गणना ३३:१-५६

  • इस्राएली लोकांच्या रानातल्या प्रवासातले टप्पे (१-४९)

  • कनान देश काबीज करण्याबद्दल सूचना (५०-५६)

३३  इस्राएली लोक मोशे आणि अहरोन यांच्या नेतृत्वाखाली+ आपापल्या तुकड्यांप्रमाणे*+ इजिप्त देशातून बाहेर पडल्यावर, त्यांनी त्यांच्या प्रवासादरम्यान हे सर्व टप्पे पार केले.+ २  यहोवाच्या आदेशाप्रमाणे, मोशेने त्यांच्या प्रवासातल्या टप्प्यांची नोंद करून ठेवली. त्यांच्या प्रवासातले वेगवेगळे टप्पे पुढीलप्रमाणे होते:+ ३  पहिल्या महिन्याच्या १५ व्या दिवशी,+ म्हणजे वल्हांडणाच्या दुसऱ्‍याच दिवशी+ ते रामसेस+ इथून निघाले. इस्राएली लोक इजिप्तच्या सर्व लोकांदेखत निर्भयपणे* बाहेर निघाले. ४  त्या वेळी इजिप्तचे सर्व लोक आपापल्या पहिल्या जन्मलेल्यांना पुरत होते,+ कारण यहोवाने त्यांना ठार मारलं होतं. यहोवाने त्यांच्या देवांना शिक्षा दिली होती.+ ५  मग इस्राएली लोक रामसेसहून निघाले आणि त्यांनी सुक्कोथ इथे तळ दिला.+ ६  नंतर ते सुक्कोथवरून निघाले आणि त्यांनी ओसाड रानाच्या सीमेवर असलेल्या एथाम इथे तळ दिला.+ ७  एथामवरून निघाल्यावर ते मागे वळून बालसफोनसमोर+ पीहहिरोथकडे आले आणि त्यांनी मिग्दोलसमोर तळ दिला.+ ८  यानंतर ते पीहहिरोथवरून निघाले आणि समुद्रामधून+ चालत पलीकडे ओसाड रानात+ गेले. मग एथामच्या ओसाड रानात+ तीन दिवस चालल्यावर, त्यांनी मारा+ इथे तळ दिला. ९  मारावरून निघाल्यावर ते एलीम इथे आले. एलीममध्ये पाण्याचे १२ झरे आणि खजुरांची ७० झाडं होती. म्हणून त्यांनी तिथे तळ दिला.+ १०  यानंतर एलीमवरून निघून त्यांनी तांबड्या समुद्राजवळ तळ दिला. ११  मग तांबड्या समुद्राजवळून निघून त्यांनी सीनच्या ओसाड रानात+ तळ दिला. १२  पुढे सीनच्या ओसाड रानातून निघून त्यांनी दफका इथे तळ दिला. १३  दफका इथून निघून त्यांनी आलूश इथे तळ दिला. १४  मग आलूशवरून निघून त्यांनी रफीदीम इथे तळ दिला.+ तिथे लोकांना प्यायला पाणी मिळालं नाही. १५  रफीदीम इथून निघून त्यांनी सीनायच्या ओसाड रानात तळ दिला.+ १६  मग सीनायच्या ओसाड रानातून निघून त्यांनी किब्रोथ-हत्तव्वा+ इथे तळ दिला. १७  किब्रोथ-हत्तव्वा इथून निघून त्यांनी हसेरोथ+ इथे तळ दिला. १८  हसेरोथवरून निघाल्यावर त्यांनी रिथमा इथे तळ दिला. १९  रिथमावरून निघाल्यावर त्यांनी रिम्मोन-पेरेस इथे तळ दिला. २०  मग रिम्मोन-पेरेसवरून निघाल्यावर त्यांनी लिब्ना इथे तळ दिला. २१  लिब्नावरून निघाल्यावर त्यांनी रिस्सा इथे तळ दिला. २२  रिस्सावरून निघाल्यावर त्यांनी कहेलाथा इथे तळ दिला. २३  कहेलाथावरून निघून त्यांनी शेफेर डोंगराजवळ तळ दिला. २४  शेफेर डोंगराजवळून निघून त्यांनी हरादा इथे तळ दिला. २५  मग हरादावरून निघून त्यांनी मकहेलोथ इथे तळ दिला. २६  मकहेलोथ इथून निघाल्यावर+ त्यांनी तहथ इथे तळ दिला. २७  यानंतर तहथवरून निघाल्यावर त्यांनी तारह इथे तळ दिला. २८  तारहवरून निघाल्यावर त्यांनी मिथका इथे तळ दिला. २९  मिथकावरून निघाल्यावर त्यांनी हशमोना इथे तळ दिला. ३०  हशमोनावरून निघून त्यांनी मोसेरोथ इथे तळ दिला. ३१  मोसेरोथवरून निघून त्यांनी बनेयाकान+ इथे तळ दिला. ३२  मग बनेयाकानवरून निघून त्यांनी होर-हागिदगाद इथे तळ दिला. ३३  होर-हागिदगादवरून निघून त्यांनी याटबाथा इथे तळ दिला.+ ३४  याटबाथावरून निघून त्यांनी अब्रोना इथे तळ दिला. ३५  त्यानंतर ते अब्रोनावरून निघाले आणि त्यांनी एसयोन-गेबेर+ इथे तळ दिला. ३६  एसयोन-गेबेर इथून निघून त्यांनी झिनच्या ओसाड रानात,+ म्हणजे कादेश इथे तळ दिला. ३७  नंतर ते कादेशवरून निघाले आणि त्यांनी अदोम देशाच्या सीमेवर असलेल्या होर पर्वताजवळ+ तळ दिला. ३८  तेव्हा, अहरोन याजक यहोवाच्या आज्ञेप्रमाणे होर पर्वतावर गेला; इस्राएली लोकांनी इजिप्त देश सोडल्यानंतरच्या ४० व्या वर्षी, पाचव्या महिन्याच्या पहिल्या दिवशी, त्याचा त्या पर्वतावर मृत्यू झाला.+ ३९  होर पर्वतावर अहरोनचा मृत्यू झाला तेव्हा तो १२३ वर्षांचा होता. ४०  अरादच्या कनानी राजाने+ इस्राएली लोक येत असल्याचं ऐकलं. तो कनान देशातल्या नेगेबमध्ये राहत होता. ४१  काही काळाने इस्राएली लोक होर पर्वताकडून निघाले+ आणि त्यांनी सलमोना इथे तळ दिला. ४२  नंतर ते सलमोनावरून निघाले आणि त्यांनी पूनोन इथे तळ दिला. ४३  पूनोनवरून निघाल्यावर त्यांनी ओबोथ इथे तळ दिला.+ ४४  ओबोथवरून निघाल्यावर त्यांनी मवाबच्या सीमेवर असलेल्या ईये-अबारीम इथे तळ दिला.+ ४५  मग ईयीमवरून निघाल्यावर त्यांनी दीबोन-गाद+ इथे तळ दिला. ४६  त्यानंतर दीबोन-गादवरून निघाल्यावर त्यांनी अलमोन-दिबलाथाईम इथे तळ दिला. ४७  अलमोन-दिबलाथाईमवरून निघाल्यावर त्यांनी नबोसमोर+ असलेल्या अबारीमच्या डोंगरांमध्ये+ तळ दिला. ४८  शेवटी, अबारीमच्या डोंगरांमधून निघाल्यावर त्यांनी यार्देनच्या काठावर, यरीहो इथे मवाबच्या मैदानांत तळ दिला.+ ४९  ते यार्देनच्या काठावर बेथ-यशिमोथपासून आबेल-शिट्टिमपर्यंत+ मवाबच्या मैदानांत तळ देऊन राहिले. ५०  यार्देनच्या काठावर, यरीहो इथे मवाबच्या मैदानांत यहोवा मोशेला म्हणाला: ५१  “इस्राएली लोकांना सांग, ‘तुम्ही यार्देन ओलांडून कनान देशात जात आहात.+ ५२  त्या देशातल्या सर्व रहिवाशांना तुम्ही आपल्यासमोरून हाकलून लावा आणि त्यांच्या सर्व कोरीव मूर्ती+ व धातूचे पुतळे*+ नष्ट करा. तसंच त्यांची पूजेची सर्व उच्च स्थानं तोडून-फोडून टाका.+ ५३  आणि तुम्ही त्या देशाचा ताबा घेऊन तिथे राहाल, कारण मी नक्की तो देश तुम्हाला वारसा म्हणून देईन.+ ५४  तुम्ही चिठ्ठ्या टाकून वारशाची जमीन तुमच्या घराण्यांमध्ये वाटून घ्या.+ मोठ्या घराण्यांसाठी मोठा वाटा आणि लहान घराण्यांसाठी लहान वाटा, वारसा म्हणून दिला जावा.+ जी चिठ्ठी निघेल त्याप्रमाणे प्रत्येकाला वारसा मिळेल. तुमच्या वाडवडिलांच्या वंशांप्रमाणे तुम्हाला तुमची जमीन वारसा म्हणून मिळेल.+ ५५  पण जर तुम्ही त्या देशातल्या रहिवाशांना तुमच्यासमोरून हाकलून लावलं नाही,+ तर ज्यांना तुम्ही राहू द्याल, ते तुमच्या डोळ्यांत टोचणाऱ्‍या काड्यांसारखे होतील आणि तुम्हाला काट्यांसारखे टोचत राहतील. तुम्ही राहत असलेल्या देशात ते तुमचा छळ करतील.+ ५६  आणि जे मी त्यांच्या बाबतीत करणार होतो, ते मी तुमच्यासोबत करीन.’”+

तळटीपा

शब्दशः “त्यांच्या सैन्यांप्रमाणे.”
शब्दशः “उंच केलेल्या हाताने.”
किंवा “ओतीव मूर्ती.”