गणना १४:१-४५
१४ मग सर्व इस्राएली लोक मोठ्याने रडू लागले आणि ते रात्रभर आक्रोश करत राहिले.+
२ ते सर्व मोशे आणि अहरोन यांच्याविरुद्ध कुरकुर करू लागले.+ सगळे इस्राएली लोक त्यांच्याविरुद्ध बोलू लागले आणि म्हणाले: “आम्ही इजिप्तमध्येच मेलो असतो किंवा या ओसाड रानातच आमचा प्राण गेला असता, तर बरं झालं असतं!
३ यहोवा या देशात आम्हाला का नेतोय? तलवारीने मरण्यासाठी?+ ते लोक आमच्या बायकामुलांना उचलून नेतील.+ त्यापेक्षा आपण इजिप्तला परत गेलेलं बरं!”+
४ ते तर आपसात असंही म्हणू लागले: “चला आपण कोणालातरी आपला पुढारी नेमू आणि इजिप्तला परत जाऊ!”+
५ हे ऐकून मोशे आणि अहरोन इस्राएलच्या सर्व मंडळीसमोर जमिनीवर पालथे पडले.
६ कनान देशाची पाहणी करायला गेलेल्या हेरांपैकी, नूनचा मुलगा यहोशवा+ आणि यफुन्नेचा मुलगा कालेब+ यांनी तर दुःखाने आपले कपडे फाडले.
७ ते सर्व इस्राएली लोकांना म्हणाले: “ज्या देशाची आम्ही पाहणी करायला गेलो होतो, तो खरंच खूप चांगला देश आहे.+
८ यहोवाची आपल्यावर कृपा असली, तर तो नक्कीच आपल्याला तिथे घेऊन जाईल आणि दूध व मध वाहत असलेला तो देश आपल्याला देईल.+
९ पण तुम्ही यहोवाविरुद्ध बंड करू नका आणि त्या देशातल्या लोकांना घाबरू नका,+ कारण आपण त्यांना सहज हरवू.* त्यांना वाचवणारा कोणीही नाही. पण आपल्यासोबत यहोवा आहे!+ म्हणून त्यांना मुळीच घाबरू नका.”
१० पण सर्व इस्राएली लोक त्यांना दगडमार करण्याविषयी बोलू लागले.+ तेव्हा, त्या सर्वांना भेटमंडपावर यहोवाचं तेज प्रकट झालेलं दिसलं.+
११ मग यहोवा मोशेला म्हणाला: “हे लोक आणखी किती दिवस माझा असा अपमान करत राहतील?+ मी त्यांच्यासमोर इतके चमत्कार केले, तरी ते आणखी किती दिवस माझ्यावर असा अविश्वास दाखवतील?+
१२ आता मी त्यांच्यावर रोगराई आणून त्यांचा नाश करतो आणि तुझ्यापासून त्यांच्यापेक्षाही एक मोठं आणि शक्तिशाली राष्ट्र बनवतो.”+
१३ पण मोशे यहोवाला म्हणाला: “असं झालं, तर ज्या इजिप्तच्या लोकांमधून तू यांना तुझ्या सामर्थ्याने बाहेर आणलंस, ते याविषयी ऐकतील,+
१४ आणि या कनान देशाच्या रहिवाशांना त्याबद्दल सांगतील. इथल्या लोकांनीही ऐकलंय, की यहोवा त्याच्या लोकांमध्ये राहतो+ आणि त्याने स्वतःला त्यांच्यासमोर प्रकट केलंय.+ तू यहोवा आहेस आणि तुझा ढग त्यांच्यावर उभा आहे. तू दिवसा ढगाच्या खांबातून आणि रात्री आगीच्या खांबातून त्यांच्यापुढे चालतोस.+
१५ जर तू या सर्व लोकांचा एकाच वेळी नाश केलास, तर ज्या राष्ट्रांनी तुझी कीर्ती ऐकली आहे, ती असं म्हणतील:
१६ ‘यहोवा आपल्या लोकांना वचन दिलेल्या देशात नेऊ शकला नाही, म्हणून त्याने त्यांना ओसाड रानातच मारून टाकलं.’+
१७ तर आता हे यहोवा, तुझं महान सामर्थ्य दाखव कारण तू वचन दिलं होतंस आणि म्हणाला होतास:
१८ ‘यहोवा सहनशील आहे आणि एकनिष्ठ प्रेमाने* भरलेला आहे.+ तो चुका आणि अपराध क्षमा करतो, पण तो दोषींना शिक्षा दिल्याशिवाय राहणार नाही. तो वडिलांच्या अपराधांसाठी मुलांना आणि नातवांना, तिसऱ्या आणि चौथ्या पिढीपर्यंत शिक्षा देतो.’+
१९ ते इजिप्तमध्ये होते, तेव्हापासून आतापर्यंत तू जसा त्यांना क्षमा करत आलास, तसाच आताही तुझ्या महान एकनिष्ठ प्रेमापोटी या लोकांचा अपराध, कृपा करून क्षमा कर.”+
२० तेव्हा यहोवा म्हणाला: “तुझ्या म्हणण्याप्रमाणे मी त्यांना क्षमा करतो.+
२१ पण माझ्या जिवाची शपथ, सबंध पृथ्वी यहोवाच्या तेजाने भरून जाईल.+
२२ पण ज्यांनी माझं तेज पाहिलं, तसंच मी इजिप्तमध्ये आणि ओसाड रानात दाखवलेले चमत्कार पाहिलेत+ आणि तरीही ज्यांनी दहादा माझी परीक्षा पाहिली+ आणि माझ्या आज्ञा पाळल्या नाहीत,+ त्यांच्यापैकी एकही जण,
२३ मी त्यांच्या वाडवडिलांना वचन दिलेला देश पाहणार नाही. माझा अपमान करणाऱ्यांपैकी एकही जण तो देश पाहणार नाही.+
२४ पण माझा सेवक कालेब+ याने इतरांपेक्षा वेगळी मनोवृत्ती दाखवली आणि त्याने मनापासून माझ्या आज्ञा पाळल्या. म्हणून, तो ज्या देशात गेला होता, त्या देशात मी त्याला नक्कीच नेईन आणि त्याची संतती त्या देशाचा ताबा घेईल.+
२५ अमालेकी आणि कनानी+ लोक खोऱ्यात* राहत असल्यामुळे तुम्ही उद्या परत फिरा आणि तांबड्या समुद्राच्या मार्गाने ओसाड रानात जा.”+
२६ मग यहोवा मोशे आणि अहरोन यांना म्हणाला:
२७ “हे दुष्ट लोक कुठपर्यंत माझ्याविरुद्ध कुरकुर करत राहणार?+ इस्राएली लोक कुरकुर करून माझ्याविरुद्ध काय बोलत आहेत ते मी ऐकलंय.+
२८ त्यांना सांग, ‘यहोवा म्हणतो, “माझ्या जिवाची शपथ, तुमचं बोलणं मी ऐकलंय आणि आता मी तुमच्यासोबत तसंच करीन!+
२९ तुम्ही याच ओसाड रानात मराल.+ तुमच्यापैकी नोंदणी झालेले, २० वर्षं आणि त्यापेक्षा जास्त वय असलेले सर्व जण, ज्यांनी माझ्याविरुद्ध कुरकुर केली ते सगळे मरतील.+
३० तुम्ही ज्या देशात राहाल असं मी वचन दिलं होतं,*+ त्या देशात यफुन्नेचा मुलगा कालेब आणि नूनचा मुलगा यहोशवा, यांच्याशिवाय तुमच्यापैकी कोणीही पाऊल ठेवणार नाही.+
३१ पण ज्या तुमच्या मुलाबाळांबद्दल तुम्ही म्हणालात, की त्यांना उचलून नेलं जाईल, त्यांना मी त्या देशात नेईन+ आणि तुम्ही नाकारलेला देश ती बघतील.+
३२ पण तुम्ही याच ओसाड रानात मराल.
३३ तुमची मुलं ४० वर्षं ओसाड रानात+ मेंढपाळ होतील आणि तुम्ही माझ्याशी अविश्वासूपणे* वागल्यामुळे, तुमच्यापैकी शेवटला जोपर्यंत या ओसाड रानात मरत नाही, तोपर्यंत त्यांना याची शिक्षा भोगावी लागेल.+
३४ तुम्ही जे ४० दिवस त्या देशाची पाहणी केली,+ त्या प्रत्येक दिवसाच्या हिशोबाने एक वर्ष, अशी ४० वर्षं तुम्हाला तुमच्या अपराधांची शिक्षा भोगावी लागेल.+ यावरून तुम्हाला कळेल, की मला नाकारण्याचे* काय परिणाम होतात.
३५ मी यहोवा हे बोललो आहे. माझ्याविरुद्ध एकत्र जमलेल्या या सर्व दुष्ट लोकांसोबत मी असं करीन: याच ओसाड रानात त्यांचा प्राण जाईल आणि ते इथेच मरतील.+
३६ ज्या हेरांना मोशेने त्या देशाची पाहणी करायला पाठवलं आणि ज्यांनी त्या देशाबद्दल वाईट बातमी आणून+ सर्व इस्राएली लोकांना त्याच्याविरुद्ध कुरकुर करायला लावली,
३७ त्या लोकांना, हो, ज्यांनी त्या देशाबद्दल वाईट गोष्टी सांगितल्या, त्यांना शिक्षा होईल आणि ते यहोवापुढे मरतील.+
३८ पण पाहणी करायला गेलेल्यांपैकी, फक्त नूनचा मुलगा यहोशवा आणि यफुन्नेचा मुलगा कालेब हेच जिवंत राहतील.”’”+
३९ मोशेचं हे बोलणं ऐकून सर्व इस्राएली लोक मोठ्याने आक्रोश करू लागले.
४० मग ते पहाटे उठले आणि असं म्हणून पर्वतावर जाण्याचा प्रयत्न करू लागले: “आम्ही पाप केलं, पण आता आम्ही यहोवाने सांगितलेल्या देशात जायला तयार आहोत.”+
४१ पण मोशे म्हणाला: “तुम्ही यहोवाची आज्ञा का मोडताय? तुम्हाला यात यश मिळणार नाही.
४२ वर जाऊ नका, कारण यहोवा तुमच्यासोबत नाही. तुमचे शत्रू तुम्हाला हरवतील.+
४३ तुमचा सामना करायला अमालेकी आणि कनानी लोक तिथे आहेत,+ त्यामुळे तुम्ही तलवारीने मराल. तुम्ही यहोवाची आज्ञा पाळली नाही म्हणून यहोवा तुमच्यासोबत नसेल.”+
४४ पण ते धीटपणे पर्वतावर चढायला निघाले,+ मात्र यहोवाच्या कराराची पेटी आणि मोशे छावणीमधून हलले नाहीत.+
४५ तेव्हा, पर्वतावर राहणारे अमालेकी आणि कनानी लोक खाली आले आणि त्यांनी त्यांच्यावर हल्ला करून त्यांना हर्मापर्यंत पळवून लावलं.+
तळटीपा
^ शब्दशः “ते आपल्यासाठी भाकर आहेत.”
^ किंवा “प्रेमदयेने.”
^ किंवा “खालच्या मैदानात.”
^ शब्दशः “मी आपला हात उचलला.”
^ शब्दशः “वेश्यापण.”
^ किंवा “मी तुमचा शत्रू असण्याचे.”