गणना १३:१-३३

  • बारा हेरांना कनानला पाठवलं जातं (१-२४)

  • दहा हेर वाईट बातमी आणतात (२५-३३)

१३  यहोवा मोशेला म्हणाला: २  “मी इस्राएली लोकांना जो कनान देश देणार आहे, त्याची पाहणी करण्यासाठी* हेरांना पाठव. प्रत्येक वंशातून, प्रधान असलेल्या एका माणसाला पाठव.”+ ३  तेव्हा मोशेने यहोवाच्या आज्ञेप्रमाणे पारानच्या ओसाड रानातून+ त्यांना पाठवलं. ती सर्व माणसं इस्राएली लोकांच्या प्रमुखांपैकी होती. ४  ही त्यांची नावं: रऊबेन वंशातल्या जक्कूरचा मुलगा शम्मुवा; ५  शिमोन वंशातल्या होरीचा मुलगा शाफाट; ६  यहूदा वंशातल्या यफुन्‍नेचा मुलगा कालेब;+ ७  इस्साखार वंशातल्या योसेफचा मुलगा इगाल; ८  एफ्राईम वंशातल्या नूनचा मुलगा होशे;+ ९  बन्यामीन वंशातल्या राफूचा मुलगा पालती; १०  जबुलून वंशातल्या सोदीचा मुलगा गद्दीयेल; ११  योसेफच्या वंशापैकी,+ मनश्‍शे वंशातल्या+ सूसीचा मुलगा गद्दी; १२  दान वंशातल्या गमल्लीचा मुलगा अम्मीएल; १३  आशेर वंशातल्या मीखाएलचा मुलगा सतूर; १४  नफताली वंशातल्या वाप्सीचा मुलगा नहब्बी; १५  तसंच, गाद वंशातल्या माकीचा मुलगा गऊवेल. १६  मोशेने ज्यांना कनान देशाची पाहणी करण्यासाठी पाठवलं, त्या हेरांची ही नावं आहेत. नूनचा मुलगा होशे, याला मोशेने यहोशवा*+ हे नाव दिलं. १७  कनान देशाची पाहणी करायला हेरांना पाठवताना मोशे त्यांना म्हणाला: “या मार्गाने नेगेबमध्ये जा आणि मग तिथून डोंगराळ प्रदेशात जा.+ १८  तो देश कसा आहे+ आणि तिथले लोक ताकदवान आहेत की दुर्बळ, थोडे आहेत की पुष्कळ हे पाहा. १९  तो देश चांगला आहे की वाईट, तिथली शहरं छावण्यांची आहेत की सभोवती भिंती असलेली, २०  तसंच, तिथली जमीन सुपीक* आहे की नापीक,*+ आणि तिथे झाडं आहेत की नाहीत, हेही पाहा. तुम्ही धाडसी होऊन+ त्या देशातली काही फळं घेऊन या.” तेव्हा पहिल्या पिकलेल्या द्राक्षांचा हंगाम होता.+ २१  मग ते हेर गेले आणि त्यांनी झिनच्या ओसाड रानापासून+ लेबो-हमाथजवळ*+ असलेल्या रहोबपर्यंत+ देशाची पाहणी केली. २२  नेगेबमध्ये गेल्यावर ते हेब्रोनला+ आले. तिथे अहीमान, शेशय आणि तलमय+ हे अनाकी+ लोक राहत होते. हेब्रोन शहर इजिप्तच्या सोअन शहराच्या सात वर्षांआधी बांधण्यात आलं होतं. २३  अष्कोलच्या खोऱ्‍यात+ आल्यावर, त्यांनी तिथे द्राक्षांचा घड असलेली एक फांदी कापली. दोन माणसांना तो घड एका दांड्यावर उचलून न्यावा लागला. त्यासोबत त्यांनी काही डाळिंबं आणि अंजिरंही घेतली.+ २४  इस्राएली लोकांनी तिथे द्राक्षांचा घड कापला होता, म्हणून त्यांनी त्या जागेचं नाव अष्कोलचं* खोरं+ असं ठेवलं. २५  मग ४० दिवसांनी+ ते हेर कनान देशाची पाहणी करून परत आले. २६  ते पारानच्या ओसाड रानात कादेश इथे मोशे, अहरोन आणि सर्व इस्राएली लोकांकडे आले.+ त्यांनी लोकांना त्या देशाबद्दल माहिती सांगितली, तसंच, त्यांना तिथून आणलेली फळंही दाखवली. २७  ते मोशेला म्हणाले: “तू आम्हाला ज्या देशात पाठवलंस, तिथे आम्ही गेलो आणि खरोखर तिथे दूध आणि मध वाहतं.+ ही तिथली काही फळं आहेत.+ २८  पण त्या देशातले लोक खूप शक्‍तिशाली आहेत, तिथली शहरं खूप मोठी आहेत आणि त्यांच्यासभोवती भिंती आहेत. आम्हाला तिथे अनाकी+ लोकही दिसले. २९  अमालेकी+ लोक नेगेबच्या+ प्रदेशात राहतात. हित्ती, यबूसी+ आणि अमोरी+ लोक डोंगराळ भागात राहतात. कनानी+ लोक समुद्रकिनारी+ आणि यार्देन नदीच्या काठावर राहतात.” ३०  तेव्हा कालेब मोशेपुढे उभ्या असलेल्या लोकांना शांत करण्याचा प्रयत्न करत म्हणाला: “चला, लगेच जाऊ. आपण नक्कीच त्या देशाचा ताबा घेऊ, कारण मला खातरी आहे की आपण त्या देशावर विजय मिळवू शकतो.”+ ३१  पण जे त्याच्यासोबत गेले होते, ते म्हणाले: “नाही, आपण त्या लोकांशी लढू शकत नाही. कारण ते आपल्यापेक्षा ताकदवान आहेत.”+ ३२  ते ज्या देशाची पाहणी करायला गेले होते, त्याबद्दल ते इस्राएली लोकांना वाईट गोष्टी सांगत राहिले.+ ते म्हणाले: “आम्ही जो देश पाहायला गेलो होतो, तो खूप धोकादायक आहे. तुम्ही तिथे जिवंत राहू शकणार नाही. तिथे राहणारे सर्व लोक खूप उंच आणि धिप्पाड आहेत.+ ३३  तिथे आम्हाला नेफिलीमपासून आलेली* अनाकची मुलं,+ म्हणजे नेफिलीमही दिसले. आम्ही तर त्यांच्यापुढे टोळांसारखे दिसत होतो आणि त्यांनाही आम्ही तसेच वाटलो.”

तळटीपा

किंवा “तो हेरण्यासाठी.”
म्हणजे, “यहोवा तारण आहे.”
शब्दशः “बारीक.”
शब्दशः “लठ्ठ.”
किंवा “हमाथच्या प्रवेशद्वाराजवळ.”
म्हणजे, “द्राक्षांचा घड.”
किंवा “नेफिलीमचे वंशज असलेली.”