गणना ३४:१-२९

  • कनानच्या सीमा (१-१५)

  • देशाची वाटणी करायला नेमलेले पुरुष (१६-२९)

३४  यहोवा मोशेला पुढे म्हणाला: २  “इस्राएली लोकांना या सूचना दे: ‘जेव्हा तुम्ही कनान देशात जाल,+ तेव्हा जी जमीन तुम्हाला वारसा म्हणून मिळेल, तिच्या सीमा अशा असतील:+ ३  तुमची दक्षिणेकडची सीमा अदोमच्या कडेने झिनच्या ओसाड रानापासून असेल आणि पूर्वेकडे ती मृत समुद्राच्या* टोकापासून सुरू होईल.+ ४  तिथून तुमची सीमा दिशा बदलून अक्रब्बीमच्या चढावाच्या+ दक्षिणेकडून झिनपर्यंत जाईल आणि कादेश-बर्ण्याच्या+ दक्षिणेला ती संपेल. पुढे ती हसर-अद्दारपर्यंत+ आणि त्यापुढे असमोनकडे जाईल. ५  असमोनपासून ती सीमा, इजिप्तच्या खोऱ्‍याकडे वळून समुद्रापर्यंत* जाऊन संपेल.+ ६  तुमची पश्‍चिमेकडची सीमा महासागर* आणि त्याचा समुद्रकिनारा असेल. हीच पश्‍चिम सीमा असेल.+ ७  तुमची उत्तरेकडची सीमा अशी असेल: महासागरापासून तुम्ही होर पर्वतापर्यंत सीमा आखा. ८  होर पर्वतापासून लेबो-हमाथपर्यंत*+ सीमा आखा. ती सदादपर्यंत+ असेल. ९  तिथून ती सीमा जिप्रोनकडे जाईल आणि हसर-एनान+ इथे येऊन संपेल. ही तुमची उत्तरेकडची सीमा असेल. १०  मग तुम्ही पूर्वेकडे हसर-एनानपासून शफामपर्यंत तुमची सीमा आखा. ११  ही सीमा शफामपासून अईनच्या पूर्वेकडे, रिब्लापर्यंत असेल आणि ती खाली किन्‍नेरेथ+ समुद्राच्या* पूर्वेकडच्या उतारापलीकडे जाईल. १२  ती पुढे यार्देनपर्यंत जाईल आणि मृत समुद्राजवळ जाऊन संपेल.+ हा तुमचा संपूर्ण देश+ आणि त्याच्या चारही बाजूंच्या सीमा असतील.’” १३  तेव्हा मोशेने इस्राएली लोकांना या सूचना दिल्या: “ही सर्व जमीन यहोवाने साडेनऊ वंशांना वारसा म्हणून देण्याची आज्ञा दिली आहे. ती तुम्ही चिठ्ठ्या टाकून आपसात वाटून घ्या.+ १४  रऊबेनच्या आणि गादच्या वंशांनी, तसंच मनश्‍शेच्या अर्ध्या वंशाने आपापल्या वाडवडिलांच्या घराण्यांप्रमाणे आधीच आपली वारशाची जमीन घेतली आहे.+ १५  या अडीच वंशांनी यरीहोजवळ यार्देन प्रदेशाच्या पूर्वेकडे, म्हणजे सूर्योदयाच्या दिशेला आपली वारशाची जमीन आधीच घेतली आहे.”+ १६  यहोवा मोशेला पुढे म्हणाला: १७  “तुम्ही ज्या जमिनीचा ताबा घेणार आहात, ती तुम्हाला वाटून देणाऱ्‍या पुरुषांची ही नावं आहेत: एलाजार+ याजक आणि नूनचा मुलगा यहोशवा.+ १८  यासोबतच तुमची वारशाची जमीन तुमच्यामध्ये वाटून देण्यासाठी तुम्ही प्रत्येक वंशातून एकेक प्रधान निवडा.+ १९  ही त्या प्रधानांची नावं आहेत: यहूदा वंशातला+ यफुन्‍नेचा मुलगा कालेब;+ २०  शिमोनच्या+ वंशातला अम्मीहूदचा मुलगा शमुवेल; २१  बन्यामीन वंशातला,+ किसलोनचा मुलगा अलीदाद; २२  दानच्या वंशातला+ प्रधान, योग्लीचा मुलगा बुक्की; २३  योसेफच्या मुलांपैकी,+ मनश्‍शेच्या वंशातला+ प्रधान, एफोदचा मुलगा हन्‍नीएल; २४  एफ्राईमच्या वंशातला+ प्रधान, शिफटानचा मुलगा कमुवेल; २५  जबुलूनच्या वंशातला+ प्रधान, पनीकचा मुलगा अलीसाफान; २६  इस्साखारच्या वंशातला+ प्रधान, अज्जानचा मुलगा पलतीयेल; २७  आशेरच्या वंशातला+ प्रधान, शलोमीचा मुलगा अहीहूद; २८  नफतालीच्या वंशातला+ प्रधान, अम्मीहूदचा मुलगा पदाहेल.” २९  या पुरुषांना यहोवाने कनान देशातली जमीन, इस्राएली लोकांना वाटून देण्याची आज्ञा दिली होती.+

तळटीपा

शब्दशः “क्षार समुद्र.”
म्हणजे, महासागर, भूमध्य समुद्र.
म्हणजे, भूमध्य समुद्र.
किंवा “हमाथच्या प्रवेशद्वारापर्यंत.”
म्हणजे, गनेसरेतचा सरोवर किंवा गालील समुद्र.