गणना ९:१-२३

  • वल्हांडणाचा सण उशिरा साजरा करण्याची तरतूद (१-१४)

  • उपासना मंडपावर ढग आणि आग (१५-२३)

 इस्राएली लोक इजिप्तमधून बाहेर आल्यावर, दुसऱ्‍या वर्षाच्या पहिल्या महिन्यात,+ सीनायच्या ओसाड रानात यहोवा मोशेला म्हणाला: २  “इस्राएलच्या लोकांनी ठरलेल्या वेळी+ वल्हांडणाचं बलिदान तयार करावं.+ ३  या महिन्याच्या १४ व्या दिवशी संध्याकाळी,* तुम्ही ठरलेल्या वेळी वल्हांडणाचं बलिदान तयार करावं. त्याच्या सर्व नियमांप्रमाणे आणि ठरवून दिलेल्या विधींप्रमाणे तुम्ही ते तयार करावं.”+ ४  तेव्हा मोशेने इस्राएली लोकांना वल्हांडणाचं बलिदान तयार करायला सांगितलं. ५  मग इस्राएली लोकांनी सीनायच्या ओसाड रानात, पहिल्या महिन्याच्या १४ व्या दिवशी संध्याकाळी,* वल्हांडणाचं बलिदान तयार केलं. यहोवाने मोशेला दिलेल्या सर्व आज्ञांप्रमाणे त्यांनी ते केलं. ६  पण काही पुरुष एका मृतदेहाला स्पर्श केल्यामुळे अशुद्ध झाले होते+ आणि त्यामुळे ते त्या दिवशी वल्हांडणाचं बलिदान तयार करू शकले नाहीत. म्हणून ते लोक त्या दिवशी मोशे आणि अहरोनकडे आले.+ ७  ते मोशेला म्हणाले: “मृतदेहाला स्पर्श केल्यामुळे आम्ही अशुद्ध झालो आहोत. पण त्यामुळे आम्हाला इतर इस्राएली लोकांसोबत, ठरलेल्या वेळी यहोवासाठी अर्पण आणण्याची मनाई का केली जावी?”+ ८  यावर मोशे त्यांना म्हणाला: “तुम्ही इथेच थांबा. तुमच्याबद्दल यहोवाला काय म्हणायचंय ते मी बघतो.”+ ९  तेव्हा यहोवा मोशेला म्हणाला: १०  “इस्राएली लोकांना सांग, ‘तुमच्यापैकी किंवा तुमच्या येणाऱ्‍या पिढ्यांपैकी कोणताही माणूस, मृतदेहाला स्पर्श केल्यामुळे अशुद्ध झाला असला,+ किंवा दूरच्या प्रवासाला गेला असला, तरीही त्याने यहोवासाठी वल्हांडणाचं बलिदान तयार करावं. ११  त्यांनी ते दुसऱ्‍या महिन्याच्या+ १४ व्या दिवशी संध्याकाळी* तयार करावं आणि कडू हिरव्या भाज्या व बेखमीर* भाकरींसोबत खावं.+ १२  दुसऱ्‍या दिवशी सकाळपर्यंत त्यातलं काहीही राहू देऊ नये+ आणि त्यातलं एकही हाड मोडू नये.+ वल्हांडणाच्या प्रत्येक नियमाप्रमाणे त्यांनी ते बलिदान तयार करावं. १३  पण जर एखादा माणूस शुद्ध असला किंवा तो प्रवासाला गेलेला नसला आणि तरीही त्याने वल्हांडणाचं बलिदान तयार करण्याचं टाळलं, तर त्या माणसाला* ठार मारलं जावं;+ कारण त्याने ठरलेल्या वेळी यहोवाला अर्पण दिलं नाही. त्या माणसाला त्याच्या पापाची शिक्षा मिळेल. १४  जर तुमच्यामध्ये एखादा विदेशी राहत असेल, तर त्यानेही यहोवासाठी वल्हांडणाचं बलिदान तयार करावं.+ त्याने वल्हांडणाच्या नियमाप्रमाणे आणि ठरवून दिलेल्या विधीप्रमाणे ते तयार करावं.+ देशाचा रहिवासी आणि विदेशी या दोघांसाठी तुमच्यामध्ये एकच नियम असावा.’”+ १५  मग ज्या दिवशी उपासना मंडप उभा करण्यात आला,+ त्या दिवशी उपासना मंडपावर, म्हणजेच साक्षपेटीच्या मंडपावर ढग येऊन थांबला. पण संध्याकाळी आगीसारखं काहीतरी त्यावर दिसलं आणि सकाळपर्यंत ते तसंच राहिलं.+ १६  दररोज असंच व्हायचं: दिवसा ढग उपासना मंडपावर थांबायचा आणि रात्री त्यावर आगीसारखं काहीतरी दिसायचं.+ १७  जेव्हा जेव्हा ढग मंडपावरून वर जायचा, तेव्हा तेव्हा इस्राएली लोक लगेच तळ हलवायचे+ आणि जिथे तो ढग थांबायचा तिथे ते छावणी करायचे.+ १८  यहोवाच्या आज्ञेप्रमाणे इस्राएली लोक निघायचे आणि यहोवाच्या आज्ञेप्रमाणेच ते छावणी करायचे.+ जोपर्यंत ढग उपासना मंडपावर राहायचा, तोपर्यंत ते छावणी करायचे. १९  जर एखाद्या ठिकाणी ढग बरेच दिवस उपासना मंडपावर राहिला, तर इस्राएली लोक यहोवाच्या आज्ञेप्रमाणे तिथेच राहायचे.+ २०  कधीकधी ढग उपासना मंडपावर थोडेच दिवस राहायचा. इस्राएली लोक यहोवाच्या आज्ञेप्रमाणे छावणी करायचे आणि यहोवाच्या आज्ञेप्रमाणेच तळ हलवायचे. २१  कधीकधी तर ढग फक्‍त संध्याकाळपासून सकाळपर्यंत उपासना मंडपावर राहायचा. पण जेव्हा सकाळी तो वर जायचा, तेव्हा इस्राएली लोक तळ हलवायचे. दिवस असो किंवा रात्र, जेव्हा जेव्हा ढग वर जायचा, तेव्हा तेव्हा ते तळ हलवायचे.+ २२  दोन दिवस असोत किंवा एक महिना, किंवा त्यापेक्षा जास्त काळ असो, जोपर्यंत ढग उपासना मंडपावर राहायचा, तोपर्यंत इस्राएली लोक छावणी करायचे आणि पुढे जायचे नाहीत. पण तो वर गेला, की ते तळ हलवायचे. २३  यहोवाच्या आज्ञेप्रमाणे ते छावणी करायचे आणि यहोवाच्या आज्ञेप्रमाणेच ते पुढे निघायचे. यहोवाने मोशेला सांगितल्याप्रमाणे, ते यहोवाचे नियम पाळायचे.

तळटीपा

किंवा “संधिप्रकाशाच्या वेळी.” शब्दशः “दोन संध्याकाळींच्या मधे.”
किंवा “संधिप्रकाशाच्या वेळी.” शब्दशः “दोन संध्याकाळींच्या मधे.”
किंवा “संधिप्रकाशाच्या वेळी.” शब्दशः “दोन संध्याकाळींच्या मधे.”
किंवा “जिवाला.”