गणना १५:१-४१

  • अर्पणांबद्दल नियम (१-२१)

    • रहिवाशांसाठी आणि विदेश्‍यांसाठी एकच नियम (१५, १६)

  • नकळत घडलेल्या पापांबद्दल अर्पणं (२२-२९)

  • जाणूनबुजून केलेल्या पापांबद्दल शिक्षा (३०, ३१)

  • शब्बाथ मोडणाऱ्‍याला मृत्युदंड (३२-३६)

  • वस्त्रांना झालर असावी (३७-४१)

१५  यहोवा मोशेला पुढे म्हणाला: २  “इस्राएली लोकांना सांग, ‘मी तुम्हाला राहायला देत असलेल्या देशात+ जेव्हा तुम्ही पोहोचाल, ३  आणि यहोवासाठी सुवास म्हणून,*+ आपल्या गुराढोरांमधून किंवा बकऱ्‍यांच्या वा मेंढरांच्या कळपातून यहोवासाठी अग्नीत जाळून केलेलं अर्पण द्याल; मग ते होमार्पण+ असो, खास नवसाचं बलिदान असो, स्वेच्छेने दिलेलं बलिदान+ असो किंवा नेमलेल्या सणांदरम्यान दिलेलं अर्पण+ असो, ४  तेव्हा यहोवासाठी ते अर्पण करणाऱ्‍याने, त्या अर्पणासोबतच एफाचा दहावा भाग* चांगलं पीठ,+ एक हिन* तेलाच्या चौथ्या भागात मिसळून अन्‍नार्पण म्हणून द्यावं. ५  तसंच, तुम्ही एक हिन द्राक्षारसाचा चौथा भाग पेयार्पण म्हणून होमार्पणासोबत+ किंवा प्रत्येक कोकराच्या बलिदानासोबत द्यावा. ६  किंवा मेंढा बलिदान करताना, तुम्ही दोन दशांश एफा चांगलं पीठ, एक हिन तेलाच्या तिसऱ्‍या भागात मिसळून अन्‍नार्पण म्हणून द्यावं. ७  आणि तुम्ही पेयार्पण म्हणून, एक हिन द्राक्षारसाचा तिसरा भाग यहोवासाठी सुवास म्हणून* द्यावा. ८  पण जर तुम्ही यहोवासाठी होमार्पण+ म्हणून, किंवा खास नवसाचं बलिदान+ म्हणून, किंवा शांती-अर्पण+ म्हणून, गुराढोरांमधून बैल अर्पण केला, ९  तर तुम्ही त्यासोबत, तीन दशांश एफा चांगलं पीठ, अर्धा हिन तेलात मिसळून अन्‍नार्पण+ म्हणून द्यावं. १०  तसंच तुम्ही पेयार्पण म्हणून अर्धा हिन द्राक्षारस,+ यहोवाकरता सुवासासाठी* अग्नीत जाळून केलेलं अर्पण म्हणून द्यावा. ११  प्रत्येक बैल, मेंढा, कोकरू किंवा बकरा यांच्या बाबतीत तुम्ही असं करा. १२  तुम्ही जितके प्राणी अर्पण कराल, त्यांतल्या प्रत्येकाच्या बाबतीत त्यांच्या संख्येप्रमाणे तुम्ही असंच करा. १३  इस्राएलमध्ये जन्मलेल्या प्रत्येकाने, अशाच प्रकारे अग्नीत जाळून केलेलं अर्पण यहोवासाठी सुवास म्हणून* द्यावं. १४  जर एखाद्या विदेश्‍याला किंवा जो बऱ्‍याच काळापासून तुमच्यामध्ये राहत आहे त्याला, यहोवासाठी सुवास म्हणून* अग्नीत जाळून केलेलं अर्पण द्यायचं असेल, तर त्यानेही तुमच्याप्रमाणेच अर्पण द्यावं.+ १५  इस्राएलच्या मंडळीमध्ये असलेल्या तुमच्यासाठी आणि तुमच्यामध्ये राहणाऱ्‍या विदेश्‍यासाठी एकच नियम असेल. हा पिढ्या न्‌ पिढ्या तुमच्यासाठी एक कायमचा नियम असेल. तुम्ही आणि तुमच्यात राहणारे विदेशी यहोवासमोर एकसारखेच आहेत.+ १६  तुमच्यासाठी आणि तुमच्यामध्ये राहणाऱ्‍या विदेश्‍यासाठी एकच नियम आणि एकच न्याय-निर्णय* असावा.’” १७  यहोवा मोशेला पुढे म्हणाला: १८  “इस्राएली लोकांना सांग, ‘मी तुम्हाला नेतोय, त्या देशात जेव्हा तुम्ही पोहोचाल, १९  आणि त्या देशातलं अन्‍न* खाल,+ तेव्हा तुम्ही यहोवासाठी दान द्यावं. २०  तुम्ही तुमच्या पहिल्या पिकातल्या+ भरडलेल्या धान्यापासून बनवलेल्या भाकरी दान म्हणून आणा. तुम्ही खळ्यातलं* दान ज्या प्रकारे देता, त्याच प्रकारे हेही द्या. २१  तुम्ही पिढ्या न्‌ पिढ्या तुमच्या पहिल्या पिकातल्या भरडलेल्या धान्यामधून काही यहोवाला दान म्हणून देत राहा. २२  यहोवाने मोशेला सांगितलेल्या या सर्व आज्ञांपैकी जर एकही आज्ञा तुम्ही चुकून मोडली, २३  म्हणजे यहोवा ज्या दिवसापासून आज्ञा देऊ लागला, त्या दिवसापासून तुमच्यासाठी आणि तुमच्या पिढ्यांसाठी यहोवाने मोशेद्वारे दिलेल्या सर्व आज्ञांपैकी, जर एकही आज्ञा तुम्ही चुकून मोडली, २४  आणि जर हे नकळत घडलं आणि इस्राएली लोकांना याबद्दल माहीत नसलं, तर त्या सर्वांनी यहोवाकरता सुवासासाठी* एक गोऱ्‍हा* होमार्पण म्हणून द्यावा. त्याच्यासोबत त्यांनी नेहमीच्या नियमाप्रमाणे अन्‍नार्पण आणि पेयार्पणही द्यावं.+ तसंच त्यांनी एक बकरा पापार्पण म्हणून द्यावा.+ २५  मग याजक सर्व इस्राएली लोकांसाठी प्रायश्‍चित्त करेल आणि त्यांना क्षमा केली जाईल.+ कारण त्यांच्याकडून चूक झाली; पण त्यांनी यहोवासाठी अग्नीत जाळून केलेलं अर्पण आणलं. तसंच, आपल्या चुकीबद्दल यहोवासमोर पापार्पणही आणलं. २६  सर्व इस्राएली लोकांना आणि त्यांच्यामध्ये राहणाऱ्‍या विदेश्‍यालाही क्षमा केली जाईल, कारण सर्वांकडून चूक झाली होती. २७  जर एखाद्याकडून* चुकून पाप घडलं, तर त्याने एक वर्षाची बकरी पापार्पण म्हणून आणावी.+ २८  मग यहोवासमोर नकळत पाप केल्याबद्दल याजक त्या माणसासाठी,* म्हणजे त्याच्या पापासाठी प्रायश्‍चित्त करेल आणि त्याला क्षमा केली जाईल.+ २९  इस्राएलमध्ये जन्मलेला माणूस असो किंवा तुमच्यामध्ये राहणारा एखादा विदेशी असो, चुकून केलेल्या गोष्टीबद्दल दोघांसाठी एकच नियम असावा.+ ३०  पण जर एखाद्याने* जाणूनबुजून पाप केलं,+ मग तो इस्राएलमध्ये जन्मलेला असो किंवा विदेशी, त्याने यहोवाची निंदा केली आहे आणि त्याला ठार मारलं जावं. ३१  त्याने यहोवाचा शब्द तुच्छ मानला आहे आणि त्याची आज्ञा मोडली आहे, म्हणून त्या माणसाला* कोणत्याही परिस्थितीत ठार मारलं जावं.+ त्याला त्याच्या अपराधाची शिक्षा मिळेल.’”+ ३२  इस्राएली लोक ओसाड रानात असताना, त्यांना एक माणूस शब्बाथाच्या दिवशी लाकडं गोळा करताना सापडला.+ ३३  ज्यांना तो लाकडं गोळा करताना सापडला, त्यांनी त्याला मोशे, अहरोन आणि सर्व इस्राएली लोकांकडे आणलं. ३४  त्यांनी त्याला कैदेत ठेवलं,+ कारण त्याच्यासोबत काय केलं जावं याबद्दल काही स्पष्ट सांगण्यात आलं नव्हतं. ३५  तेव्हा यहोवा मोशेला म्हणाला: “या माणसाला कोणत्याही परिस्थितीत ठार मारलं जावं.+ सर्व इस्राएली लोकांनी छावणीबाहेर त्याला दगडमार करावा.”+ ३६  मग यहोवाने मोशेला आज्ञा दिल्याप्रमाणे, सर्व इस्राएली लोकांनी त्याला छावणीबाहेर आणलं आणि दगडमार करून त्याला ठार मारलं. ३७  मग यहोवा मोशेला असं म्हणाला: ३८  “इस्राएली लोकांना सांग, की त्यांनी पिढ्या न्‌ पिढ्या आपल्या वस्त्रांच्या कडांसाठी झालर बनवावी आणि तिच्या वरती निळी दोरी लावावी.+ ३९  ‘तुम्ही ही झालर लावा, म्हणजे ती पाहिल्यावर तुम्हाला यहोवाच्या सर्व आज्ञा आठवतील आणि तुम्ही त्या पाळाल.+ तुम्ही तुमच्या मनात येईल आणि डोळ्यांना दिसेल तसं वागू नका, कारण तुमचं मन आणि डोळे तुम्हाला माझ्याशी अविश्‍वासूपणे वागायला लावतात.*+ ४०  या नियमामुळे तुम्हाला माझ्या सर्व आज्ञा लक्षात राहतील आणि तुम्ही त्या पाळून तुमच्या देवासाठी पवित्र राहाल.+ ४१  मी तुमचा देव यहोवा आहे. मीच तुमचा देव आहे, हे सिद्ध करण्यासाठी+ मी तुम्हाला इजिप्त देशातून बाहेर आणलं. मी तुमचा देव यहोवा आहे.’”+

तळटीपा

किंवा “समाधान म्हणून.” शब्दशः “शांतिदायक.”
एक एफाचा दहावा भाग म्हणजे २.२ ली. अति. ख१४ पाहा.
एक हिन म्हणजे ३.६७ ली. अति. ख१४ पाहा.
किंवा “समाधान म्हणून.” शब्दशः “शांतिदायक.”
किंवा “समाधानासाठी.” शब्दशः “शांतिदायक.”
किंवा “समाधान म्हणून.” शब्दशः “शांतिदायक.”
किंवा “समाधान म्हणून.” शब्दशः “शांतिदायक.”
किंवा “भाकर.”
किंवा “समाधानासाठी.” शब्दशः “शांतिदायक.”
किंवा “तरणा बैल.”
किंवा “एखाद्या जिवाकडून.”
किंवा “जिवासाठी.”
किंवा “एखाद्या जिवाने.”
किंवा “जिवाला.”
किंवा “इतर देवांसोबत वेश्‍येसारखी कृत्यं करायला लावतात.”