गणना २५:१-१८

  • इस्राएली लोक मवाबी स्त्रियांसोबत व्यभिचार करतात (१-५)

  • फिनहास पाऊल उचलतो (६-१८)

२५  इस्राएली लोक शिट्टिम+ इथे राहत होते, तेव्हा ते मवाबच्या मुलींसोबत व्यभिचार* करू लागले.+ २  जेव्हा मवाबी लोक आपल्या देवांना बलिदानं द्यायचे,+ तेव्हा त्या स्त्रिया इस्राएली लोकांना बोलवायच्या; ते लोक तिथे खाऊपिऊ लागले आणि त्यांच्या देवांना नमन करू लागले.+ ३  अशा प्रकारे, इस्राएली लोक त्यांच्यासोबत पौरच्या बआल देवाची उपासना करू लागले+ आणि त्यामुळे त्यांच्यावर यहोवाचा राग भडकला. ४  यहोवा मोशेला म्हणाला: “या लोकांच्या सर्व प्रमुखांना* ठार मारून त्यांना भर दिवसा* यहोवासमोर लटकव, म्हणजे इस्राएलवरचा यहोवाचा क्रोध शांत होईल.” ५  तेव्हा मोशे इस्राएलच्या न्यायाधीशांना म्हणाला:+ “तुमच्यापैकी प्रत्येकाने, पौरच्या बआलची उपासना करण्यात सामील झालेल्या माणसांना ठार मारावं.”+ ६  इस्राएली लोक भेटमंडपाच्या प्रवेशद्वाराजवळ रडत होते; तेवढ्यात, एक इस्राएली माणूस मोशेच्या आणि सर्व लोकांच्या देखत एका मिद्यानी स्त्रीला+ छावणीत घेऊन आला. ७  अहरोन याजकाचा नातू, म्हणजे एलाजारचा मुलगा फिनहास+ याने हे पाहिलं, तेव्हा तो लगेच उठला आणि त्याने भाला उचलला. ८  मग तो त्या इस्राएली माणसामागे तंबूत गेला आणि त्याने त्या दोघांना, म्हणजे त्या माणसाला आणि त्या स्त्रीला पोटात आरपार भोसकलं. तेव्हा इस्राएली लोकांवर आलेली पीडा थांबली.+ ९  या पीडेमुळे एकूण २४,००० लोक मेले.+ १०  मग यहोवा मोशेला म्हणाला: ११  “अहरोन याजकाचा नातू, एलाजारचा मुलगा फिनहास+ याने इस्राएली लोकांवरचा माझा राग शांत केला, कारण माझ्याविरुद्ध केलेला अविश्‍वासूपणा त्याने खपवून घेतला नाही.+ त्यामुळेच, फक्‍त माझीच उपासना केली जावी अशी अपेक्षा करणारा देव+ असूनही, मी इस्राएली लोकांचा नाश केला नाही. १२  म्हणून त्याला सांग, ‘मी त्याच्यासोबत शांतीचा करार करतो. १३  हा त्याच्यासाठी आणि त्याच्यानंतर येणाऱ्‍या त्याच्या संततीसाठी कायमच्या याजकपदाचा करार ठरेल.+ कारण, देवाविरुद्ध केलेला अविश्‍वासूपणा त्याने खपवून घेतला नाही+ आणि त्याने इस्राएली लोकांसाठी प्रायश्‍चित्त केलं.’” १४  मिद्यानी स्त्रीसोबत ज्याला ठार मारण्यात आलं त्या इस्राएली माणसाचं नाव जिम्री होतं. तो सालूचा मुलगा आणि शिमोनी लोकांच्या कुळाचा प्रमुख होता. १५  ज्या मिद्यानी स्त्रीला ठार मारण्यात आलं तिचं नाव कजबी होतं. ती मिद्यानमधल्या एका कुळातल्या घराण्यांचा प्रधान+ असलेल्या सूरची+ मुलगी होती. १६  नंतर यहोवा मोशेला म्हणाला: १७  “मिद्यानी लोकांवर हल्ला करून त्यांना मारून टाक,+ १८  कारण पौरच्या बआल देवाच्या बाबतीत त्यांनी चलाखीने वागून तुमच्यावर संकट आणलं.+ तसंच, पौरच्या बआल देवामुळे तुमच्यावर पीडा आली, त्या दिवशी ज्या मिद्यानी प्रधानाच्या मुलीला, म्हणजेच कजबीला ठार मारण्यात आलं होतं,+ तिच्याकडून त्यांनी तुम्हाला पाप करायला लावलं.”+

तळटीपा

किंवा “अनैतिक लैंगिक कृत्यं.”
शब्दशः “डोकी.”
शब्दशः “सूर्यासमोर.”