गणना २७:१-२३

  • सलाफहादच्या मुली (१-११)

  • मोशेनंतर यहोशवाची नेमणूक (१२-२३)

२७  मग मनश्‍शेच्या घराण्यातल्या सलाफहादच्या मुली+ पुढे आल्या. सलाफहाद हेफेरचा मुलगा, हेफेर गिलादचा, गिलाद माखीरचा, माखीर मनश्‍शेचा, आणि मनश्‍शे योसेफचा मुलगा होता. सलाफहादच्या मुलींची नावं महला, नोआ, होग्ला, मिल्का आणि तिरसा अशी होती. २  त्या मुली मोशेसमोर, तसंच एलाजार याजक, सर्व इस्राएली लोक आणि प्रधानांसमोर+ भेटमंडपाच्या प्रवेशद्वाराजवळ आल्या आणि म्हणाल्या: ३  “आमचे वडील ओसाड रानातच मेले. पण ते यहोवाचा विरोध करणाऱ्‍या कोरहच्या साथीदारांसोबत+ नव्हते. ते आपल्याच पापामुळे मेले आणि त्यांना एकही मुलगा नव्हता. ४  पण फक्‍त मुलगा नाही, म्हणून आमच्या वडिलांचं नाव त्यांच्या घराण्यातून का पुसलं जावं? आमच्या वडिलांच्या भावांसोबत आम्हालाही वारसा द्या.” ५  म्हणून मोशेने हा प्रश्‍न यहोवासमोर मांडला.+ ६  तेव्हा यहोवा मोशेला म्हणाला: ७  “सलाफहादच्या मुलींचं म्हणणं योग्य आहे. तू त्यांच्या वडिलांच्या भावांसोबत त्यांनाही वारसा दे आणि त्यांच्या वडिलांच्या जमिनीचा वाटा तू त्यांच्या नावावर कर.+ ८  इस्राएली लोकांना सांग, ‘एखाद्या माणसाचा मृत्यू झाला आणि त्याला मुलगा नसेल, तर तुम्ही त्याचा वारसा त्याच्या मुलीला द्या. ९  जर त्याला मुलगी नसेल, तर तुम्ही त्याचा वारसा त्याच्या भावांना द्या. १०  जर त्याला भाऊही नसतील, तर तुम्ही त्याचा वारसा त्याच्या वडिलांच्या भावांना द्या. ११  आणि जर त्याच्या वडिलांना एकही भाऊ नसेल, तर तुम्ही त्याचा वारसा त्याच्या घराण्यातल्या सर्वात जवळच्या रक्‍ताच्या नातेवाइकाला द्या, म्हणजे ती जमीन त्याच्या मालकीची होईल. यहोवाने मोशेला आज्ञा दिल्याप्रमाणे हा न्याय-निर्णय इस्राएली लोकांसाठी एक नियम असेल.’” १२  मग यहोवा मोशेला म्हणाला: “अबारीमच्या पर्वतावर+ जा आणि मी जो देश इस्राएली लोकांना देणार आहे तो पाहा.+ १३  तो पाहिल्यावर तूही तुझा भाऊ अहरोन याच्यासारखा+ आपल्या लोकांना जाऊन मिळशील.*+ १४  कारण झिनच्या ओसाड रानात,+ कादेश+ इथे मरीबाच्या पाण्याजवळ+ जेव्हा इस्राएली लोक माझ्याशी भांडले, तेव्हा तू त्यांच्यासमोर मला पवित्र करण्याच्या माझ्या आज्ञेविरुद्ध बंड केलंस.”+ १५  मग मोशे यहोवाला म्हणाला: १६  “सर्व माणसांना जीवन देणाऱ्‍या यहोवा देवा, तू या लोकांवर एका अशा माणसाला नेम, १७  जो सर्व बाबतींत त्यांचं नेतृत्व करेल आणि त्याने दाखवलेल्या मार्गावर लोक चालतील; म्हणजे यहोवाचे लोक मेंढपाळ नसलेल्या मेंढरांसारखे होणार नाहीत.” १८  तेव्हा यहोवा मोशेला म्हणाला: “नूनचा मुलगा यहोशवा याला घेऊन त्याच्यावर आपला हात ठेव,+ कारण त्याची मनोवृत्ती इतरांपेक्षा वेगळी आहे. १९  मग त्याला एलाजार याजकासमोर आणि सर्व इस्राएली लोकांसमोर उभं कर आणि सर्वांदेखत त्याची नेमणूक कर.+ २०  तू आपल्या अधिकारापैकी* काही त्याला दे,+ म्हणजे सगळे इस्राएली लोक त्याचं ऐकतील.+ २१  तो एलाजार याजकासमोर उभा राहील आणि एलाजार त्याच्या वतीने उरीमच्या* मदतीने यहोवाचे निर्णय+ विचारेल. आणि जे काही निर्णय दिले जातील, त्यांचं पालन तो आणि सर्व इस्राएली लोक करतील.” २२  तेव्हा यहोवाने आज्ञा दिल्याप्रमाणेच मोशेने केलं. त्याने यहोशवाला एलाजार याजकासमोर आणि सर्व इस्राएली लोकांसमोर उभं केलं. २३  मग यहोवाने मोशेला सांगितल्याप्रमाणे,+ त्याने आपले हात त्याच्यावर ठेवून त्याची नेमणूक केली.+

तळटीपा

काव्यात मरणाला सूचित करणारा वाक्यांश.
किंवा “सन्मानापैकी.”