गणना ३०:१-१६

  • पुरुषांचे नवस (१, २)

  • स्त्रियांचे आणि मुलींचे नवस (३-१६)

३०  मग मोशे इस्राएलच्या वंशांच्या प्रमुखांना+ म्हणाला: “यहोवाने अशी आज्ञा दिली आहे: २  जर एखाद्या पुरुषाने यहोवाला नवस केला+ किंवा शपथ घेऊन+ स्वतःवर काही बंधनं लादली, तर त्याने दिलेला शब्द मोडू नये.+ त्याने शपथ घेतल्याप्रमाणे सर्वकाही करावं.+ ३  जर एखाद्या तरुण स्त्रीने आपल्या वडिलांच्या घरी राहत असताना, यहोवाला नवस केला किंवा शपथ घेऊन स्वतःवर काही बंधनं लादली, ४  आणि जर तिने केलेला नवस किंवा तिने शपथ घेऊन स्वतःवर लादलेल्या बंधनांबद्दल तिच्या वडिलांनी ऐकलं आणि जर त्यांनी कोणतीही हरकत घेतली नाही, तर तिच्या सगळ्या शपथा कायम राहतील. तिने शपथ घेऊन स्वतःवर लादलेलं प्रत्येक बंधन कायम राहील. ५  पण तिने केलेले नवस किंवा तिने शपथ घेऊन स्वतःवर लादलेल्या बंधनांबद्दल ऐकल्यावर, जर तिच्या वडिलांनी तिला मनाई केली, तर तिच्या शपथा रद्द होतील. तिच्या वडिलांनी तिला मनाई केल्यामुळे, यहोवा तिला क्षमा करेल.+ ६  पण, तिने शपथ घेतली असताना किंवा विचार न करता स्वतःवर एखादं बंधन लादलं असताना, जर तिचं लग्न झालं, ७  आणि तिच्या नवऱ्‍याने याबद्दल ऐकलं आणि त्या दिवशी त्याने त्याबद्दल काही हरकत घेतली नाही, तर तिने केलेले नवस किंवा तिने शपथ घेऊन स्वतःवर लादलेली बंधनं कायम राहतील. ८  पण, ज्या दिवशी तिच्या नवऱ्‍याने याबद्दल ऐकलं त्याच दिवशी जर त्याने त्याबद्दल हरकत घेतली, तर तिचा नवरा तो नवस, किंवा तिने विचार न करता स्वतःवर लादून घेतलेली शपथ रद्द करू शकतो,+ आणि यहोवा तिला क्षमा करेल. ९  जर एखाद्या विधवेने किंवा घटस्फोट झालेल्या स्त्रीने नवस केला असेल, तर तिने स्वतःवर लादून घेतलेली सगळी बंधनं कायम राहतील. १०  पण, जर एखाद्या स्त्रीने आपल्या नवऱ्‍याच्या घरी राहत असताना नवस केला किंवा शपथ घेऊन स्वतःवर एखादं बंधन लादून घेतलं, ११  आणि तिच्या नवऱ्‍याने त्याबद्दल ऐकलं, पण त्याने कोणतीही हरकत घेतली नाही किंवा मनाई केली नाही, तर तिचे सर्व नवस किंवा तिने शपथ घेऊन स्वतःवर जे काही बंधन लादलं असेल ते कायम राहील. १२  पण तिने केलेले नवस किंवा तिने शपथ घेऊन स्वतःवर लादलेल्या बंधनाबद्दल, जर तिच्या नवऱ्‍याने ऐकलं आणि त्याने ती शपथ त्याच दिवशी रद्द केली, तर ती कायम राहणार नाही.+ तिच्या नवऱ्‍याने ती रद्द केल्यामुळे यहोवा तिला क्षमा करेल. १३  एखाद्या स्त्रीला कोणताही नवस करायचा असेल, किंवा एखाद्या गोष्टीचा त्याग करायची* शपथ घ्यायची असेल, तर तिच्या नवऱ्‍याने त्याबद्दल परवानगी द्यावी किंवा तिच्या नवऱ्‍यानेच ती रद्द करावी. १४  पण तिने शपथ घेऊन बरेच दिवस झाल्यावरही, जर तिच्या नवऱ्‍याने कोणतीच हरकत घेतली नाही, तर याचा अर्थ तो तिच्या सगळ्या नवसांना आणि तिने शपथ घेऊन स्वतःवर लादलेल्या सगळ्या बंधनांना परवानगी देतो. ज्या दिवशी त्याने तिला त्या शपथा घेताना ऐकलं, त्याच दिवशी त्याने हरकत घेतली नाही, म्हणजे त्याने त्यांबद्दल परवानगी दिली आहे. १५  पण, त्याने त्या ऐकल्यावर काही दिवसांनी रद्द केल्या, तर त्याच्या बायकोच्या दोषाचे परिणाम त्याला भोगावे लागतील.+ १६  नवरा आणि बायकोबद्दल, तसंच वडील आणि त्याच्या घरी राहत असलेल्या त्याच्या तरुण मुलीबद्दल हे नियम यहोवाने मोशेला दिले.”

तळटीपा

किंवा “जिवाला पीडा देण्याची.”