गणना १६:१-५०

  • कोरह, दाथान आणि अबीराम यांचं बंड (१-१९)

  • बंडखोरांना शिक्षा (२०-५०)

१६  मग कोरह+ याने दाथान, अबीराम आणि ओन यांना एकत्र केलं. कोरह इसहारचा,+ इसहार कहाथचा+ आणि कहाथ लेवीचा+ मुलगा होता. दाथान आणि अबीराम ही अलीयाबची मुलं+ होती. ओन पेलेथचा आणि पेलेथ रऊबेनचा+ मुलगा होता. २  ते २५० माणसांसोबत मोशेविरुद्ध उठले. ही माणसं इस्राएली लोकांच्या प्रधानांपैकी, मंडळीतून निवडलेली, तसंच, नावाजलेली माणसं होती. ३  ते सर्व मोशे आणि अहरोन यांच्याविरुद्ध एकत्र जमले+ आणि त्यांना म्हणू लागले: “खूप झालं तुमचं! इस्राएलचे सगळेच लोक पवित्र आहेत+ आणि यहोवा त्यांच्या मध्ये राहतो!+ मग तुम्ही यहोवाच्या मंडळीवर अधिकार का गाजवता?” ४  हे ऐकून मोशे लगेच पालथा पडला. ५  तो कोरह आणि त्याच्या साथीदारांना म्हणाला: “यहोवाचं कोण आहे+ आणि पवित्र कोण आहे आणि त्याच्या जवळ कोण जाऊ शकतं,+ हे तो स्वतःच सकाळी दाखवून देईल. तो ज्या कोणाला निवडेल,+ त्यानेच त्याच्या जवळ जावं. ६  कोरह असं कर, तू आणि तुझे सर्व साथीदार+ धूप जाळण्याची पात्रं घ्या.+ ७  त्यात जळते कोळसे ठेवा आणि त्यांवर धूप घालून तो उद्या यहोवासमोर न्या. ज्याला यहोवा निवडेल,+ तोच पवित्र आहे. लेवीच्या मुलांनो,+ तुम्ही तुमची मर्यादा ओलांडली आहे!” ८  मग मोशे कोरहला म्हणाला: “लेवीच्या मुलांनो, ऐका. ९  इस्राएलच्या देवाने तुम्हाला सगळ्या इस्राएली लोकांपासून वेगळं केलं+ आणि यहोवाच्या उपासना मंडपात सेवा करता यावी, म्हणून त्याच्या जवळ येऊ दिलं; तसंच इस्राएली लोकांची सेवा करण्यासाठी त्यांच्यासमोर तुम्हाला उभं केलं,+ ही काय तुम्हाला साधी गोष्ट वाटते? १०  देवाने लेवीच्या मुलांना, म्हणजे तुला आणि तुझ्या भावांना आपल्या जवळ घेतलं याची तुम्हाला जराही कदर नाही का? मग आता तुम्ही याजकपद बळकावण्याचा प्रयत्न का करताय?+ ११  तू आणि तुझे साथीदार खरंतर यहोवाच्या विरोधात उभे राहिले आहात. आणि अहरोन कोण आहे, की तुम्ही त्याच्याविरुद्ध कुरकुर करावी?”+ १२  नंतर मोशेने अलीयाबची मुलं, दाथान आणि अबीराम+ यांना बोलावलं. पण ते दोघं म्हणाले: “आम्ही नाही येणार! १३  तू आम्हाला दूध आणि मध वाहत असलेल्या देशातून बाहेर काढलंस आणि या ओसाड रानात मरायला घेऊन आलास,+ हे काय कमी होतं? आणि आता काय तुला आमचा राजाही बनायचंय?* १४  तसंही, तू आम्हाला दूध आणि मध वाहत असलेल्या+ कुठल्याही देशात नेलं नाहीस, किंवा आम्हाला शेत आणि मळे वारसा म्हणून दिले नाहीस. आता काय लोकांचे* डोळे फोडणार आहेस?* आम्ही येणार नाही!” १५  यावर मोशे खूप संतापला आणि यहोवाला म्हणाला: “त्यांच्या अन्‍नार्पणाकडे वळून पाहू नकोस. मी त्यांच्याकडून कधी एक गाढवही घेतलं नाही किंवा त्यांच्यापैकी एकालाही कधी इजा केली नाही.”+ १६  मग मोशे कोरहला म्हणाला: “तू आणि तुझे साथीदार उद्या यहोवासमोर या. तू, तुझे साथीदार आणि अहरोन, १७  प्रत्येकाने आपलं धूप जाळण्याचं पात्र घ्या आणि त्यावर धूप टाका आणि ती धूप-पात्रं, म्हणजे २५० धूप-पात्रं यहोवासमोर घेऊन या. तू आणि अहरोनही आपापलं धूप-पात्र घेऊन या.” १८  तेव्हा त्यांच्यापैकी प्रत्येकाने आपापलं धूप-पात्र घेतलं आणि त्यात जळते कोळसे ठेवून त्यांवर धूप घातला. मग ते मोशे आणि अहरोन यांच्यासोबत भेटमंडपाच्या प्रवेशाजवळ उभे राहिले. १९  जेव्हा कोरहने त्याच्या साथीदारांना,+ मोशे आणि अहरोन यांच्याविरुद्ध भेटमंडपाच्या प्रवेशाजवळ जमवलं, तेव्हा सर्व इस्राएली लोकांना यहोवाचं तेज दिसलं.+ २०  मग यहोवा मोशे आणि अहरोन यांना म्हणाला: २१  “तुम्ही या घोळक्यापासून वेगळे व्हा, म्हणजे मी एका क्षणात त्यांचा नाश करतो.”+ २२  तेव्हा मोशे आणि अहरोन जमिनीवर पालथे पडले आणि म्हणाले: “सर्वांना जीवन देणाऱ्‍या देवा,+ फक्‍त एका माणसाच्या पापामुळे सगळ्या इस्राएली लोकांवर तुझा राग भडकेल का?”+ २३  मग यहोवा मोशेला म्हणाला: २४  “इस्राएली लोकांना सांग, ‘कोरह, दाथान आणि अबीराम+ यांच्या तंबूंपासून दूर व्हा!’” २५  तेव्हा मोशे उठला आणि इस्राएलच्या वडिलांसोबत,+ दाथान व अबीराम यांच्याकडे गेला. २६  तो इस्राएली लोकांना म्हणाला: “या दुष्ट लोकांच्या तंबूंपासून दूर व्हा आणि त्यांच्या कोणत्याही वस्तूला स्पर्श करू नका, नाहीतर त्यांच्या पापामुळे तुमचाही नाश होईल.” २७  तेव्हा इस्राएली लोक लगेच कोरह, दाथान आणि अबीराम यांच्या तंबूंपासून दूर झाले. मग दाथान आणि अबीराम आपल्या बायकामुलांसोबत आपापल्या तंबूंच्या प्रवेशद्वाराजवळ येऊन उभे राहिले. २८  मग मोशे म्हणाला: “या सर्व गोष्टी मी माझ्या मनाने* करत नाही, तर यहोवाने मला या करायला पाठवलंय हे तुम्हाला यावरून कळेल: २९  जर इतर लोकांसारखाच यांना मृत्यू आला, म्हणजे सगळे लोक मरतात तसेच हे मेले, तर यहोवाने मला पाठवलं नाही.+ ३०  पण जर यहोवाने यांच्यासोबत जगावेगळं काही केलं आणि जमिनीने आपलं तोंड उघडून यांना आणि जे काही यांचं आहे ते गिळून टाकलं आणि जर ते जिवंतच कबरेत* गेले, तर यावरून तुमची खातरी पटेल, की या लोकांनी यहोवाचा अपमान केलाय.” ३१  मोशेचं बोलणं संपताच, त्या लोकांच्या पायाखालच्या जमिनीचे दोन भाग झाले.+ ३२  आणि जमिनीने आपलं तोंड उघडून त्यांना, त्यांच्या घराण्यांना आणि जे कोणी कोरहचे होते, त्या सर्वांना त्यांच्या सगळ्या मालमत्तेसोबत गिळून टाकलं.+ ३३  अशा प्रकारे ते आणि त्यांच्यासोबत असलेले सगळे जिवंतच कबरेत* गेले आणि जमिनीने त्यांना झाकून टाकलं. अशा रितीने मंडळीमधून त्यांचा नाश झाला.+ ३४  त्यांच्याभोवती असलेले सगळे इस्राएली लोक त्यांचं ओरडणं ऐकून घाबरून पळाले. ते म्हणू लागले: “जमीन आम्हालाही गिळून टाकेल!” ३५  यानंतर यहोवाकडून अग्नी आला+ आणि त्याने धूप अर्पण करणाऱ्‍या २५० माणसांना भस्म केलं.+ ३६  मग यहोवा मोशेला म्हणाला: ३७  “अहरोन याजकाचा मुलगा एलाजार याला आगीमधून धूप-पात्रं बाहेर काढायला सांग,+ कारण ती पात्रं पवित्र आहेत. तसंच त्याला त्यांतले कोळसे काही अंतरावर विखरून टाकायला सांग. ३८  पाप केल्यामुळे जे मेले, त्या लोकांच्या धूप-पात्रांचे पातळ पत्रे बनव आणि त्यांनी वेदीला मढव.+ कारण त्यांनी ती धूप-पात्रं यहोवासमोर आणली होती आणि ती पवित्र झाली. ती इस्राएली लोकांसाठी चिन्हं होतील.”+ ३९  मग अग्नीने भस्म झालेल्या लोकांनी जी तांब्याची धूप-पात्रं आणली होती, ती एलाजार याजकाने घेतली आणि वेदीला मढवण्यासाठी ठोकून त्यांचे पत्रे बनवले. ४०  यहोवाने मोशेद्वारे सांगितल्याप्रमाणेच त्याने केलं. अधिकार नसलेल्या* आणि अहरोनच्या संततीपैकी नसलेल्या कोणीही धूप जाळण्यासाठी यहोवापुढे येऊ नये;+ तसंच, कोणीही कोरह आणि त्याच्या साथीदारांसारखं बनू नये,+ याची इस्राएली लोकांना आठवण राहावी, म्हणून हे करण्यात आलं. ४१  दुसऱ्‍याच दिवशी सर्व इस्राएली लोक मोशे आणि अहरोन यांच्याविरुद्ध कुरकुर करत+ असं म्हणू लागले: “तुम्ही दोघांनी यहोवाच्या लोकांना ठार मारलंत.” ४२  सर्व इस्राएली लोक मोशे आणि अहरोन यांच्याविरुद्ध एकत्र जमल्यावर, ते सगळे भेटमंडपाच्या दिशेने वळले. तेव्हा त्यांना भेटमंडप ढगाने झाकलेला दिसला आणि यहोवाचं तेज प्रकट होऊ लागलं.+ ४३  मग मोशे आणि अहरोन भेटमंडपासमोर गेले.+ ४४  तेव्हा यहोवा मोशेला म्हणाला: ४५  “तुम्ही या सगळ्यांपासून वेगळे व्हा, म्हणजे मी एका क्षणात यांचा नाश करतो.”+ यावर ते दोघंही जमिनीवर पालथे पडले.+ ४६  तेव्हा मोशे अहरोनला म्हणाला: “धूप-पात्र घे, त्यात वेदीवरचे जळते कोळसे ठेव+ आणि त्यावर धूप टाक आणि लगेच इस्राएली लोकांकडे जाऊन त्यांच्यासाठी प्रायश्‍चित्त कर.+ कारण यहोवाचा राग भडकलाय आणि पीडा सुरू झाली आहे!” ४७  मोशेने सांगितल्याप्रमाणे अहरोनने लगेच धूप-पात्र घेतलं आणि तो मंडळीच्या मध्ये धावत गेला. पण तेवढ्यात लोकांवर पीडा यायला सुरुवात झाली होती, म्हणून त्याने धूप-पात्रावर धूप टाकला आणि तो लोकांसाठी प्रायश्‍चित्त करू लागला. ४८  तो मेलेल्या आणि जिवंत लोकांच्या मध्ये उभा राहिला आणि शेवटी ती पीडा थांबली. ४९  कोरहमुळे जितके लोक मेले त्यांना सोडून, पीडेमुळे आणखी १४,७०० लोक मेले. ५०  मग शेवटी पीडा थांबल्यावर, अहरोन भेटमंडपाजवळ मोशेकडे परत आला.

तळटीपा

किंवा “आमच्यावर अधिकारही गाजवायचाय?”
शब्दशः “त्या माणसांचे.” हे बंडात सामील झालेल्या लोकांना सूचित करत असावं.
त्यांनी डोळे मिटून आपल्यामागे चालावं अशी मोशे अपेक्षा करत होता, हे कदाचित यावरून सूचित होत असावं.
किंवा “स्वतःच्या इच्छेप्रमाणे.”
हिब्रू भाषेत “शिओल.”  शब्दार्थसूची पाहा.
हिब्रू भाषेत “शिओल.”  शब्दार्थसूची पाहा.
शब्दशः “परक्याने.”