गणना ६:१-२७

  • नाझीरपणाची शपथ (१-२१)

  • याजकांनी द्यायचा आशीर्वाद (२२-२७)

 यहोवा मोशेला पुढे म्हणाला: २  “इस्राएली लोकांना सांग, ‘एखाद्या पुरुषाने किंवा स्त्रीने यहोवासाठी नाझीर*+ म्हणून राहण्याचा खास नवस केला असेल, ३  तर त्याने द्राक्षारस किंवा इतर मद्य* पिऊ नये. त्याने द्राक्षारसाचा किंवा मद्याचा शिरका* पिऊ नये.+ त्याने द्राक्षांपासून बनवलेलं कोणतंही पेय पिऊ नये, तसंच द्राक्षं किंवा मनुकेही खाऊ नयेत. ४  जोपर्यंत तो नाझीर असेल, तोपर्यंत त्याने द्राक्षवेलावर येणाऱ्‍या कोणत्याही गोष्टीपासून, मग ती कच्ची द्राक्षं असोत किंवा त्यांच्या साली; त्यांपासून बनवलेलं काहीही खाऊ नये. ५  त्याने जितके दिवस नाझीर म्हणून राहण्याचा नवस केला असेल, तितके दिवस त्याच्या डोक्यावर वस्तरा फिरवला जाऊ नये.+ यहोवासाठी समर्पित असण्याचे त्याचे दिवस पूर्ण होईपर्यंत, त्याने पवित्र राहण्यासाठी आपल्या डोक्यावरचे केस वाढू द्यावेत. ६  जितके दिवस तो यहोवासाठी समर्पित आहे, तितके दिवस त्याने कोणत्याही मृत व्यक्‍तीच्या* जवळ जाऊ नये. ७  त्याचे आईवडील किंवा भाऊबहीण यांपैकी कोणाचाही मृत्यू झाला, तरी त्याने स्वतःला दूषित करू नये,+ कारण देवासाठी नाझीर असण्याचं चिन्ह त्याच्या डोक्यावर आहे. ८  नाझीर असण्याच्या त्याच्या संपूर्ण काळात तो यहोवासाठी पवित्र आहे. ९  पण त्याच्या बाजूला एखाद्याचा अचानक मृत्यू झाला+ आणि त्यामुळे समर्पणाचं चिन्ह असलेले त्या नाझीराचे केस* दूषित झाले, तर त्याने सातव्या दिवशी, म्हणजे त्याला शुद्ध ठरवण्याच्या दिवशी आपल्या डोक्यावरचे केस काढावेत.+ १०  मग आठव्या दिवशी, त्याने दोन पारवे किंवा कबुतराची दोन पिल्लं भेटमंडपाच्या प्रवेशाजवळ याजकाकडे आणावी. ११  याजक त्या पक्ष्यांपैकी एक पापार्पण म्हणून, तर दुसरा होमार्पण म्हणून अर्पण करेल. अशा प्रकारे मृत व्यक्‍तीचा* स्पर्श झाल्यामुळे घडलेल्या पापाबद्दल, याजक त्या माणसासाठी प्रायश्‍चित्त करेल.+ मग त्या नाझीराने स्वतःला* पवित्र करावं. १२  यानंतर, त्याने यहोवासाठी आपले नाझीरपणाचे दिवस पुन्हा सुरू करावेत आणि दोषार्पण म्हणून एक वर्षाचा एक मेंढा आणावा. त्याने आपलं नाझीरपण दूषित केल्यामुळे, त्याच्या नाझीरपणाचे जुने दिवस मोजले जाणार नाहीत. १३  हा नाझीरासाठी असलेला नियम आहे: जेव्हा त्याच्या नाझीरपणाचे दिवस पूर्ण होतील,+ तेव्हा त्याला भेटमंडपाच्या प्रवेशाजवळ आणलं जाईल. १४  त्याने यहोवाला तिथे ही अर्पणं द्यावीत: होमार्पण+ म्हणून कोणताही दोष नसलेला एक वर्षाचा मेंढा, पापार्पण+ म्हणून कोणताही दोष नसलेली एक वर्षाची मेंढी, शांती-अर्पण+ म्हणून कोणताही दोष नसलेला एक मेंढा, १५  तेलात मळलेल्या चांगल्या पिठाच्या बेखमीर* भाकरी व तेल लावलेल्या बेखमीर पापड्या असलेली टोपली, तसंच त्यांचं अन्‍नार्पण+ व पेयार्पणं.+ १६  याजक या गोष्टी यहोवासमोर आणेल आणि नाझीराचं पापार्पण आणि होमार्पण म्हणून त्या अर्पण करेल. १७  याजक शांती-अर्पण म्हणून मेंढा आणि त्यासोबत बेखमीर भाकरींची टोपली यहोवाला अर्पण करेल. तसंच, त्याच्यासोबत तो अन्‍नार्पण+ आणि पेयार्पणही देईल. १८  मग नाझीराने नाझीरपणात आपल्या डोक्यावर वाढवलेले केस,+ भेटमंडपाच्या प्रवेशाजवळ काढावेत आणि ते शांती-अर्पणाच्या खाली असलेल्या आगीवर टाकावेत. १९  नाझीराने आपल्या नाझीरपणाचं चिन्ह डोक्यावरून काढून टाकल्यावर, याजकाने मेंढ्याचा उकळलेला+ खांद्याचा भाग, टोपलीतली एक बेखमीर भाकर व एक बेखमीर पापडी घ्यावी आणि हे सर्व नाझीराच्या हातांवर ठेवावं. २०  मग याजकाने ते यहोवासमोर ओवाळण्याचं अर्पण म्हणून ओवाळावं.+ दान म्हणून देण्यात आलेला पाय आणि ओवाळण्याच्या अर्पणातल्या छातीच्या भागासोबतच, हे अर्पणही याजकासाठी पवित्र आहे.+ यानंतर नाझीर द्राक्षारस पिऊ शकतो. २१  नवस करणाऱ्‍या नाझीराबद्दल हा नियम आहे:+ नाझीरांसाठी सांगण्यात आलेल्या आवश्‍यक गोष्टींशिवाय यहोवाला आणखी काही अर्पण करण्याची नाझीराची ऐपत असली, आणि त्याने तसा नवस केला, तर त्याने आपल्या नाझीरपणाच्या नियमाचा आदर करून आपला नवस फेडावा.’” २२  मग यहोवा मोशेला म्हणाला: २३  “अहरोन आणि त्याच्या मुलांना सांग, ‘इस्राएलच्या लोकांना आशीर्वाद देताना असं म्हणा:+ २४  “यहोवा तुम्हाला आशीर्वाद देवो+ आणि तुमचं रक्षण करो. २५  यहोवा आपल्या चेहऱ्‍याचा प्रकाश तुमच्यावर पाडो+ आणि तुमच्यावर कृपा करो. २६  यहोवा आपला चेहरा तुमच्याकडे करो आणि तुम्हाला शांती देवो.”’+ २७  याजकांनी माझ्या नावाने आशीर्वाद द्यावा,+ म्हणजे मी इस्राएली लोकांना आशीर्वाद देईन.”+

तळटीपा

हिब्रू भाषेत नाझीर, म्हणजे “निवडलेला, समर्पित केलेला; वेगळा केलेला.”
किंवा “कोणत्याही प्रकारची दारू.”
एक आंबट द्रव. इंग्रजीत विनेगर.
किंवा “जिवाच्या.” शब्दार्थसूचीत “जीव” पाहा.
किंवा “नाझीरपणाचं डोकं.”
किंवा “जिवाचा.” शब्दार्थसूचीत “जीव” पाहा.
शब्दशः “आपलं डोकं.” म्हणजे त्याने पुन्हा आपले केस वाढवावे.