गणना २८:१-३१

  • वेगवेगळी अर्पणं देण्याबद्दल नियम (१-३१)

    • दररोजची अर्पणं (१-८)

    • शब्बाथाची अर्पणं (९, १०)

    • दर महिन्याची अर्पणं (११-१५)

    • वल्हांडणाची अर्पणं (१६-२५)

    • सप्ताहांच्या सणाची अर्पणं (२६-३१)

२८  यानंतर यहोवा मोशेला म्हणाला: २  “इस्राएली लोकांना अशी आज्ञा दे, ‘तुम्ही माझी अर्पणं, म्हणजे माझी भाकर मला देण्याकडे दुर्लक्ष करू नका. आगीत जाळून केलेली ही अर्पणं मला नेमलेल्या वेळी द्या,+ म्हणजे त्यांच्या सुवासाने मला आनंद होईल.’* ३  त्यांना असंही सांग, ‘तुम्ही आगीत जाळून ही अर्पणं यहोवाला द्या: कोणताही दोष नसलेले एकेका वर्षाचे दोन मेंढे दररोज नियमितपणे होमार्पण म्हणून द्या.+ ४  यांपैकी एक मेंढा सकाळी, तर दुसरा संध्याकाळी* अर्पण करा.+ ५  त्यांसोबत एक एफाचा दहावा भाग* चांगलं पीठ, एक हिन* शुद्ध जैतुनाच्या तेलाच्या चौथ्या भागात मिसळून अन्‍नार्पण म्हणून द्या.+ ६  हे नियमितपणे द्यायचं होमार्पण आहे.+ याबद्दलची आज्ञा सीनाय पर्वतावर देण्यात आली होती. हे यहोवासाठी आगीत जाळून केलेलं अर्पण आहे आणि याच्या सुवासाने त्याला आनंद होईल.* ७  प्रत्येक मेंढ्यासोबत एक हिन मद्याचा चौथा भाग, पेयार्पण म्हणून द्या.+ यहोवासाठी पेयार्पण म्हणून तुम्ही हे मद्य पवित्र ठिकाणी ओतावं. ८  दुसरा मेंढा संध्याकाळी* अर्पण करा. सकाळच्या मेंढ्यासोबत जे अन्‍नार्पण आणि पेयार्पण दिलं होतं, त्यासारखंच या मेंढ्यासोबतही द्या. हे अर्पण आगीत जाळून केलेलं अर्पण म्हणून द्या, म्हणजे त्याच्या सुवासाने यहोवाला आनंद होईल.*+ ९  पण शब्बाथाच्या दिवशी,+ कोणताही दोष नसलेले एकेका वर्षाचे दोन मेंढे अर्पण केले जावेत. त्यांसोबत अन्‍नार्पण म्हणून तेलात मिसळलेलं दोन दशांश एफा चांगलं पीठ, तसंच त्यांचं पेयार्पणही दिलं जावं. १०  नियमितपणे दिलं जाणारं होमार्पण आणि त्याचं पेयार्पण+ यांसोबतच हे शब्बाथाचं होमार्पण आहे. ११  प्रत्येक महिन्याच्या* सुरुवातीला तुम्ही दोन गोऱ्‍हे,* एक मेंढा आणि कोणताही दोष नसलेली एकेका वर्षाची सात कोकरं यहोवासाठी होमार्पण म्हणून अर्पण करा.+ १२  प्रत्येक गोऱ्ह्यासोबत अन्‍नार्पण+ म्हणून तेलात मिसळलेलं तीन दशांश एफा चांगलं पीठ आणि मेंढ्यासोबत तेलात मिसळलेलं दोन दशांश एफा चांगलं पीठ द्या.+ १३  प्रत्येक कोकरासोबत अन्‍नार्पण म्हणून, तेलात मिसळलेलं एक दशांश एफा चांगलं पीठ द्या. हे होमार्पण आहे आणि तुम्ही ते आगीत जाळून अर्पण करा, म्हणजे त्याच्या सुवासाने यहोवाला आनंद होईल.*+ १४  तसंच, गोऱ्ह्यासोबत अर्धा हिन द्राक्षारस,+ मेंढ्यासोबत एक हिन द्राक्षारसाचा तिसरा भाग+ आणि कोकरासोबत एक हिन द्राक्षारसाचा चौथा भाग+ पेयार्पण म्हणून दिला जावा. हे वर्षभर दिलं जाणारं दर महिन्याचं होमार्पण आहे. १५  नियमितपणे दिलं जाणारं होमार्पण आणि त्याच्या पेयार्पणासोबतच, पापार्पण म्हणून एक बकराही यहोवासाठी दिला जावा. १६  पहिल्या महिन्याच्या, १४ व्या दिवशी यहोवासाठी वल्हांडण सण असेल.+ १७  आणि याच महिन्याच्या १५ व्या दिवशी एक सण असेल. सात दिवसांपर्यंत तुम्ही बेखमीर* भाकरी खा.+ १८  सणाच्या पहिल्या दिवशी पवित्र मेळावा असेल. त्या दिवशी तुम्ही कोणतंही मेहनतीचं काम करू नका. १९  तुम्ही यहोवासाठी आगीत जाळून केलेलं होमार्पण म्हणून दोन गोऱ्‍हे, एक मेंढा आणि एकेका वर्षाची सात कोकरं अर्पण करा. तुम्ही कोणताही दोष नसलेले प्राणी अर्पण म्हणून आणावेत.+ २०  या अर्पणांसोबत तुम्ही त्यांची अन्‍नार्पणंही द्यावीत. गोऱ्ह्यासाठी तेलात मिसळलेलं तीन दशांश एफा चांगलं पीठ+ आणि मेंढ्यासाठी तेलात मिसळलेलं दोन दशांश एफा चांगलं पीठ द्यावं. २१  सात कोकरांपैकी प्रत्येक कोकरासाठी एक दशांश एफा चांगलं पीठ द्यावं. २२  यांसोबतच तुमच्यासाठी प्रायश्‍चित्त म्हणून एक बकराही पापार्पण म्हणून द्यावा. २३  तुम्ही ही अर्पणं सकाळी नियमितपणे दिल्या जाणाऱ्‍या होमार्पणासोबत द्यावीत. २४  तुम्ही सात दिवसांपर्यंत याच पद्धतीने अन्‍न* म्हणून ही अर्पणं द्या. ही यहोवासाठी आगीत जाळून केलेली अर्पणं आहेत आणि त्यांच्या सुवासाने त्याला आनंद होईल.* ही नियमितपणे दिल्या जाणाऱ्‍या होमार्पणासोबत आणि त्याच्या पेयार्पणासोबत दिली जावीत. २५  सातव्या दिवशी पवित्र मेळावा असेल.+ या दिवशी तुम्ही कोणतंही मेहनतीचं काम करू नका.+ २६  पहिल्या पिकाच्या दिवशी,+ म्हणजे सप्ताहांच्या सणात+ जेव्हा तुम्ही यहोवासाठी नवीन अन्‍नार्पण द्याल,+ तेव्हा एक पवित्र मेळावा ठेवा. त्या दिवशी तुम्ही कोणतंही मेहनतीचं काम करू नका.+ २७  होमार्पण म्हणून तुम्ही दोन गोऱ्‍हे, एक मेंढा आणि एकेका वर्षाची सात कोकरं अर्पण करा, म्हणजे त्यांच्या सुवासाने यहोवाला आनंद होईल.*+ २८  त्यांसोबतच अन्‍नार्पण म्हणून प्रत्येक गोऱ्ह्यासाठी तेलात मिसळलेलं तीन दशांश एफा चांगलं पीठ द्या. तसंच, मेंढ्यासाठी दोन दशांश एफा चांगलं पीठ, २९  आणि सात कोकरांपैकी प्रत्येकासाठी एक दशांश एफा चांगलं पीठ तेलात मिसळून द्या. ३०  याशिवाय, तुमच्यासाठी प्रायश्‍चित्त म्हणून एक बकराही अर्पण करावा.+ ३१  नियमितपणे दिलं जाणारं होमार्पण आणि त्याचं अन्‍नार्पण यांसोबतच तुम्ही ही अर्पणंही द्यावीत. तुम्ही कोणताही दोष नसलेले प्राणी अर्पण म्हणून द्यावेत+ आणि त्यांसोबतची पेयार्पणंही द्यावीत.

तळटीपा

किंवा “समाधान होईल.” शब्दशः “शांतिदायक.”
किंवा “संधिप्रकाशाच्या वेळी.” शब्दशः “दोन संध्याकाळींच्या मधे.”
एक एफाचा दहावा भाग म्हणजे २.२ ली. अति. ख१४ पाहा.
एक हिन म्हणजे ३.६७ ली. अति. ख१४ पाहा.
किंवा “समाधान होईल.” शब्दशः “शांतिदायक.”
किंवा “समाधान होईल.” शब्दशः “शांतिदायक.”
किंवा “संधिप्रकाशाच्या वेळी.” शब्दशः “दोन संध्याकाळींच्या मधे.”
शब्दशः “तुमच्या महिन्यांच्या.”
किंवा “तरणे बैल.”
किंवा “समाधान होईल.” शब्दशः “शांतिदायक.”
किंवा “समाधान होईल.” शब्दशः “शांतिदायक.”
शब्दशः “भाकर.”
किंवा “समाधान होईल.” शब्दशः “शांतिदायक.”