गणना ३२:१-४२

  • यार्देनच्या पूर्वेकडच्या वस्त्या (१-४२)

३२  रऊबेनच्या+ आणि गादच्या मुलांजवळ+ पुष्कळ गुरंढोरं होती. गुराढोरांना चारण्यासाठी याजेर+ आणि गिलाद हे चांगले प्रदेश आहेत असं त्यांना दिसलं. २  म्हणून ते मोशे, एलाजार याजक आणि इस्राएली लोकांचे प्रधान यांच्याकडे येऊन म्हणाले: ३  “अटारोथ, दीबोन, याजेर, निम्रा, हेशबोन,+ एलाले, सबाम, नबो+ आणि बौनचा+ प्रदेश, ४  म्हणजेच यहोवाने इस्राएली लोकांच्या देखत ज्याला हरवलं,+ तो संपूर्ण प्रदेश गुराढोरांना चारण्यासाठी चांगला आहे आणि तुझ्या या सेवकांकडे पुष्कळ गुरंढोरं आहेत.”+ ५  ते पुढे म्हणाले: “आमच्यावर तुझी कृपा झाली असेल, तर हा प्रदेश तुझ्या या सेवकांना वारसा म्हणून दे. आम्हाला यार्देनच्या पलीकडे जायला लावू नकोस.” ६  तेव्हा मोशे गादच्या आणि रऊबेनच्या मुलांना म्हणाला: “तुमचे भाऊबंद युद्धाला जातील तेव्हा तुम्ही काय इथेच राहणार? ७  जो देश यहोवा इस्राएली लोकांना नक्कीच देणार आहे, त्या देशात त्यांनी जाऊ नये म्हणून तुम्ही त्यांचं धैर्य का खचवता? ८  मी कादेश-बर्ण्या इथून हा देश पाहण्यासाठी तुमच्या वाडवडिलांना पाठवलं, तेव्हा त्यांनीही असंच केलं होतं.+ ९  त्यांनी अष्कोलच्या खोऱ्‍यापर्यंत+ जाऊन त्या देशाची पाहणी केली आणि जो देश यहोवा इस्राएली लोकांना देणार होता, त्या देशात त्यांनी जाऊ नये म्हणून त्यांचं धैर्य खचवलं.+ १०  त्या दिवशी त्यांच्यावर यहोवाचा राग भडकला आणि त्याने अशी शपथ घेतली:+ ११  ‘मी जो देश अब्राहाम, इसहाक आणि याकोब यांना देण्याचं वचन दिलं होतं,+ तो देश इजिप्तमधून बाहेर आलेल्यांपैकी २० वर्षं आणि त्यापेक्षा जास्त वयाचा कोणीही माणूस पाहू शकणार नाही.+ कारण, त्यांनी पूर्ण मनाने माझ्या आज्ञा पाळल्या नाहीत. १२  फक्‍त कनिज्जी यफुन्‍नेचा मुलगा कालेब+ आणि नूनचा मुलगा यहोशवा,+ हेच त्या देशात जातील कारण त्यांनी पूर्ण मनाने यहोवाच्या आज्ञा पाळल्या.’+ १३  यहोवाचा राग इस्राएली लोकांवर भडकला आणि त्याने ४० वर्षं त्यांना ओसाड रानात भटकायला लावलं.+ शेवटी, यहोवाच्या नजरेत दुष्टपणे वागणारी ती संपूर्ण पिढी नष्ट झाली.+ १४  आणि आता तुम्हीही आपल्या वाडवडिलांसारखंच दुष्टपणे वागून इस्राएलवर यहोवाचा राग आणखीनच भडकवत आहात. १५  तुम्ही त्याच्या आज्ञा पाळायचं सोडून दिलं, तर तो नक्कीच या लोकांना पुन्हा ओसाड रानातच सोडून देईल आणि तुमच्यामुळे या सर्व लोकांचा नाश होईल.” १६  नंतर ते त्याच्याजवळ येऊन म्हणाले: “आम्हाला इथे आमच्या गुराढोरांसाठी वाडे* आणि आमच्या मुलाबाळांसाठी शहरं बांधू दे. १७  पण जोपर्यंत आम्ही इस्राएली लोकांना त्यांच्या ठिकाणी पोहोचवत नाही, तोपर्यंत आम्ही युद्धासाठी तयार राहून+ त्यांच्यापुढे जाऊ. आमची मुलंबाळं मात्र तटबंदी असलेल्या शहरांत या देशाच्या रहिवाशांपासून सुरक्षित राहतील. १८  इस्राएली लोकांपैकी प्रत्येकाला आपापली जमीन वारसा म्हणून मिळत नाही, तोपर्यंत आम्ही आपल्या घरी परत येणार नाही.+ १९  आम्हाला त्यांच्यासोबत यार्देन नदीच्या पलीकडे वारसा मिळणार नाही, कारण आम्हाला यार्देनच्या पूर्वेकडेच आमचा वारसा मिळालाय.”+ २०  मोशेने त्यांना उत्तर दिलं: “जर तुम्ही शस्त्रं घेऊन यहोवासमोर युद्धाला जाल,+ २१  आणि यहोवा त्याच्या सर्व शत्रूंना हाकलून लावत असताना,+ जर तुमच्यापैकी प्रत्येक जण शस्त्रं घेऊन यार्देन पार करेल; २२  आणि हा देश यहोवासमोर काबीज झाल्यानंतरच+ जर तुम्ही आपल्या घरी परत याल,+ तर मग तुम्ही यहोवासमोर आणि इस्राएलसमोर निर्दोष ठराल. आणि तेव्हा हा देश यहोवासमोर तुमच्या मालकीचा होईल.+ २३  पण जर तुम्ही असं केलं नाही, तर मग तुम्ही यहोवासमोर पाप कराल आणि तुम्हाला तुमच्या या पापाची शिक्षा भोगावी लागेल. २४  म्हणून, हवं तर तुमच्या मुलाबाळांसाठी शहरं आणि गुराढोरांसाठी वाडे बांधा,+ पण दिलेला शब्द तुम्ही पाळला पाहिजे.” २५  गादची आणि रऊबेनची मुलं मोशेला म्हणाली: “प्रभू, तुमचे हे सेवक तुमच्या म्हणण्याप्रमाणेच करतील. २६  आमची बायकामुलं, गुरंढोरं आणि आमचे सर्व पाळीव प्राणी गिलादच्या शहरांमध्ये राहतील,+ २७  पण तुम्ही सांगितल्याप्रमाणेच, तुमच्या या सेवकांतला प्रत्येक माणूस यहोवासमोर युद्ध करण्यासाठी शस्त्रं घेऊन नदी पार करेल.”+ २८  तेव्हा मोशेने एलाजार याजक, नूनचा मुलगा यहोशवा आणि इस्राएली वंशातल्या कुळांचे प्रमुख यांना त्यांच्याविषयी आज्ञा दिली. २९  मोशे त्यांना म्हणाला: “जर गादच्या आणि रऊबेनच्या मुलांपैकी प्रत्येक माणूस, शस्त्रं घेऊन यहोवासमोर लढण्यासाठी तुमच्यासोबत यार्देन पार करून आला, तर या देशावर ताबा मिळवल्यावर तुम्ही त्यांना गिलादचा प्रदेश वारसा म्हणून द्या.+ ३०  पण जर ते शस्त्रं घेऊन तुमच्यासोबत पलीकडे आले नाहीत, तर तेसुद्धा तुमच्यासोबत कनान देशातच वस्ती करतील.” ३१  यावर गादची आणि रऊबेनची मुलं म्हणाली: “यहोवाने तुमच्या या सेवकांना सांगितल्याप्रमाणेच आम्ही करू. ३२  आम्ही शस्त्रं घेऊन यहोवासमोर पलीकडे कनान देशात जाऊ,+ पण आमचा वारसा यार्देनच्या याच बाजूला असावा.” ३३  म्हणून मोशेने त्यांना, म्हणजे गादच्या व रऊबेनच्या मुलांना,+ तसंच योसेफचा मुलगा मनश्‍शे याच्या अर्ध्या वंशाला,+ अमोरी लोकांचा राजा सीहोन आणि बाशानचा राजा ओग यांची राज्यं,+ त्यांच्या क्षेत्रांतल्या शहरांची जमीन, तसंच शहरांच्या आजूबाजूची जमीनही दिली. ३४  मग गादच्या मुलांनी दीबोन,+ अटारोथ,+ अरोएर,+ ३५  अटारोथ-शोफान, याजेर,+ यागबहा,+ ३६  बेथनिम्रा+ आणि बेथ-हारान,+ ही तटबंदी असलेली शहरं बांधली.* तसंच, त्यांनी आपल्या कळपांसाठी वाडेही बनवले. ३७  रऊबेनच्या मुलांनी हेशबोन,+ एलाले,+ किर्याथाईम,+ ३८  नबो+ आणि बाल-मोन+ (या दोन शहरांची नावं बदलण्यात आली होती), तसंच सिब्मा ही शहरं बांधली. त्यांनी पुन्हा बांधलेल्या शहरांना नवीन नावं दिली. ३९  मनश्‍शेचा मुलगा माखीर याच्या मुलांनी+ गिलादवर हल्ला करून त्या प्रदेशाचा ताबा घेतला आणि तिथे राहत असलेल्या अमोरी लोकांना हाकलून लावलं. ४०  म्हणून मोशेने गिलादचा प्रदेश, मनश्‍शेचा मुलगा माखीर याच्या मुलांना दिला आणि ते तिथे वस्ती करू लागले.+ ४१  मनश्‍शेचा मुलगा याईर याने अमोरी लोकांवर आणि त्या प्रदेशातल्या नगरांवर हल्ला करून ती ताब्यात घेतली आणि त्यांना हव्वोथ-याईर*+ असं नाव दिलं. ४२  नोबह याने कनाथ आणि त्याच्या आजूबाजूच्या नगरांवर हल्ला करून त्यांचा ताबा घेतला आणि त्याने त्यांना आपल्या नावावरून नोबह असं नाव दिलं.

तळटीपा

हे जनावरांना राहण्यासाठी दगडी भिंतींचे कायमस्वरूपी वाडे होते.
किंवा “पुन्हा बांधली.”
म्हणजे, “याईरची छावण्या असलेली नगरं.”