गणना २२:१-४१

  • बालाक बलामला पैसे देऊन बोलावतो (१-२१)

  • बलामची गाढवी बोलते (२२-४१)

२२  मग इस्राएली लोक निघाले आणि यार्देनच्या अलीकडे मवाबच्या मैदानात आले. यार्देनच्या पलीकडे यरीहो शहर होतं.+ २  इस्राएली लोकांनी अमोरी लोकांचं काय केलं, हे सिप्पोरचा मुलगा बालाक+ याला कळलं. ३  तेव्हा मवाबी लोक खूप घाबरले आणि त्यांच्या मनात इस्राएली लोकांची दहशत बसली,+ कारण इस्राएली लोकांची संख्या खूप मोठी होती. ४  मग मवाबी लोक मिद्यानच्या+ वडीलजनांना म्हणाले: “बैल जसा शेतातलं गवत फस्त करतो, तसे हे लोक आपल्या आसपासचं सगळं गिळून टाकतील.” सिप्पोरचा मुलगा बालाक हा त्या वेळी मवाबचा राजा होता. ५  त्याने नदीजवळच्या* पथोर इथल्या बौरच्या मुलाला, म्हणजे बलामला+ बोलवण्यासाठी काही लोकांना त्याच्याकडे पाठवलं. त्याने त्याला असा निरोप पाठवला: “बघ, इजिप्तमधून लोकांचा एक समुदाय बाहेर आलाय आणि पाहा, त्यांनी पृथ्वी* भरून टाकली आहे+ आणि आता तर ते माझ्या प्रदेशाजवळच राहत आहेत. ६  ते माझ्यापेक्षा शक्‍तिशाली आहेत. म्हणून कृपा करून इथे ये आणि माझ्या वतीने त्यांना शाप दे;+ म्हणजे, कदाचित मी त्यांना हरवीन आणि माझ्या देशातून पळवून लावीन. कारण मला चांगलं माहीत आहे, की ज्याला तू आशीर्वाद देतोस त्याला तो मिळतो आणि ज्याला तू शाप देतोस त्याला तो लागतो.” ७  मग मवाबचे आणि मिद्यानचे वडीलजन, आपल्यासोबत शकुन पाहण्याची किंमत घेऊन बलामकडे गेले+ आणि त्यांनी त्याला बालाकचा निरोप सांगितला. ८  यावर बलाम म्हणाला: “आज रात्री इथेच मुक्काम करा आणि यहोवा मला जे काही सांगेल, ते मी तुम्हाला सांगीन.” त्यामुळे मवाबचे अधिकारी बलामच्या सोबतच राहिले. ९  तेव्हा देव बलामकडे आला आणि म्हणाला:+ “तुझ्यासोबत ही माणसं कोण आहेत?” १०  बलाम खऱ्‍या देवाला म्हणाला: “मवाबचा राजा, म्हणजे सिप्पोरचा मुलगा बालाक याने मला असा निरोप पाठवलाय, ११  ‘इजिप्तमधून लोकांचा एक समुदाय बाहेर आलाय आणि पाहा, त्यांनी पृथ्वी भरून टाकली आहे. म्हणून इथे ये आणि या लोकांना शाप दे,+ म्हणजे कदाचित मला त्यांच्याशी लढता येईल आणि मी त्यांना पळवून लावीन.’” १२  पण देव बलामला म्हणाला: “तू त्यांच्यासोबत जाऊ नकोस आणि इस्राएली लोकांना शाप देऊ नकोस, कारण त्यांना मी आशीर्वाद दिलाय.”+ १३  बलाम सकाळी उठला आणि मवाबच्या अधिकाऱ्‍यांना म्हणाला: “तुम्ही आपल्या देशात परत जा, कारण यहोवाने मला तुमच्यासोबत येण्याची मनाई केली आहे.” १४  तेव्हा ते निघाले आणि बालाककडे येऊन त्याला म्हणाले: “बलामने आमच्यासोबत यायला नकार दिला.” १५  पण या वेळी, बालाकने पहिल्यापेक्षा जास्त आणि आणखी नावाजलेल्या अधिकाऱ्‍यांना बलामकडे पाठवलं. १६  ते बलामकडे येऊन त्याला म्हणाले: “सिप्पोरचा मुलगा बालाक म्हणतो, ‘काहीही करून तू माझ्याकडे ये. १७  मी तुझा खूप आदरसत्कार करीन आणि तू म्हणशील ते मी करीन. तेव्हा कृपा करून ये आणि या लोकांना शाप दे.’” १८  पण बलामने बालाकच्या सेवकांना उत्तर दिलं: “बालाकने सोन्याचांदीने भरलेलं आपलं घर जरी मला दिलं, तरीही मी माझा देव यहोवा याच्या आज्ञेबाहेर जाऊन काही करू शकत नाही, मग ती छोटी गोष्ट असो किंवा मोठी.+ १९  पण आज रात्रीही तुम्ही इथेच राहा, म्हणजे यहोवाला मला आणखी काय सांगायचंय ते मला कळेल.”+ २०  मग देव रात्री बलामकडे आला आणि त्याला म्हणाला: “हे लोक तुला बोलवायला आले असतील, तर यांच्यासोबत जा. पण मी तुला जे सांगीन तेच तू बोल.”+ २१  म्हणून बलाम सकाळी उठला आणि आपल्या गाढवीवर खोगीर घालून मवाबच्या अधिकाऱ्‍यांसोबत गेला.+ २२  पण तो चालला आहे हे पाहून देवाचा राग त्याच्यावर भडकला. आणि त्याला अडवण्यासाठी यहोवाचा स्वर्गदूत त्या रस्त्यावर येऊन उभा राहिला. बलाम आपल्या गाढवीवर बसून चालला होता आणि त्याच्यासोबत त्याचे दोन सेवकही होते. २३  यहोवाचा स्वर्गदूत हातात तलवार घेऊन रस्त्यात उभा आहे, हे जेव्हा त्याच्या गाढवीने पाहिलं, तेव्हा ती रस्त्यावरून उतरून शेतात जायचा प्रयत्न करू लागली. पण तिला पुन्हा रस्त्यावर आणण्यासाठी बलाम तिला मारू लागला. २४  मग यहोवाचा स्वर्गदूत दोन द्राक्षमळ्यांच्या मध्ये असलेल्या एका बोळात* उभा राहिला. त्याच्या दोन्ही बाजूला दगडी भिंती होत्या. २५  यहोवाच्या स्वर्गदूताला पाहताच, ती गाढवी भिंतीला चिकटू लागली आणि त्यामुळे बलामचा पाय चेंगरला. म्हणून तो तिला पुन्हा मारू लागला. २६  मग यहोवाचा स्वर्गदूत पुढे गेला आणि पुन्हा एका छोट्या वाटेत उभा राहिला. तिथेही डावी-उजवीकडे वळायला जागा नव्हती. २७  गाढवीने यहोवाच्या स्वर्गदूताला पाहिलं, तेव्हा ती तिथेच खाली बसली. यामुळे बलाम खूप चिडला आणि काठीने तिला मारू लागला. २८  शेवटी यहोवाने गाढवीला बोलण्याची शक्‍ती दिली*+ आणि ती बलामला म्हणाली: “मी असं काय केलं, की तुम्ही तीनदा मला मारलं?”+ २९  बलाम तिला म्हणाला: “तू माझी थट्टा केली आहेस. माझ्या हातात तलवार असती, तर मी तुला मारूनच टाकलं असतं!” ३०  तेव्हा गाढवी बलामला म्हणाली: “मी तुमचीच गाढवी आहे ना? आणि तुम्ही आयुष्यभर माझ्यावरच प्रवास केला आहे ना? याआधी मी तुमच्याशी कधी अशी वागले का?” तो म्हणाला: “नाही!” ३१  तेव्हा यहोवाने बलामचे डोळे उघडले+ आणि त्याने यहोवाच्या स्वर्गदूताला हातात तलवार घेऊन रस्त्यात उभं असल्याचं पाहिलं. तो लगेच वाकला आणि त्याने जमिनीवर डोकं टेकवून त्याला नमन केलं. ३२  मग यहोवाचा स्वर्गदूत त्याला म्हणाला: “तू तुझ्या गाढवीला तीन वेळा का मारलंस? हे बघ, मी स्वतः तुला अडवण्यासाठी आलोय, कारण तू जे करत आहेस, ते माझ्या इच्छेविरुद्ध आहे.+ ३३  त्या गाढवीने मला पाहिलं आणि म्हणून ती तीन वेळा माझ्यासमोरून वळली.+ जर ती वळली नसती, तर आतापर्यंत मी तुला मारून टाकलं असतं पण तिला सोडलं असतं.” ३४  बलाम यहोवाच्या स्वर्गदूताला म्हणाला: “मला माहीत नव्हतं, की मला भेटण्यासाठी रस्त्यात तू उभा आहेस. मी पाप केलंय. जर तुला वाटतं मी चुकीचं करतोय, तर मी परत जातो.” ३५  पण यहोवाचा स्वर्गदूत त्याला म्हणाला: “तू या लोकांसोबत जा, पण मी जे सांगीन तेच तू बोल.” तेव्हा बलाम बालाकच्या अधिकाऱ्‍यांसोबत पुढे निघाला. ३६  जेव्हा बालाकला कळलं, की बलाम आला आहे, तेव्हा तो लगेच त्याला भेटायला मवाबच्या शहराकडे गेला. ते शहर आर्णोनच्या काठावर आणि देशाच्या सीमेवर होतं. ३७  बालाक बलामला म्हणाला: “मी तुला बोलवलं होतं ना, मग तू का आला नाहीस? तुला काय वाटलं, मी तुझा मोठा आदरसत्कार करू शकणार नाही?”+ ३८  यावर बलाम बालाकला म्हणाला: “आता मी आलोय, पण तरीही मला काही बोलता येणार आहे का? मी तेच बोलू शकतो, जे देव मला सांगेल.”+ ३९  मग बलाम बालाकसोबत निघाला आणि ते किर्याथ-हसोथ इथे आले. ४०  तेव्हा बालाकने बैलांचं आणि मेंढरांचं बलिदान दिलं आणि त्यातलं काही मांस बलामकडे आणि त्याच्यासोबत असलेल्या अधिकाऱ्‍यांकडे पाठवलं. ४१  सकाळी बालाक बलामला घेऊन बामोथ-बाल इथे वर गेला. तिथून त्याला सर्व इस्राएली लोक दिसले.+

तळटीपा

हे फरात नदीला सूचित करतं.
किंवा “जमीन.”
किंवा “अरुंद वाटेत.”
शब्दशः “त्या गाढवीचं तोंड उघडलं.”