गणना ५:१-३१

  • अशुद्ध लोकांना छावणीबाहेर पाठवणं (१-४)

  • कबुली आणि भरपाई (५-१०)

  • व्यभिचाराचा संशय आला तर पाण्याने परीक्षा (११-३१)

 यहोवा मोशेला पुढे म्हणाला: २  “इस्राएली लोकांना अशी आज्ञा दे, की त्यांनी कुष्ठरोग झालेल्या+ किंवा स्राव होत असलेल्या,+ तसंच मृत व्यक्‍तीमुळे* अशुद्ध झालेल्या+ प्रत्येकाला छावणीतून बाहेर पाठवावं. ३  तुम्ही त्या व्यक्‍तीला बाहेर पाठवावं, मग ती स्त्री असो किंवा पुरुष. तुम्ही त्यांना छावणीतून बाहेर पाठवावं, म्हणजे त्यांच्यामुळे माझ्या लोकांची संपूर्ण छावणी दूषित होणार नाही,+ कारण मी त्यांच्यामध्ये राहतो.”+ ४  तेव्हा, इस्राएली लोकांनी तसंच केलं आणि अशा व्यक्‍तींना छावणीबाहेर पाठवलं. यहोवाने मोशेला सांगितल्याप्रमाणे इस्राएली लोकांनी केलं. ५  यहोवा मोशेला पुढे म्हणाला: ६  “इस्राएली लोकांना सांग, ‘जर एखादा पुरुष किंवा स्त्री पाप करून यहोवाशी अविश्‍वासूपणे वागली, तर ती* दोषी आहे.+ ७  त्या व्यक्‍तीने* आपल्या पापाची कबुली द्यावी+ आणि आपल्या* दोषाबद्दल पूर्ण भरपाई करून, भरपाईच्या किंमतीसोबतच तिचा पाचवा भागही द्यावा;+ ज्याच्याविरुद्ध तिने अपराध केला असेल, त्याला तिने तो द्यावा. ८  पण ज्याच्याविरुद्ध अपराध घडला आहे, त्या माणसाचा मृत्यू झाला असेल आणि त्याचा कोणीही जवळचा नातेवाईक नसेल, तर भरपाईची किंमत यहोवाला दिली जावी आणि ती याजकाची होईल. याशिवाय, त्या माणसासाठी प्रायश्‍चित्त म्हणून याजक जो मेंढा अर्पण करेल, तोही त्याचा होईल.+ ९  इस्राएली लोकांकडून याजकाकडे आणलं जाणारं प्रत्येक पवित्र दान+ त्याचं होईल.+ १०  प्रत्येक जण याजकाला जे देईल ते याजकाचं होईल. प्रत्येक व्यक्‍तीच्या पवित्र गोष्टी त्याच्याच असतील.’” ११  यहोवा मोशेला पुढे म्हणाला: १२  “इस्राएली लोकांना सांग, ‘जर एखाद्या माणसाच्या बायकोचं पाऊल वाकडं पडलं आणि ती त्याच्याशी अविश्‍वासूपणे वागली, १३  आणि दुसऱ्‍या माणसाने तिच्याशी शरीरसंबंध ठेवूनही+ जर ही गोष्ट तिच्या नवऱ्‍यापासून लपून राहिली आणि कोणालाच कळली नाही; आणि जर तिने स्वतःला दूषित केलं असेल, पण तिच्याविरुद्ध कोणी साक्षीदार नसेल आणि ती पकडली गेली नसेल, तर असं करावं: १४  त्याच्या बायकोने स्वतःला दूषित केलेलं असो किंवा नसो, जर तिच्या नवऱ्‍याला ईर्ष्या वाटून त्याला तिच्या विश्‍वासूपणाबद्दल संशय आला, १५  तर त्याने आपल्या बायकोला याजकाकडे आणावं. त्याने तिच्यासाठी अर्पण म्हणून एक एफा जवाच्या पिठाचा दहावा भाग* आणावा. त्याने त्यावर तेल ओतू नये किंवा ऊद ठेवू नये, कारण हे ईर्ष्येचं अन्‍नार्पण, म्हणजे दोष लक्षात आणून देण्याचं अन्‍नार्पण आहे. १६  याजक तिला पुढे आणून यहोवासमोर उभं करेल.+ १७  मग तो एका मातीच्या भांड्यात स्वच्छ पाणी घेईल आणि उपासना मंडपाच्या जमिनीवरची थोडी माती त्या पाण्यात टाकेल. १८  यानंतर याजक त्या स्त्रीला यहोवापुढे उभं करून तिचे केस मोकळे करेल. मग तो दोष लक्षात आणून देण्याचं अन्‍नार्पण, म्हणजे ईर्ष्येचं अन्‍नार्पण+ तिच्या हातांवर ठेवेल आणि त्याच्या हातात शाप आणणारं कडू पाणी असेल.+ १९  यानंतर, याजक त्या स्त्रीला असं म्हणून शपथ घ्यायला लावेल: “तू आपल्या नवऱ्‍याच्या अधिकाराखाली असताना,+ जर दुसऱ्‍या कोणत्याही माणसाने तुझ्याशी शरीरसंबंध ठेवले नसतील आणि जर तुझं पाऊल वाकडं पडलं नसेल व तू दूषित झाली नसशील, तर शाप आणणाऱ्‍या या कडू पाण्याचा तुझ्यावर काहीही परिणाम होणार नाही. २०  पण जर आपल्या नवऱ्‍याच्या अधिकाराखाली असताना तुझं पाऊल वाकडं पडलं असेल आणि जर तू आपल्या नवऱ्‍याशिवाय दुसऱ्‍याशी शरीरसंबंध ठेवून स्वतःला दूषित केलं असशील . . . . ”+ २१  असं म्हणून याजक त्या स्त्रीला शाप आणणारी शपथ घ्यायला लावेल. याजक त्या स्त्रीला म्हणेल: “यहोवाने तुझी मांडी* सुकवून टाकावी* आणि तुझं पोट फुगवावं. यहोवा असं करो, की लोकांनी शाप देताना किंवा शपथ घेताना तुझं उदाहरण द्यावं. २२  शाप आणणारं हे पाणी तुझ्या आतड्यांत शिरेल, तेव्हा तुझं पोट फुगेल आणि तुझी मांडी सुकून जाईल.” यावर त्या स्त्रीने म्हणावं, “असंच घडो! असंच घडो!”* २३  मग याजक हे शाप पुस्तकात लिहील आणि त्यांना कडू पाण्यामध्ये धुवेल. २४  यानंतर तो त्या स्त्रीला, शाप आणणारं ते कडू पाणी प्यायला लावेल आणि ते पाणी तिच्या शरीरात जाऊन कडूपणा निर्माण करेल. २५  याजकाने मग तिच्या हातातून ईर्ष्येचं अन्‍नार्पण घ्यावं+ आणि ते यहोवासमोर ओवाळावं. मग, तो ते वेदीजवळ आणेल. २६  यानंतर याजक अर्पणाचं प्रतीक म्हणून, अन्‍नार्पणातलं मूठभर घेऊन ते वेदीवर जाळेल*+ आणि नंतर तो त्या स्त्रीला ते पाणी प्यायला लावेल. २७  जर तिने स्वतःला दूषित केलं असेल, आणि जर ती आपल्या नवऱ्‍याशी अविश्‍वासूपणे वागली असेल, तर ते पाणी प्यायल्यावर, शाप आणणारं ते पाणी तिच्या शरीरात जाऊन कडूपणा निर्माण करेल. यामुळे तिचं पोट फुगेल आणि तिची मांडी* सुकून जाईल* आणि तिचे लोक शाप देताना तिचं उदाहरण देतील. २८  पण, जर तिने स्वतःला दूषित केलं नसेल आणि जर ती शुद्ध असेल, तर मग तिला ही शिक्षा होणार नाही. ती गर्भवती होऊन मुलांना जन्म देऊ शकेल. २९  हा ईर्ष्येबद्दलचा नियम आहे.+ एखाद्या स्त्रीचं पाऊल वाकडं पडलं आणि तिने आपल्या नवऱ्‍याच्या अधिकाराखाली असताना स्वतःला दूषित केलं, ३०  किंवा जर एखाद्या माणसाला ईर्ष्येमुळे आपल्या बायकोच्या विश्‍वासूपणाबद्दल संशय आला, तर त्याने तिला यहोवासमोर उभं करावं आणि याजकाने या नियमात सांगितलेल्या सर्व गोष्टी तिच्या बाबतीत कराव्यात. ३१  त्या माणसाला कोणताही दोष लागणार नाही, पण त्याच्या बायकोला तिच्या अपराधाची शिक्षा मिळेल.’”

तळटीपा

किंवा “जिवामुळे.” शब्दार्थसूचीत “जीव” पाहा.
किंवा “तो जीव.”
शब्दशः “त्यांनी.”
शब्दशः “त्यांनी केलेल्या.”
एक एफाचा दहावा भाग म्हणजे २.२ ली. अति. ख१४ पाहा.
हा शब्द जननेंद्रियांना सूचित करतो.
हे कदाचित मुलांना जन्म देण्याची क्षमता गमावण्याला सूचित करत असावं.
शब्दशः “आमेन! आमेन!”
शब्दशः “जाळून धूर करेल.”
हा शब्द जननेंद्रियांना सूचित करतो.
हे कदाचित मुलांना जन्म देण्याची क्षमता गमावण्याला सूचित करत असावं.