गणना ३५:१-३४

  • लेव्यांसाठी शहरं (१-८)

  • शरण-शहरं (९-३४)

३५  मग यहोवा, यार्देनच्या+ काठावर यरीहो इथे मवाबच्या मैदानांत मोशेला म्हणाला: २  “इस्राएली लोकांना सांग, की त्यांना मिळणाऱ्‍या वारशाच्या जमिनीतून त्यांनी लेव्यांना राहण्यासाठी शहरं द्यावीत.+ तसंच, त्यांनी त्या शहरांभोवती त्यांना गुरं चारण्याच्या जमिनीही द्याव्यात.+ ३  लेवी त्या शहरांमध्ये राहतील आणि गुरं चारण्याच्या जमिनी त्यांच्या गुराढोरांसाठी व इतर प्राण्यांसाठी, तसंच त्या प्राण्यांच्या देखभालीकरता लागणाऱ्‍या सामानासाठी असतील. ४  तुम्ही लेव्यांना गुरं चारण्याच्या ज्या जमिनी द्याल, त्या शहराच्या भिंतीपासून पुढे, चारही दिशांना १,००० हातांच्या* अंतरापर्यंत असतील. ५  तुम्ही शहराबाहेर पूर्वेकडे २,००० हात, दक्षिणेकडे २,००० हात, पश्‍चिमेकडे २,००० हात, तसंच उत्तरेकडे २,००० हात जमीन मोजून घ्या आणि शहर मधोमध असावं. लेव्यांच्या शहरांभोवती या गुरं चारण्याच्या जमिनी असतील. ६  तुम्ही लेव्यांना जी शहरं द्याल, त्यांपैकी सहा शरण-शहरं असतील.+ खून करणारा या शहरांत पळून जाऊ शकेल.+ यांशिवाय तुम्ही लेव्यांना आणखी ४२ शहरंही द्या. ७  अशा प्रकारे, तुम्ही लेव्यांना एकूण ४८ शहरं आणि त्यांच्याभोवती असलेल्या गुरं चारण्याच्या जमिनी द्या.+ ८  इस्राएली लोकांनी वारसा म्हणून मिळालेल्या आपल्या प्रदेशांतून लेव्यांना ही शहरं द्यावीत.+ तुम्ही मोठ्या वंशांकडून जास्त शहरं आणि छोट्या वंशांकडून कमी शहरं घ्या.+ प्रत्येक वंशाने आपल्याला मिळणाऱ्‍या वारशाप्रमाणे काही शहरं लेव्यांना द्यावीत.” ९  यहोवा मोशेला पुढे म्हणाला: १०  “इस्राएली लोकांना सांग, ‘तुम्ही यार्देन पार करून कनान देशात जात आहात.+ ११  तुम्ही सोयीच्या ठिकाणी असलेली शहरं आपल्यासाठी शरण-शहरं म्हणून निवडा. एखाद्याने जर चुकून कोणाला ठार मारलं,* तर त्याला या शहरांमध्ये पळून जाता येईल.+ १२  ही शहरं रक्‍ताचा सूड घेणाऱ्‍यापासून तुम्हाला वाचवतील;+ म्हणजे खून करणाऱ्‍याची मंडळीसमोर न्यायचौकशी होईपर्यंत त्याला ठार मारलं जाणार नाही.+ १३  तुम्ही दिलेली सहा शरण-शहरं यासाठीच असतील. १४  तुम्ही यार्देनच्या या बाजूला तीन शहरं+ आणि कनान देशात तीन शहरं,+ शरण-शहरं म्हणून द्या. १५  ही सहा शहरं इस्राएली लोकांसाठी, त्यांच्यामध्ये राहणाऱ्‍या विदेश्‍यासाठी+ आणि परक्यासाठी शरण-शहरं म्हणून असतील; म्हणजे जर एखाद्याने चुकून कोणाला ठार मारलं,* तर तो या शहरांत पळून जाऊ शकेल.+ १६  पण जर त्याने एखाद्या लोखंडी वस्तूने त्याला मारल्यामुळे तो मेला असेल, तर तो माणूस खुनी आहे. त्या खुन्याला कोणत्याही परिस्थितीत ठार मारलं जावं.+ १७  किंवा ज्यामुळे माणूस मरू शकतो, अशा एखाद्या दगडाने त्याने त्याला मारल्यामुळे तो मेला असेल, तर तो खुनी आहे. त्याला कोणत्याही परिस्थितीत ठार मारलं जावं. १८  आणि जिच्यामुळे माणूस मरू शकतो, अशा एखाद्या लाकडी वस्तूने त्याने त्याला मारल्यामुळे तो मेला असेल, तर तो खुनी आहे. त्या खुन्याला कोणत्याही परिस्थितीत ठार मारलं जावं. १९  रक्‍ताचा सूड घेणाऱ्‍याने त्या खुन्याला ठार मारावं. जेव्हा तो त्याला सापडेल, तेव्हा त्यानेच त्याला ठार मारावं. २०  जर एखाद्याने द्वेषामुळे कोणाला ढकललं, किंवा दुष्ट हेतूने*+ त्याला काही फेकून मारलं, २१  किंवा द्वेषामुळे त्याने त्याला हाताने मारलं आणि तो मेला, तर ज्याने त्याला मारलं त्याला कोणत्याही परिस्थितीत ठार मारलं जावं. तो खुनी आहे. रक्‍ताचा सूड घेणाऱ्‍याला तो खुनी सापडेल, तेव्हा त्याने त्याला ठार मारावं. २२  पण जर त्याने त्याला द्वेषामुळे नाही तर अचानक ढकललं, किंवा कुठलाही दुष्ट हेतू* नसताना+ काही फेकून मारलं; २३  किंवा त्याला तो दिसला नाही आणि त्याच्या हातून चुकून त्याच्यावर दगड पडला; आणि जर तो त्याचा शत्रू नव्हता किंवा त्याला इजा करण्याचा त्याचा हेतू नव्हता आणि तो माणूस मेला, २४  तर मग मंडळीने, मारणारा आणि रक्‍ताचा सूड घेणारा यांच्यामध्ये या नियमांप्रमाणे न्याय करावा.+ २५  मंडळीने खून करणाऱ्‍याला रक्‍ताचा सूड घेणाऱ्‍यापासून वाचवावं आणि ज्या शरण-शहरात तो पळून गेला होता, तिथे त्याला पुन्हा पोहोचवावं. पवित्र तेलाने अभिषिक्‍त करण्यात आलेल्या महायाजकाचा+ मृत्यू होईपर्यंत, त्या खुन्याने त्या शरण-शहरातच राहावं. २६  पण एखाद्या शरण-शहरात पळून गेल्यावर जर खुनी त्या शहराच्या हद्दीतून बाहेर गेला, २७  आणि जर रक्‍ताचा सूड घेणाऱ्‍याला तो त्याच्या शरण-शहराच्या हद्दीबाहेर सापडला आणि त्याने त्याला ठार मारलं, तर त्याला रक्‍तदोष लागणार नाही. २८  कारण महायाजकाचा मृत्यू होईपर्यंत त्याने शरण-शहरातच राहिलं पाहिजे, पण महायाजकाच्या मृत्यूनंतर खुनी पुन्हा आपल्या मालकीच्या जमिनीकडे जाऊ शकतो.+ २९  तुमच्या सगळ्या वस्त्यांमध्ये, न्याय करण्यासाठी तुम्ही पिढ्या न्‌ पिढ्या हे नियम पाळा. ३०  जो कोणी एखाद्याचा जीव घेतो, त्याला साक्षीदारांनी दिलेल्या साक्षीवरून खुनी+ ठरवून ठार मारावं.+ पण फक्‍त एकाच माणसाच्या साक्षीवरून* कोणालाही ठार मारू नका. ३१  ज्याला मृत्युदंड दिला गेला पाहिजे, अशा खुन्याच्या जिवासाठी तुम्ही खंडणी घेऊ नका, कारण त्याला कोणत्याही परिस्थितीत ठार मारलंच पाहिजे.+ ३२  आणि जो शरण-शहरात पळून गेला आहे, त्याला महायाजकाच्या मृत्यूआधी आपल्या मालकीच्या जमिनीकडे परत जाऊ देण्यासाठी खंडणी घेऊ नका. ३३  तुम्ही राहत असलेला देश दूषित करू नका कारण रक्‍तामुळे देश दूषित होतो.+ देशात सांडलेल्या रक्‍ताचं प्रायश्‍चित्त होऊ शकत नाही; फक्‍त ज्याने ते रक्‍त सांडलं आहे, त्याच्याच रक्‍ताने त्याचं प्रायश्‍चित्त होईल.+ ३४  तुम्ही राहत असलेला देश दूषित करू नका कारण मी तिथे राहतो. मी यहोवा, इस्राएली लोकांमध्ये राहतो.’”+

तळटीपा

एक हात म्हणजे ४४.५ सें.मी. (१७.५ इंच). अति. ख१४ पाहा.
किंवा “कोणाचा जीव घेतला.”
किंवा “कोणाचा जीव घेतला.”
शब्दशः “दबा धरून.”
शब्दशः “दबा धरून.”
शब्दशः “तोंड.”