गणना ३:१-५१

  • अहरोनची मुलं (१-४)

  • सेवा करण्यासाठी लेव्यांची निवड (५-३९)

  • प्रथमपुत्रांसाठी खंडणी (४०-५१)

 यहोवा मोशेसोबत सीनाय पर्वतावर+ बोलला, त्या वेळची अहरोन आणि मोशे यांची ही वंशावळ* आहे. २  अहरोनच्या मुलांची नावं अशी: पहिला मुलगा नादाब, मग अबीहू,+ एलाजार+ आणि इथामार.+ ३  ही अहरोनच्या मुलांची, म्हणजेच अभिषिक्‍त याजकांची नावं होती. त्यांना याजक म्हणून सेवा करण्यासाठी नियुक्‍त करण्यात आलं होतं.*+ ४  पण नादाब आणि अबीहू यांनी सीनायच्या ओसाड रानात यहोवासमोर नियमाविरुद्ध असलेला अग्नी नेल्यामुळे, त्यांचा यहोवासमोर मृत्यू झाला.+ त्यांना मुलं नव्हती. पण एलाजार+ आणि इथामार+ हे आपला पिता अहरोन याच्यासोबत याजक म्हणून सेवा करत राहिले. ५  मग यहोवा मोशेला म्हणाला: ६  “लेवी वंशातल्या+ लोकांना पुढे आण आणि त्यांना अहरोनसमोर उभं कर, म्हणजे ते त्याची सेवा करतील.+ ७  ते उपासना मंडपातली वेगवेगळी कामं करून, अहरोन आणि सर्व इस्राएली लोक यांच्यासाठी असलेल्या त्यांच्या जबाबदाऱ्‍या भेटमंडपासमोर पार पाडतील. ८  ते भेटमंडपातल्या सगळ्या सामानाची काळजी घेतील+ आणि उपासना मंडपाची वेगवेगळी कामं करून, इस्राएली लोकांसाठी असलेल्या आपल्या जबाबदाऱ्‍या पार पाडतील.+ ९  तू लेव्यांना, अहरोन आणि त्याच्या मुलांच्या हाती सोपवून दे. त्यांना इस्राएली लोकांमधून अहरोनला देण्यात आलं आहे. ते देण्यात आलेले लोक आहेत.+ १०  तू अहरोन आणि त्याच्या मुलांना नियुक्‍त कर, म्हणजे ते याजक म्हणून आपली कामं करतील.+ अधिकार नसलेला जो कोणी* उपासना मंडपाजवळ येईल, त्याला ठार मारलं जावं.”+ ११  यहोवा मोशेला पुढे म्हणाला: १२  “बघ, मी इस्राएली लोकांच्या सर्व प्रथमपुत्रांऐवजी* लेव्यांना निवडून घेत आहे.+ इस्राएली लोकांपैकी लेवी माझे होतील. १३  प्रत्येक प्रथमपुत्र माझा आहे.+ ज्या दिवशी मी इजिप्त देशातल्या प्रत्येक पहिल्या जन्मलेल्याला ठार मारलं,+ त्याच दिवशी मी इस्राएलमधल्या माणसांपासून ते प्राण्यांपर्यंत सर्व पहिल्या जन्मलेल्यांना स्वतःसाठी वेगळं केलं.+ ते माझे होतील. मी यहोवा आहे.” १४  सीनायच्या ओसाड रानात+ यहोवा मोशेला पुढे म्हणाला: १५  “लेवीच्या मुलांच्या नावांची त्यांच्या कुळांप्रमाणे आणि घराण्यांप्रमाणे नोंदणी कर. एक महिन्याच्या मुलापासून, त्यापेक्षा जास्त वय असलेल्या प्रत्येक पुरुषाची नोंदणी कर.”+ १६  तेव्हा, मोशेने यहोवाच्या आज्ञेप्रमाणे त्यांची नोंदणी केली. त्याला आज्ञा दिल्याप्रमाणेच त्याने केलं. १७  लेवीच्या मुलांची नावं अशी: गेर्षोन, कहाथ आणि मरारी.+ १८  गेर्षोनच्या मुलांची, त्यांच्या घराण्यांनुसार नावं अशी: लिब्नी आणि शिमी.+ १९  कहाथच्या मुलांची, त्यांच्या घराण्यांनुसार नावं अशी: अम्राम, इसहार, हेब्रोन आणि उज्जियेल.+ २०  मरारीच्या मुलांची, त्यांच्या घराण्यांनुसार नावं अशी: महली+ आणि मूशी.+ ही लेव्यांच्या कुळांप्रमाणे त्यांची घराणी होती. २१  गेर्षोनपासून लिब्नी+ आणि शिमी यांची घराणी आली. ही गेर्षोनपासून आलेली घराणी होती. २२  त्यांच्यातल्या एक महिन्याच्या मुलापासून, त्यापेक्षा जास्त वय असलेल्या ज्या सर्व पुरुषांची नोंदणी झाली, त्यांची संख्या ७,५०० इतकी होती.+ २३  गेर्षोनी लोकांच्या घराण्यांची छावणी पश्‍चिमेकडे, म्हणजे उपासना मंडपाच्या मागे होती.+ २४  गेर्षोनी लोकांच्या कुळाचा प्रधान, लायेलचा मुलगा एल्यासाप होता. २५  भेटमंडपात गेर्षोनच्या मुलांवर पुढे दिलेल्या गोष्टींची काळजी घेण्याची जबाबदारी होती:+ उपासना मंडप,+ त्याची आतली आणि बाहेरची आच्छादनं,*+ भेटमंडपाच्या प्रवेशाचा पडदा,+ २६  अंगणाचे पडदे,+ उपासना मंडपाच्या व वेदीच्या सभोवती असलेल्या अंगणाच्या प्रवेशद्वाराचा पडदा+ आणि पडद्याचे दोर. या गोष्टींशी संबंधित असलेली सर्व कामं त्यांच्यावर सोपवण्यात आली होती. २७  कहाथपासून अम्राम, इसहार, हेब्रोन आणि उज्जियेल यांची घराणी आली. ही कहाथपासून आलेली घराणी होती.+ २८  त्यांच्यातल्या एक महिन्याच्या मुलापासून, त्यापेक्षा जास्त वय असलेल्या सर्व पुरुषांची संख्या ८,६०० इतकी होती. त्यांच्यावर पवित्र ठिकाणाची देखभाल करण्याची जबाबदारी होती.+ २९  कहाथी लोकांच्या घराण्यांची छावणी उपासना मंडपाच्या दक्षिणेकडे होती.+ ३०  कहाथी लोकांच्या कुळाचा प्रधान, उज्जियेलचा मुलगा एलसाफान होता.+ ३१  त्यांच्यावर या गोष्टींची काळजी घेण्याची जबाबदारी होती: साक्षपेटी,+ मेज,+ दीपवृक्ष,*+ वेदी,+ पवित्र ठिकाणात सेवेसाठी वापरली जाणारी भांडी+ आणि पडदा.*+ या गोष्टींशी संबंधित असलेली सर्व कामं+ त्यांच्यावर सोपवण्यात आली होती. ३२  लेव्यांचा मुख्य प्रधान, अहरोन याजकाचा मुलगा एलाजार होता.+ पवित्र ठिकाणाची सर्व कामं करणाऱ्‍यांवर देखरेख करण्याची जबाबदारी त्याची होती. ३३  मरारीपासून महली आणि मूशी यांची घराणी आली. ही मरारीपासून आलेली घराणी होती.+ ३४  त्यांच्यातल्या एक महिन्याच्या मुलापासून, त्यापेक्षा जास्त वय असलेल्या ज्या सर्व पुरुषांची नोंदणी झाली, त्यांची संख्या ६,२०० इतकी होती.+ ३५  मरारी लोकांच्या कुळाचा प्रधान, अबीहईलचा मुलगा सुरीएल होता. त्यांची छावणी उपासना मंडपाच्या उत्तरेकडे होती.+ ३६  मरारीच्या मुलांवर या गोष्टींची देखरेख करण्याची जबाबदारी होती: उपासना मंडपाच्या चौकटी,+ त्याचे दांडे,+ त्याचे खांब,+ त्याच्या खाच असलेल्या बैठका आणि त्याची सर्व भांडी.+ या गोष्टींशी संबंधित असलेली सर्व कामं+ त्यांच्यावर सोपवण्यात आली होती. ३७  तसंच, अंगणाभोवती असलेले खांब, त्यांच्या खाच असलेल्या बैठका,+ अंगणाच्या खुंट्या आणि त्याचे दोर या गोष्टींची देखरेख करण्याची जबाबदारीही त्यांच्यावर होती. ३८  मोशे, अहरोन आणि त्याच्या मुलांची छावणी उपासना मंडपाच्या समोर पूर्वेकडे, म्हणजे भेटमंडपाच्या समोर सूर्य उगवण्याच्या दिशेला होती. इस्राएली लोकांच्या वतीने आपलं कर्तव्य म्हणून, उपासना मंडपाची देखभाल करण्याची जबाबदारी त्यांच्यावर होती. अधिकार नसलेला कोणीही* उपासना मंडपाजवळ आला, तर त्याला ठार मारलं जायचं.+ ३९  मोशे आणि अहरोन यांनी यहोवाच्या आदेशानुसार, लेव्यांपैकी एक महिन्याच्या मुलापासून, त्यापेक्षा जास्त वय असलेल्या ज्या सर्व पुरुषांची नोंदणी केली, त्यांची संख्या २२,००० इतकी होती. ४०  मग यहोवा मोशेला म्हणाला: “इस्राएली लोकांपैकी, एक महिन्याच्या मुलापासून, त्यापेक्षा जास्त वय असलेल्या सर्व प्रथमपुत्रांची नोंदणी कर;+ त्यांना मोजून त्यांच्या नावांची यादी तयार कर. ४१  तू इस्राएली लोकांच्या सर्व प्रथमपुत्रांऐवजी लेव्यांना माझ्यासाठी घे.+ तसंच, इस्राएली लोकांच्या पाळीव प्राण्यांच्या पहिल्या जन्मलेल्यांऐवजी, तू लेव्यांचे पाळीव प्राणी घे.+ मी यहोवा आहे.” ४२  तेव्हा मोशेने यहोवाच्या आज्ञेप्रमाणे, इस्राएलच्या सर्व प्रथमपुत्रांची नोंदणी केली. ४३  एक महिन्याच्या मुलापासून, त्यापेक्षा जास्त वय असलेल्या ज्या सर्व प्रथमपुत्रांची नोंदणी झाली, त्यांची संख्या २२,२७३ इतकी होती. ४४  यहोवा मोशेला पुढे म्हणाला: ४५  “इस्राएली लोकांच्या सर्व प्रथमपुत्रांऐवजी लेव्यांना घे आणि त्यांच्या पाळीव प्राण्यांऐवजी लेव्यांचे पाळीव प्राणी घे; लेवी लोक माझे होतील. मी यहोवा आहे. ४६  इस्राएली लोकांचे जे २७३ प्रथमपुत्र लेव्यांच्या संख्येपेक्षा जास्त आहेत,+ त्यांच्या खंडणीची* किंमत+ म्हणून, ४७  प्रत्येकासाठी पवित्र ठिकाणाच्या ठरलेल्या शेकेलप्रमाणे* पाच शेकेल घे.+ एक शेकेल* म्हणजे २० गेरे.*+ ४८  जे प्रथमपुत्र जास्त आहेत, त्यांच्या बदल्यात तू हे पैसे अहरोन आणि त्याच्या मुलांना दे.” ४९  तेव्हा मोशेने लेव्यांच्या खंडणीच्या किंमतीपेक्षा जास्त असलेल्या प्रथमपुत्रांना सोडवण्याची किंमत म्हणून ते पैसे घेतले. ५०  त्याने इस्राएलच्या प्रथमपुत्रांकडून, पवित्र ठिकाणाच्या ठरलेल्या शेकेलप्रमाणे १,३६५ शेकेल घेतले. ५१  मग यहोवाने सांगितल्याप्रमाणे* मोशेने खंडणीची ती किंमत अहरोन आणि त्याच्या मुलांना दिली. यहोवाने आज्ञा दिल्याप्रमाणेच मोशेने हे केलं.

तळटीपा

शब्दशः “पिढ्या.”
शब्दशः “ज्यांचे हात भरण्यात आले होते.”
शब्दशः “परका.” म्हणजे, अहरोनच्या वंशातला नसलेला माणूस.
शब्दशः “गर्भाशय उघडणारा प्रत्येक प्रथमपुत्र.”
किंवा “झाकण्याची कापडं.”
उपासना मंडपाला विभागणारा पडदा.
एक प्रकारची समई.
शब्दशः “परका.” म्हणजे, लेवी वंशातला नसलेला माणूस.
किंवा “सोडवण्याची.”
किंवा “पवित्र शेकेलप्रमाणे.”
एक शेकेल म्हणजे ११.४ ग्रॅम. अति. ख१४ पाहा.
एक गेरा म्हणजे ०.५७ ग्रॅम. अति. ख१४ पाहा.
किंवा “यहोवाच्या शब्दाप्रमाणे.” शब्दशः “तोंड.”