गलतीकर यांना पत्र ४:१-३१

  • यापुढे दास नाही, तर मुलं (१-७)

  • गलतीकरांबद्दल पौलची काळजी (८-२०)

  • हागार आणि सारा: दोन करार (२१-३१)

    • वरची यरुशलेम, आपली आई, स्वतंत्र आहे (२६)

 आता मी म्हणतो, की वारस सर्व गोष्टींचा मालक असला, तरी तो लहान असेपर्यंत त्याच्यामध्ये आणि दासामध्ये कोणताही फरक नसतो. २  कारण त्याच्या वडिलांनी आधीच ठरवलेल्या दिवसापर्यंत तो देखरेख करणाऱ्‍यांच्या आणि कारभाऱ्‍यांच्या अधीन असतो. ३  त्याच प्रकारे आपणही लहान होतो, तेव्हा जगाच्या विचारसरणीचे* दास होतो.+ ४  पण ठरवलेली वेळ पूर्ण झाल्यावर देवाने आपल्या मुलाला पाठवलं. तो एका स्त्रीच्या पोटी जन्माला आला+ आणि नियमशास्त्राच्या अधीन होता.+ ५  देवाने त्याला यासाठी पाठवलं, की त्याने नियमशास्त्राच्या अधीन असलेल्यांना विकत घेऊन त्यांची सुटका करावी+ आणि अशा रितीने आपल्याला मुलं म्हणून दत्तक घ्यावं.+ ६  आता तुम्ही मुलं असल्यामुळे देवाने त्याच्या मुलाला देण्यात आलेली पवित्र शक्‍ती* आपल्या मनात+ पाठवली आहे,+ आणि ती “अब्बा,* बापा!” अशी हाक मारते.+ ७  त्यामुळे, आता तुमच्यापैकी प्रत्येक जण दास नाही, तर मुलगा आहे; आणि जर मुलगा आहे, तर देवाने तुम्हा प्रत्येकाला वारसही केलं आहे.+ ८  पण जेव्हा तुम्हाला देवाची ओळख नव्हती, तेव्हा जे खऱ्‍या अर्थाने देव नाहीत अशांचे तुम्ही दास होता. ९  आता मात्र तुम्हाला देवाची ओळख झाली आहे; खरंतर, देवानेच तुमची ओळख करून घेतली आहे. तर मग, तुम्ही पुन्हा पूर्वीच्या त्या निरर्थक+ आणि तुच्छ अशा जगाच्या विचारसरणीकडे वळून तिचे दास व्हायचा प्रयत्न का करता?+ १०  तुम्ही दिवस, महिने, ऋतू आणि वर्षं अगदी काटेकोरपणे पाळता.+ ११  मला तर अशी भीती वाटते, की तुमच्यासाठी मी केलेली सगळी मेहनत वाया गेली आहे. १२  बांधवांनो, मी तुम्हाला विनंती करतो, की तुम्ही माझ्यासारखे व्हा. कारण एकेकाळी मीसुद्धा तुमच्यासारखाच होतो.+ तुम्ही माझं काहीच वाईट केलं नाही. १३  कारण तुम्हाला माहीत आहे, की माझ्या आजारामुळेच मला पहिल्यांदा तुम्हाला आनंदाचा संदेश घोषित करायची संधी मिळाली होती. १४  आणि माझं ते आजारपण तुमच्यासाठी एक परीक्षा असली, तरी तुम्ही मला तुच्छ लेखलं नाही किंवा माझा द्वेष केला नाही.* तर एखाद्या स्वर्गदूतासारखा, खरंतर ख्रिस्त येशूसारखा तुम्ही माझा स्वीकार केला. १५  मग आता कुठे गेला तुमचा तो आनंद? कारण, तुमच्याबद्दल मी साक्ष देऊन सांगतो, की शक्य असतं तर तुम्ही स्वतःचे डोळे उपटून मला दिले असते.+ १६  तर मग, आता खरं बोलत असल्यामुळे मी तुमचा शत्रू बनलो आहे का? १७  ते तुमची मनं जिंकायला खूप उत्सुक असले, तरी त्यांचा हेतू चांगला नाही. तुम्ही खूप उत्सुकतेने त्यांच्या मागे जावं म्हणून ते तुम्हाला माझ्यापासून दूर करायचा प्रयत्न करतात. १८  कोणी चांगल्या हेतूने तुमची मनं जिंकण्याचा प्रयत्न करत असेल, तर ती चांगलीच गोष्ट आहे आणि फक्‍त मी तुमच्यामध्ये असतानाच नाही, तर तुमच्यापासून दूर असतानाही त्यांनी असं करावं. १९  माझ्या प्रिय मुलांनो,+ जोपर्यंत ख्रिस्त तुमच्यामध्ये आकार घेत नाही* तोपर्यंत मला पुन्हा तुमच्यासाठी प्रसूतीच्या वेदना सोसाव्या लागतील. २०  या क्षणी, मी तुमच्यामध्ये असतो आणि तुमच्याशी वेगळ्या पद्धतीने बोलू शकलो असतो, तर किती बरं झालं असतं! कारण तुमच्या बाबतीत मी गोंधळात पडलो आहे. २१  तुम्हाला नियमशास्त्राच्या अधीन राहायची इच्छा आहे ना? मग मला एक गोष्ट सांगा. नियमशास्त्र काय म्हणतं ते तुम्ही ऐकलं नाही का? २२  उदाहरणार्थ, असं लिहिलं आहे, की अब्राहामला दोन मुलं होती; एक दासीकडून झालेला+ आणि एक स्वतंत्र स्त्रीकडून.+ २३  पण, दासीकडून झालेल्या मुलाचा जन्म नैसर्गिक रितीने,*+ तर स्वतंत्र स्त्रीकडून झालेल्या मुलाचा जन्म एका अभिवचनाद्वारे झाला होता.+ २४  या गोष्टींमध्ये एक लाक्षणिक अर्थ दडलेला आहे. कारण, या दोन स्त्रिया म्हणजे दोन करार. त्यांपैकी एक सीनाय पर्वतावर केलेला करार आहे+ आणि तो दास होण्यासाठी मुलांना जन्म देतो, अर्थात हागार. २५  आता हागार म्हणजे सीनाय.+ तो अरबस्तानातला एक पर्वत आहे. आणि ती आजच्या यरुशलेमला सूचित करते, कारण ती आपल्या मुलांसोबत दास्यात आहे. २६  पण वरची यरुशलेम मात्र स्वतंत्र आहे आणि ती आपली आई आहे. २७  कारण असं लिहिलं आहे: “जी मुलांना जन्म देऊ शकत नाही त्या वांझ स्त्रीने आनंदी व्हावं; जिला प्रसूतीच्या वेदना होत नाहीत तिने आनंदाने जयजयकार करावा. कारण, जिला नवरा आहे तिच्यापेक्षा, सोडून दिलेल्या स्त्रीची मुलं जास्त आहेत.”+ २८  आता बांधवांनो, इसहाकप्रमाणेच तुम्हीसुद्धा अभिवचनाची मुलं आहात.+ २९  पण नैसर्गिक रितीने* जन्मलेल्या मुलाने जसा त्या वेळी, पवित्र शक्‍तीच्या सामर्थ्याने जन्मलेल्या मुलाचा छळ केला होता,+ तसाच आताही होत आहे.+ ३०  पण शास्त्रवचन काय म्हणतं? “त्या दासीला आणि तिच्या मुलाला हाकलून दे, कारण स्वतंत्र स्त्रीच्या मुलासोबत दासीचा मुलगा मुळीच वारस होणार नाही.”+ ३१  तर मग बांधवांनो, आपण दासीची नाही, तर स्वतंत्र स्त्रीची मुलं आहोत.

तळटीपा

किंवा “प्राथमिक गोष्टींचे.”
हा ‘वडील’ या अर्थाचा हिब्रू किंवा ॲरामेईक (अरामी) भाषेतला शब्द आहे. सहसा मुलं आपल्या वडिलांना संबोधण्यासाठी हा शब्द वापरतात.
किंवा “माझ्यावर थुंकला नाहीत.”
किंवा “तयार होत नाही.”
शब्दशः “शरीरानुसार.”
शब्दशः “शरीरानुसार.”