गणना २:१-३४

  • छावणीची तीन वंशांच्या गटांमध्ये विभागणी (१-३४)

    • यहूदाचा गट पूर्वेला (३-९)

    • रऊबेनचा गट दक्षिणेला (१०-१६)

    • लेवीची छावणी मधोमध (१७)

    • एफ्राईमचा गट पश्‍चिमेला (१८-२४)

    • दानचा गट उत्तरेला (२५-३१)

    • नोंदणी झालेल्या पुरुषांची एकूण संख्या (३२-३४)

 मग यहोवा मोशे आणि अहरोन यांना म्हणाला: २  “इस्राएली लोकांनी, त्यांच्या तीन वंशांच्या गटाला+ जिथे नेमण्यात आलं आहे, तिथे तंबू ठोकावेत. प्रत्येक माणसाने आपापल्या कुळाच्या झेंड्याजवळ* तंबू ठोकावा. त्यांनी भेटमंडपाच्या दिशेने त्याच्या चारही बाजूला छावणी करावी. ३  पूर्वेकडे, सूर्योदयाच्या दिशेला, यहूदाच्या छावणीत तीन वंशांचा गट आपापल्या तुकड्यांप्रमाणे* तंबू ठोकेल. अम्मीनादाबचा मुलगा नहशोन हा यहूदाच्या मुलांचा प्रधान आहे.+ ४  त्याच्या सैन्यात नोंदणी झालेल्यांची संख्या ७४,६०० इतकी आहे.+ ५  त्याच्याशेजारी इस्साखारचा वंश असेल; सुवारचा मुलगा नथनेल हा इस्साखारच्या मुलांचा प्रधान आहे.+ ६  त्याच्या सैन्यात नोंदणी झालेल्यांची संख्या ५४,४०० इतकी आहे.+ ७  यानंतर जबुलूनचा वंश असेल; हेलोनचा मुलगा अलीयाब हा जबुलूनच्या मुलांचा प्रधान आहे.+ ८  त्याच्या सैन्यात नोंदणी झालेल्यांची संख्या ५७,४०० इतकी आहे.+ ९  यहूदाच्या छावणीतल्या सैन्यांत नोंदणी झालेल्यांची संख्या १,८६,४०० इतकी आहे. त्यांनी सर्वात आधी तळ हलवावा.+ १०  दक्षिणेकडे, रऊबेनच्या+ छावणीत तीन वंशांचा गट आपापल्या तुकड्यांप्रमाणे* तंबू ठोकेल. शदेयुरचा मुलगा अलीसूर हा रऊबेनच्या मुलांचा प्रधान आहे.+ ११  त्याच्या सैन्यात नोंदणी झालेल्यांची संख्या ४६,५०० इतकी आहे.+ १२  त्याच्याशेजारी शिमोनचा वंश असेल; सुरीशादैचा मुलगा शलूमियेल हा शिमोनच्या मुलांचा प्रधान आहे.+ १३  त्याच्या सैन्यात नोंदणी झालेल्यांची संख्या ५९,३०० इतकी आहे.+ १४  यानंतर गादचा वंश असेल; रगुवेलचा मुलगा एल्यासाप हा गादच्या मुलांचा प्रधान आहे.+ १५  त्याच्या सैन्यात नोंदणी झालेल्यांची संख्या ४५,६५० इतकी आहे.+ १६  रऊबेनच्या छावणीतल्या सैन्यांत नोंदणी झालेल्यांची संख्या १,५१,४५० इतकी आहे. तळ हलवताना ते दुसरे असतील.+ १७  भेटमंडप हलवण्यात येईल,+ तेव्हा लेव्यांची छावणी इतर छावण्यांच्या मधोमध असावी. इस्राएलचे वंश तीन वंशांच्या गटांप्रमाणे ज्या क्रमाने छावणी करतात, त्याच क्रमाने त्यांनी प्रवास करतानाही आपापल्या नेमलेल्या ठिकाणी असावं.+ १८  पश्‍चिमेकडे, एफ्राईमच्या छावणीत तीन वंशांचा गट आपापल्या तुकड्यांप्रमाणे* तंबू ठोकेल. अम्मीहूदचा मुलगा अलीशामा हा एफ्राईमच्या मुलांचा प्रधान आहे.+ १९  त्याच्या सैन्यात नोंदणी झालेल्यांची संख्या ४०,५०० इतकी आहे.+ २०  त्याच्याशेजारी मनश्‍शेचा+ वंश असेल; पदाहसुरचा मुलगा गमलियेल हा मनश्‍शेच्या मुलांचा प्रधान आहे.+ २१  त्याच्या सैन्यात नोंदणी झालेल्यांची संख्या ३२,२०० इतकी आहे.+ २२  यानंतर बन्यामीनचा वंश असेल; गिदोनीचा मुलगा अबीदान हा बन्यामीनच्या मुलांचा प्रधान आहे.+ २३  त्याच्या सैन्यात नोंदणी झालेल्यांची संख्या ३५,४०० इतकी आहे.+ २४  एफ्राईमच्या छावणीतल्या सैन्यांत नोंदणी झालेल्यांची संख्या १,०८,१०० इतकी आहे. तळ हलवताना ते तिसरे असतील.+ २५  उत्तरेकडे, दानच्या छावणीत तीन वंशांचा गट आपापल्या तुकड्यांप्रमाणे* तंबू ठोकेल. अम्मीशद्दैचा मुलगा अहीएजर हा दानच्या मुलांचा प्रधान आहे.+ २६  त्याच्या सैन्यात नोंदणी झालेल्यांची संख्या ६२,७०० इतकी आहे.+ २७  त्याच्याशेजारी आशेरचा वंश असेल; आक्रानचा मुलगा पगीयेल हा आशेरच्या मुलांचा प्रधान आहे.+ २८  त्याच्या सैन्यात नोंदणी झालेल्यांची संख्या ४१,५०० इतकी आहे.+ २९  यानंतर नफतालीचा वंश असेल; एनानचा मुलगा अहीरा हा नफतालीच्या मुलांचा प्रधान आहे.+ ३०  त्याच्या सैन्यात नोंदणी झालेल्यांची संख्या ५३,४०० इतकी आहे.+ ३१  दानच्या छावणीतल्या सैन्यांत नोंदणी झालेल्यांची संख्या १,५७,६०० इतकी आहे. त्यांनी त्यांच्या तीन वंशांच्या गटांप्रमाणे सर्वात शेवटी तळ हलवावा.”+ ३२  या सर्व इस्राएली लोकांची आपापल्या कुळांप्रमाणे नोंदणी झाली. सर्व छावण्यांपैकी सैन्यात भरती होण्यासाठी नोंदणी झालेल्यांची संख्या ६,०३,५५० इतकी होती.+ ३३  पण यहोवाने मोशेला आज्ञा दिल्याप्रमाणे, इतर इस्राएली लोकांसोबत लेव्यांची नोंदणी झाली नाही.+ ३४  यहोवाने मोशेला आज्ञा दिल्याप्रमाणे इस्राएली लोकांनी या सर्व गोष्टी केल्या. ते याच रितीने आपापल्या घराण्याप्रमाणे आणि आपापल्या कुळांप्रमाणे, तीन वंशांच्या गटांनुसार छावणी करायचे आणि तळ हलवायचे.+

तळटीपा

किंवा “चिन्हाजवळ.”
शब्दशः “आपापल्या सैन्यांप्रमाणे.”
शब्दशः “आपापल्या सैन्यांप्रमाणे.”
शब्दशः “आपापल्या सैन्यांप्रमाणे.”
शब्दशः “आपापल्या सैन्यांप्रमाणे.”