गणना १२:१-१६

  • मिर्याम आणि अहरोन मोशेचा विरोध करतात (१-३)

    • मोशे सर्वात नम्र ()

  • यहोवा मोशेची बाजू घेतो (४-८)

  • मिर्यामला कुष्ठरोगाची शिक्षा (९-१६)

१२  मोशेने एका कूशी स्त्रीशी लग्न केलं होतं,+ त्यामुळे मिर्याम आणि अहरोन त्याच्याविरुद्ध बोलू लागले. २  ते म्हणू लागले: “यहोवा काय फक्‍त मोशेद्वारेच बोलला का? तो आपल्याद्वारेही बोललाय ना?”+ आणि यहोवा हे ऐकत होता.+ ३  पृथ्वीवरच्या सर्व माणसांपैकी मोशे हा सर्वात नम्र*+ माणूस होता. ४  यहोवा अचानक मोशे, अहरोन आणि मिर्याम यांना म्हणाला: “तुम्ही तिघंही भेटमंडपाजवळ जा.” म्हणून ते तिघं तिथे गेले. ५  मग यहोवा ढगाच्या खांबात खाली आला+ आणि भेटमंडपाच्या प्रवेशाजवळ उभा राहिला. त्याने अहरोन आणि मिर्याम यांना हाक मारली आणि ते दोघंही पुढे गेले. ६  तो म्हणाला: “मी काय सांगतो ते ऐका. जर तुमच्यामध्ये यहोवाचा एखादा संदेष्टा असता, तर मी त्याला दृष्टान्तात स्वतःची ओळख करून दिली असती+ आणि स्वप्नात त्याच्याशी बोललो असतो.+ ७  पण माझा सेवक मोशे याच्या बाबतीत तसं नाही. त्याला मी माझ्या सगळ्या घराण्यावर नेमलंय.*+ ८  मी त्याच्याशी कोड्यात नाही, तर अगदी मोकळेपणाने समोरासमोर बोलतो+ आणि मी यहोवा त्याच्या डोळ्यासमोर प्रकट होतो. मग, माझा सेवक मोशे याच्याविरुद्ध बोलताना तुम्हाला भीती कशी वाटली नाही?” ९  तेव्हा यहोवाचा क्रोध त्यांच्यावर भडकला आणि तो तिथून निघून गेला. १०  मग ढग मंडपावरून निघून गेला आणि मिर्याम कुष्ठरोगामुळे* बर्फासारखी पांढरीफटक पडली.+ अहरोनने वळून मिर्यामकडे पाहिलं, तेव्हा त्याला दिसलं की तिला कुष्ठरोग झाला आहे.+ ११  अहरोन लगेच मोशेला म्हणाला: “प्रभू मी तुझ्याकडे भीक मागतो! या पापाची शिक्षा आम्हाला होऊ देऊ नकोस. आम्ही मूर्खपणे वागलो. १२  जन्मतःच ज्याचं शरीर अर्धं कुजलंय, अशा मेलेल्या मुलासारखं तिला राहू देऊ नकोस!” १३  तेव्हा, मोशे यहोवाला कळकळून याचना करू लागला: “हे देवा, कृपा करून माझ्या बहिणीला बरं कर!”+ १४  यहोवा मोशेला म्हणाला: “जर तिचा बाप तिच्या तोंडावर थुंकला असता, तर तिला सात दिवस अपमान सहन करावा लागला नसता का? आता तिला सात दिवस छावणीबाहेर सर्वांपासून वेगळं राहू दे+ आणि मग तिला आत आण.” १५  तेव्हा मिर्यामला सात दिवस छावणीबाहेर सर्वांपासून वेगळं ठेवण्यात आलं;+ तिला छावणीत पुन्हा आणेपर्यंत लोकांनी तळ हलवला नाही. १६  मग इस्राएली लोक हसेरोथवरून पुढे निघाले+ आणि त्यांनी पारानच्या ओसाड रानात+ छावणी केली.

तळटीपा

किंवा “सौम्य वृत्तीचा.”
शब्दशः “माझ्या सगळ्या घराण्यात, तो स्वतःला विश्‍वासू सिद्ध करत आहे.”