गणना २१:१-३५

  • अरादच्या राजाचा पराभव (१-३)

  • तांब्याचा साप (४-९)

  • इस्राएली लोकांचा मवाबच्या सीमेवरून प्रवास (१०-२०)

  • अमोरी राजा सीहोन याचा पराभव (२१-३०)

  • अमोरी राजा ओग याचा पराभव (३१-३५)

२१  इस्राएली लोक अथारीमच्या मार्गाने आले आहेत, ही गोष्ट नेगेबमध्ये राहणाऱ्‍या अरादच्या कनानी राजाला+ कळली, तेव्हा त्याने त्यांच्यावर हल्ला केला आणि काही लोकांना बंदी बनवून नेलं. २  मग इस्राएली लोकांनी यहोवाला असा नवस केला: “या लोकांना जर तू आमच्या हाती दिलंस, तर आम्ही त्यांच्या शहरांचा पूर्णपणे नाश करू.” ३  तेव्हा यहोवाने त्यांचं ऐकलं आणि कनानी लोकांना त्यांच्या हाती दिलं. त्यांनी त्या लोकांचा आणि त्यांच्या शहरांचा पूर्णपणे नाश केला. म्हणून त्यांनी त्या जागेचं नाव हर्मा*+ ठेवलं. ४  अदोमच्या+ देशाला वळसा घालण्यासाठी, इस्राएली लोक होर पर्वताकडून+ लाल समुद्राजवळच्या मार्गाने पुढचा प्रवास करू लागले. या प्रवासामुळे लोक* खूप थकले. ५  ते देवाविरुद्ध आणि मोशेविरुद्ध असं बोलू लागले:+ “तुम्ही आम्हाला इजिप्तमधून बाहेर का आणलं? या ओसाड रानात मरायला? इथे जेवण नाही, पाणी नाही+ आणि आता आम्हाला या घाणेरड्या भाकरीचा कंटाळा आलाय!”*+ ६  तेव्हा यहोवाने त्यांच्यामध्ये विषारी साप पाठवले. इस्राएली लोकांना ते साप चावू लागल्यामुळे बऱ्‍याच जणांचा मृत्यू झाला.+ ७  म्हणून लोक मोशेकडे आले आणि त्याला म्हणू लागले: “यहोवाविरुद्ध आणि तुझ्याविरुद्ध बोलून आम्ही पाप केलंय.+ यहोवाने हे साप काढून टाकावेत, म्हणून त्याला आमच्या वतीने याचना कर.” तेव्हा मोशेने त्यांच्या वतीने याचना केली.+ ८  मग यहोवा मोशेला म्हणाला: “तू एका विषारी सापाची प्रतिमा बनव आणि ती एका खांबावर लटकव. एखाद्याला साप चावला, तर त्याने जिवंत राहण्यासाठी त्याच्याकडे पाहावं.” ९  मोशेने लगेच एक तांब्याचा साप बनवला+ आणि तो एका खांबावर लटकवला.+ जेव्हा एखाद्या माणसाला साप चावायचा, तेव्हा तो त्या तांब्याच्या सापाकडे बघायचा आणि त्याचा जीव वाचायचा.+ १०  यानंतर इस्राएली लोक तिथून पुढे निघाले आणि त्यांनी ओबोथ इथे तळ ठोकला.+ ११  मग ओबोथनंतर त्यांनी पूर्वेकडे, मवाबसमोरच्या ओसाड रानात ईये-अबारीम इथे तळ दिला.+ १२  तिथून निघून त्यांनी जेरेदच्या खोऱ्‍याजवळ+ तळ दिला. १३  तिथून पुढे गेल्यावर त्यांनी आर्णोनच्या प्रदेशात तळ ठोकला.+ आर्णोन हे अमोरी लोकांच्या सीमेपासून सुरू होणाऱ्‍या ओसाड रानात आहे. ते अमोरी आणि मवाबी लोकांच्या मध्ये असलेल्या मवाबच्या हद्दीवर आहे. १४  त्यामुळेच, यहोवाच्या युद्धांच्या पुस्तकात या ठिकाणांबद्दल वाचायला मिळतं: “सुफांतला वाहेब आणि आर्णोनची खोरी, १५  खोऱ्‍यांचे उतार* जे आरच्या वस्त्यांपर्यंत आणि मवाबच्या सीमेपर्यंत पसरले आहेत.” १६  पुढे ते बैर इथे गेले. यहोवा याच विहिरीबद्दल मोशेला असं म्हणाला होता: “लोकांना जमव म्हणजे मी त्यांना पाणी देईन.” १७  त्या वेळी इस्राएली लोकांनी हे गीत गायलं: “हे विहिरी, उसळून ये! तिच्यासाठी गाणं गा! १८  राजकुमारांनी ती खणली आणि प्रधानांनी ती खोदली,एका राजदंडाने आणि आपल्या काठ्यांनी त्यांनी ती खणली.” मग ते ओसाड रानातून मत्तना इथे गेले. १९  तिथून ते नाहालीयेलला आणि नाहालीयेलवरून ते बामोथला+ गेले. २०  बामोथवरून ते मवाबच्या प्रदेशातल्या*+ खोऱ्‍यात, पिसगाच्या माथ्यावर+ गेले. तिथून यशीमोन* दिसतं.+ २१  मग इस्राएली लोकांनी अमोरी लोकांचा राजा सीहोन याच्याकडे असा निरोप पाठवला:+ २२  “आम्हाला तुझ्या देशातून पलीकडे जाऊ दे. आम्ही कोणत्याही शेतात किंवा द्राक्षमळ्यात जाणार नाही, किंवा कोणत्याही विहिरीतून पाणी पिणार नाही. आम्ही राजमार्गावरूनच तुझ्या देशातून पलीकडे जाऊ.”+ २३  पण सीहोनने इस्राएली लोकांना आपल्या देशातून पलीकडे जाऊ दिलं नाही. त्याऐवजी त्याने आपल्या सर्व लोकांना एकत्र केलं आणि तो ओसाड रानात त्यांच्याशी लढाई करायला निघाला. तो याहस इथे आला आणि इस्राएली लोकांशी लढू लागला.+ २४  तेव्हा इस्राएली लोकांनी त्याला तलवारीने हरवलं+ आणि आर्णोनपासून+ ते अम्मोनी लोकांच्या हद्दीजवळ असलेल्या यब्बोकपर्यंत,+ त्यांनी त्याच्या देशाचा ताबा घेतला.+ पण ते याजेरच्या+ पलीकडे गेले नाहीत, कारण याजेरपासून अम्मोनी लोकांची हद्द सुरू होते.+ २५  अशा प्रकारे इस्राएली लोकांनी ही सर्व शहरं काबीज केली आणि ते अमोरी+ लोकांच्या सर्व शहरांत, म्हणजे हेशबोनमध्ये आणि त्याच्या आजूबाजूच्या नगरांत राहू लागले. २६  हेशबोन हे अमोरी राजा सीहोन याचं शहर होतं. त्याने मवाबच्या राजाशी युद्ध करून, आर्णोनपर्यंत असलेला त्याचा सगळा प्रदेश जिंकला होता. २७  यामुळेच थट्टा करण्यासाठी अशी म्हण पडली: “हेशबोनला या. सीहोनचं शहर बांधलं जावं आणि बळकट व्हावं. २८  कारण हेशबोनमधून अग्नी निघाला, सीहोनच्या नगरातून ज्वाला निघाली. तिने मवाबच्या आरला भस्म केलं, आर्णोनमधल्या उच्च स्थानांवरच्या अधिकाऱ्‍यांना जाळून टाकलं. २९  हे मवाब, तुझी दुर्दशा होणार! कमोशच्या लोकांनो,+ तुम्ही नष्ट होणार! त्याच्यामुळे त्याची मुलं वणवण फिरतील आणि त्याच्या मुलींना अमोरी राजा सीहोन बंदी बनवून नेईल. ३०  आपण त्यांच्यावर हल्ला करू;हेशबोनचा दीबोनपर्यंत+ नाश केला जाईल. आपण नोफापर्यंत त्याला उद्ध्‌वस्त करू;मेदबापर्यंत+ आग पसरेल.” ३१  अशा प्रकारे इस्राएली लोक अमोरी लोकांच्या देशात राहू लागले. ३२  मग मोशेने काही हेरांना याजेरची+ पाहणी करण्यासाठी पाठवलं. इस्राएली लोकांनी याजेरच्या आजूबाजूच्या नगरांना काबीज केलं आणि तिथल्या अमोरी लोकांना पळवून लावलं. ३३  यानंतर ते वळले आणि बाशानच्या मार्गाने वर गेले. तेव्हा बाशानचा राजा ओग+ आपल्या सगळ्या लोकांना घेऊन त्यांच्याशी एद्रई इथे लढायला आला.+ ३४  मग यहोवा मोशेला म्हणाला: “त्याला घाबरू नकोस,+ कारण मी त्याला आणि त्याच्या लोकांना तुझ्या हातात देईन, तसंच त्याचा देशही तुझ्या हातात देईन.+ आणि जसं तू हेशबोनमधला अमोरी राजा सीहोन याच्यासोबत केलंस, तसंच तू त्याच्यासोबतही करशील.”+ ३५  तेव्हा इस्राएली लोक त्याच्यावर, त्याच्या मुलांवर आणि त्याच्या सर्व लोकांवर हल्ला करत राहिले आणि त्यांच्यातला एकही वाचला नाही.+ अशा रितीने इस्राएली लोकांनी त्याचा देश काबीज केला.+

तळटीपा

म्हणजे, “नाशासाठी समर्पित करणं.”
किंवा “लोकांचा जीव.”
किंवा “घृणा वाटू लागली आहे.”
शब्दशः “तोंड.”
किंवा कदाचित, “वाळवंट; रान.”
शब्दशः “मैदानातल्या.”