामुळे, इस्राएली लोक सीनायच्या ओसाड रानातून जायला निघाले. तळ हलवण्याच्या ठरलेल्या क्रमानुसार ते निघाले.+ यानंतर ढग पारानच्या ओसाड रानात+ जाऊन थांबला. १३  अशा प्रकारे, यहोवाने मोशेला दिलेल्या सूचनांप्रमाणे त्यांनी पहिल्यांदा तळ हलवला.+ १४  सगळ्यात आधी यहूदाच्या छावणीचा तीन वंशांचा गट आपापल्या तुकड्यांप्रमाणे* जायला निघाला. अम्मीनादाबचा मुलगा नहशोन+ आपल्या तुकडीचं नेतृत्व करत होता. १५  सूवारचा मुलगा नथनेल,+ इस्साखार वंशाच्या तुकडीचं नेतृत्व करत होता. १६  हेलोनचा मुलगा अलीयाब,+ जबुलून वंशाच्या तुकडीचं नेतृत्व करत होता. १७  उपासना मंडप काढण्यात आला,+ तेव्हा मंडप उचलून नेणारे गेर्षोनी+ आणि मरारी+ लोक तो घेऊन निघाले. १८  मग रऊबेनच्या छावणीचा तीन वंशांचा गट आपापल्या तुकड्यांप्रमाणे* जायला निघाला. शदेयुरचा मुलगा अलीसूर+ आपल्या तुकडीचं नेतृत्व करत होता. १९  सुरीशादैचा मुलगा शलूमियेल,+ शिमोन वंशाच्या तुकडीचं नेतृत्व करत होता. २०  दगुवेलचा मुलगा एल्यासाप,+ गाद वंशाच्या तुकडीचं नेतृत्व करत होता. २१  मग, पवित्र ठिकाणाचं सामान उचलून नेणारे कहाथी लोक,+ ते घेऊन निघाले. ते पोहोचेपर्यंत उपासना मंडप उभा करावा लागायचा. २२  त्यानंतर, एफ्राईमच्या छावणीचा तीन वंशांचा गट आपापल्या तुकड्यांप्रमाणे* जायला निघाला. अम्मीहूदचा मुलगा अलीशामा+ आपल्या तुकडीचं नेतृत्व करत होता. २३  पदाहसुरचा मुलगा गमलियेल,+ मनश्‍शे वंशाच्या तुकडीचं नेतृत्व करत होता. २४  गिदोनीचा मुलगा अबीदान,+ बन्यामीन वंशाच्या तुकडीचं नेतृत्व करत होता. २५  मग, दानच्या छावणीचा तीन वंशांचा गट, सर्व छावण्यांचं मागून रक्षण करणारा गट म्हणून आपापल्या तुकड्यांप्रमाणे* जायला निघाला. अम्मीशद्दैचा मुलगा अहीएजर,+ आपल्या तुकडीचं नेतृत्व करत होता. २६  आक्रानचा मुलगा पगीयेल,+ आशेर वंशाच्या तुकडीचं नेतृत्व करत होता. २७  एनानचा मुलगा अहीरा,+ नफताली वंशाच्या तुकडीचं नेतृत्व करत होता. २८  इस्राएली लोक आणि त्यांच्या तुकड्या,* तळ हलवताना याच क्रमाने निघायच्या.+ २९  मग मोशे आपला सासरा, मिद्यानी रगुवेल*+ याचा मुलगा होबाब, याला म्हणाला: “ज्या देशाबद्दल यहोवाने असं म्हटलं की, ‘मी तो तुम्हाला देईन,’+ त्या देशात आम्ही जायला निघालो आहोत. तेव्हा तूही आमच्यासोबत चल+ आणि आम्ही तुझं भलं करू, कारण यहोवाने इस्राएलला आशीर्वाद देण्याचं वचन दिलंय.”+ ३०  पण तो मोशेला म्हणाला: “मी नाही येणार. मी माझ्या देशात आपल्या नातेवाइकांकडे परत जाईन.” ३१  यावर मोशे त्याला म्हणाला: “आम्हाला सोडून जाऊ नकोस, कारण ओसाड रानात कुठे छावणी करायची हे तुला माहीत आहे आणि तू आम्हाला मार्ग दाखवू शकतोस. ३२  जर तू आमच्यासोबत आलास,+ तर यहोवाकडून आम्हाला जे आशीर्वाद मिळतील, त्यांचा तुलाही नक्कीच फायदा होईल.” ३३  मग इस्राएली लोक यहोवाच्या पर्वतासमोरून निघाले+ आणि त्यांनी तीन दिवस प्रवास केला. त्यांच्या मुक्कामासाठी जागा शोधण्याकरता, यहोवाच्या कराराची पेटी+ तीन दिवस त्यांच्यापुढे जात होती.+ ३४  ते तळ हलवायचे तेव्हा दिवसा यहोवाचा ढग+ त्यांच्यावर राहायचा. ३५  जेव्हा जेव्हा साक्षपेटी हलवली जायची, तेव्हा तेव्हा मोशे म्हणायचा: “हे यहोवा, ऊठ+ आणि तुझ्या शत्रूंची पांगापांग कर आणि तुझा द्वेष करणाऱ्‍यांना तुझ्यापुढून पळवून लाव.” ३६  आणि जेव्हा ती पेटी खाली ठेवली जायची, तेव्हा तो म्हणायचा, “हे यहोवा, इस्राएलच्या हजारो* लोकांकडे परत ये.”+

तळटीपा

शब्दशः “त्यांच्या सैन्यांप्रमाणे.”
शब्दशः “त्यांच्या सैन्यांप्रमाणे.”
शब्दशः “त्यांच्या सैन्यांप्रमाणे.”
शब्दशः “त्यांच्या सैन्यांप्रमाणे.”
शब्दशः “त्यांच्या सैन्यांप्रमाणे.”
म्हणजे, इथ्रो.
किंवा “असंख्य.”