गणना ४:१-४९

  • कहाथी लोकांची जबाबदारी (१-२०)

  • गेर्षोनी लोकांची जबाबदारी (२१-२८)

  • मरारी लोकांची जबाबदारी (२९-३३)

  • मोजणीचा सारांश (३४-४९)

 मग यहोवा मोशे आणि अहरोन यांना म्हणाला: २  “लेवीच्या मुलांपैकी असलेल्या कहाथच्या मुलांची,+ त्यांच्या घराण्यांप्रमाणे आणि कुळांप्रमाणे मोजणी केली जावी. ३  भेटमंडपात काम करण्यासाठी नेमण्यात आलेल्या गटातल्या, ३०+ ते ५० वर्षांपर्यंतच्या+ सर्व पुरुषांची मोजणी केली जावी.+ ४  भेटमंडपात कहाथची मुलं पुढील सेवा करतील.+ ही सेवा परमपवित्र आहे. ५  तळ हलवला जाईल, तेव्हा अहरोन आणि त्याची मुलं येऊन साक्षपेटीजवळचा पडदा काढतील+ आणि त्याने साक्षपेटीला+ झाकतील. ६  ते त्यावर तहशाच्या* कातडीचं आच्छादन टाकतील. मग त्यावर एक निळ्या रंगाचं कापड घालून, ते पेटी उचलून नेण्यासाठी असलेले दांडे+ तिला लावतील. ७  त्यानंतर, ते अर्पणाच्या भाकरींच्या मेजावरसुद्धा+ एक निळं कापड घालतील आणि त्यावर ते ताटं, प्याले, वाट्या आणि पेयार्पणाच्या सुरया+ ठेवतील. नियमित अर्पण केल्या जाणाऱ्‍या भाकरी+ त्यावरच ठेवल्या जाव्यात. ८  मग, ते त्यावर गडद लाल रंगाचं एक कापड टाकतील आणि त्याला तहशाच्या कातडीच्या आच्छादनाने झाकतील. नंतर, ते मेज उचलून नेण्यासाठी असलेले दांडे+ त्याला लावतील. ९  त्यानंतर, ते एका निळ्या कापडाने दीपवृक्ष,+ त्याचे दिवे,+ चिमटे, धूप जाळण्याची पात्रं,+ तसंच, दीपवृक्षासाठी लागणारी तेलाची सर्व भांडी झाकतील. १०  मग ते दीपवृक्ष आणि त्याची सर्व भांडी, तहशाच्या कातडीच्या आच्छादनात गुंडाळून, तो उचलून नेण्यासाठी एका दांड्यावर लटकवतील. ११  नंतर ते सोन्याच्या वेदीवर+ एक निळं कापड घालतील आणि तिला तहशाच्या कातडीच्या आच्छादनाने झाकतील. मग वेदी उचलून नेण्यासाठी असलेले दांडे+ ते तिला लावतील. १२  त्यानंतर, ते पवित्र ठिकाणात सेवा करण्यासाठी नेहमी वापरली जाणारी भांडी+ एका निळ्या कापडात बांधतील. नंतर, ते तहशाच्या कातडीच्या आच्छादनाने ती झाकतील आणि ती उचलून नेण्यासाठी एका दांड्यावर लटकवतील. १३  मग त्यांनी वेदीवरची राख* काढावी+ आणि वेदीवर जांभळ्या लोकरीचं कापड घालावं. १४  यानंतर, वेदीजवळ सेवा करताना वापरली जाणारी सर्व भांडी, म्हणजेच धूप जाळण्याची पात्रं, काटे, फावडी, वाट्या आणि वेदीची सगळी भांडी+ ते त्यावर ठेवतील. मग ते त्यांवर तहशाच्या कातडीचं आच्छादन टाकतील आणि ती उचलून नेण्यासाठी असलेले दांडे+ तिला लावतील. १५  अहरोन आणि त्याच्या मुलांनी पवित्र ठिकाणाच्या वस्तू आणि सगळं सामान झाकण्याचं काम पूर्ण केल्यावर+ जेव्हा निघायची वेळ येईल, तेव्हा कहाथची मुलं या वस्तू उचलून नेण्यासाठी पुढे येतील.+ पण त्यांनी पवित्र ठिकाणाच्या वस्तूंना हात लावू नये, नाहीतर ते मरतील.+ भेटमंडपातल्या या वस्तूंची जबाबदारी* कहाथच्या मुलांची आहे. १६  अहरोनचा मुलगा एलाजार+ याच्यावर पुढे दिलेल्या गोष्टींची देखरेख करण्याची जबाबदारी आहे: दिव्यांसाठी तेल,+ सुगंधित धूप,+ नेहमीचं अन्‍नार्पण आणि अभिषेकाचं तेल.+ संपूर्ण उपासना मंडप आणि त्यात जे काही आहे, म्हणजे मंडप आणि त्याची भांडी यांची देखरेख करण्याची जबाबदारी एलाजारची आहे.” १७  यहोवा मोशे आणि अहरोन यांना पुढे म्हणाला: १८  “लेव्यांमधून कहाथी लोकांच्या वंशाचा+ कधीही नाश होऊ देऊ नका. १९  परमपवित्र वस्तूंजवळ+ गेल्यामुळे ते मरू नयेत, म्हणून त्यांच्यासाठी असं करा: अहरोन आणि त्याची मुलं आत जाऊन त्यांच्यापैकी प्रत्येकाने काय काम करायचं आणि कोणत्या वस्तू उचलून न्यायच्या, हे त्यांना सांगतील. २०  त्यांनी आत येऊन एका क्षणासाठीही पवित्र वस्तू पाहू नयेत, नाहीतर ते मरतील.”+ २१  मग यहोवा मोशेला म्हणाला: २२  “गेर्षोनी लोकांची+ त्यांच्या कुळांप्रमाणे आणि घराण्यांप्रमाणे मोजणी कर. २३  भेटमंडपात काम करण्यासाठी नेमण्यात आलेल्या गटातल्या, ३० ते ५० वर्षांपर्यंतच्या सर्व पुरुषांची नोंदणी कर. २४  गेर्षोनच्या घराण्यांवर पुढे दिलेल्या वस्तूंची काळजी घेण्याची आणि त्या उचलून नेण्याची जबाबदारी असेल:+ २५  उपासना मंडपाची कापडं,+ भेटमंडप, त्याचं आच्छादन व त्याच्यावर टाकायचं तहशाच्या कातडीचं आच्छादन,+ भेटमंडपाच्या प्रवेशाचा पडदा,+ २६  अंगणाचे पडदे,+ उपासना मंडप व वेदीच्या सभोवती असलेल्या अंगणाच्या प्रवेशद्वाराचा पडदा,+ त्यांचे दोर आणि त्यांची सर्व भांडी, तसंच, सेवेसाठी वापरल्या जाणाऱ्‍या सर्व वस्तू. ही त्यांची जबाबदारी आहे. २७  गेर्षोनी लोकांची+ सगळी कामं आणि त्यांनी कोणत्या वस्तू उचलून न्याव्यात, यावर अहरोन आणि त्याची मुलं देखरेख करतील. तुम्ही या सर्व वस्तू उचलून नेण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवा. २८  भेटमंडपात गेर्षोनी लोकांच्या घराण्यांनी ही कामं करावीत+ आणि अहरोन याजकाचा मुलगा इथामार याच्या देखरेखीखाली+ त्यांनी आपल्या जबाबदाऱ्‍या पार पाडाव्यात. २९  मरारीच्या मुलांची+ त्यांच्या घराण्याप्रमाणे आणि कुळाप्रमाणे मोजणी कर. ३०  भेटमंडपात काम करण्यासाठी नेमण्यात आलेल्या गटातल्या, ३० ते ५० वर्षांपर्यंतच्या सर्व पुरुषांची नोंदणी कर. ३१  भेटमंडपात त्यांना नेमून दिलेल्या कामांत, पुढे दिलेल्या वस्तू उचलून नेण्याची जबाबदारी त्यांची असेल:+ उपासना मंडपाच्या चौकटी,+ त्याचे दांडे,+ खांब,+ खाच असलेल्या बैठका;+ ३२  अंगणाचे खांब,+ त्यांच्या खाच असलेल्या बैठका,+ अंगणाच्या खुंट्या+ आणि त्याचे दोर, तसंच त्याचं सर्व सामान. या वस्तूंशी संबंधित सर्व कामं त्यांनी करावीत. ज्या वस्तू उचलून नेण्याची जबाबदारी त्यांच्यावर आहे, त्या त्यांना नावाप्रमाणे नेमून द्या. ३३  मरारीच्या मुलांच्या घराण्यांनी+ अहरोन याजकाचा मुलगा इथामार याच्या देखरेखीखाली भेटमंडपात अशा रितीने सेवा करावी.”+ ३४  मग मोशे, अहरोन आणि इस्राएली लोकांचे प्रधान+ यांनी, कहाथच्या मुलांच्या घराण्यांप्रमाणे+ आणि कुळाप्रमाणे त्यांची नोंदणी केली. ३५  भेटमंडपात काम करण्यासाठी नेमण्यात आलेल्या गटातल्या, ३० ते ५० वर्षांपर्यंतच्या सर्व पुरुषांची त्यांनी नोंदणी केली.+ ३६  आपापल्या घराण्यांनुसार नोंदणी झालेल्यांची एकूण संख्या २,७५० इतकी होती.+ ३७  कहाथी लोकांच्या घराण्यांतून भेटमंडपात सेवा करणाऱ्‍यांपैकी या लोकांची नोंदणी झाली. यहोवाने मोशेला आदेश दिल्याप्रमाणे, मोशे आणि अहरोन यांनी त्यांची नोंदणी केली.+ ३८  गेर्षोनच्या मुलांची+ त्यांच्या घराण्यांप्रमाणे आणि त्यांच्या कुळाप्रमाणे नोंदणी करण्यात आली. ३९  भेटमंडपात काम करण्यासाठी नेमण्यात आलेल्या गटातल्या, ३० ते ५० वर्षांपर्यंतच्या सर्व पुरुषांची नोंदणी झाली. ४०  घराण्यांनुसार आणि कुळानुसार नोंदणी झालेल्यांची एकूण संख्या २,६३० इतकी होती.+ ४१  गेर्षोनी लोकांच्या घराण्यांतून भेटमंडपात सेवा करणाऱ्‍यांपैकी या लोकांची नोंदणी झाली. यहोवाने आदेश दिल्याप्रमाणे, मोशे आणि अहरोन यांनी त्यांची नोंदणी केली.+ ४२  मरारीच्या मुलांची त्यांच्या घराण्यांप्रमाणे आणि त्यांच्या कुळाप्रमाणे नोंदणी करण्यात आली. ४३  भेटमंडपात काम करण्यासाठी नेमण्यात आलेल्या गटातल्या, ३० ते ५० वर्षांपर्यंतच्या सर्व पुरुषांची नोंदणी झाली.+ ४४  घराण्यांनुसार नोंदणी झालेल्यांची एकूण संख्या ३,२०० इतकी होती.+ ४५  मरारी लोकांच्या या घराण्यांची नोंदणी झाली. यहोवाने मोशेला आदेश दिल्याप्रमाणे, मोशे आणि अहरोन यांनी त्यांची नोंदणी केली.+ ४६  मग मोशे, अहरोन आणि इस्राएली लोकांचे प्रधान यांनी, या सर्व लेव्यांची त्यांच्या घराण्यांप्रमाणे आणि कुळांप्रमाणे नोंदणी केली. ४७  त्या लेव्यांचं वय ३० वर्षांपासून ते ५० वर्षांपर्यंत होतं आणि त्या सर्वांना भेटमंडपातली कामं करण्यासाठी आणि त्याच्या वस्तू उचलून नेण्यासाठी नेमण्यात आलं.+ ४८  एकूण ८,५८० जणांची नोंदणी झाली.+ ४९  यहोवाने मोशेला दिलेल्या आदेशानुसार त्यांची नोंदणी करण्यात आली. प्रत्येकाला दिलेल्या कामानुसार आणि त्याला ज्या वस्तू उचलून नेण्यासाठी नेमण्यात आलं होतं, त्यानुसार त्याची नोंदणी झाली. यहोवाने मोशेला आज्ञा दिल्याप्रमाणेच लेव्यांची नोंदणी करण्यात आली.

तळटीपा

हिब्रू भाषेत तहश हा शब्द एका समुद्री प्राण्याला सूचित करतो. इंग्रजीत या प्राण्याला सील म्हणतात. हा डॉल्फीन माशाच्या आकाराचा असतो.
किंवा “चरबीयुक्‍त राख,” म्हणजे बलिदानांच्या चरबीत भिजलेली राख.
शब्दशः “ओझं.”