गलतीकर यांना पत्र ६:१-१८

  • एकमेकांची ओझी वाहा (१-१०)

    • जे पेरलं जातं, त्याचीच कापणी केली जाते (७, ८)

  • सुंता करण्याला काहीच महत्त्व नाही (११-१६)

    • नवीन सृष्टी (१५)

  • समारोप (१७, १८)

 बांधवांनो, एखाद्या माणसाने नकळत एखादं चुकीचं पाऊल उचललं, तर ज्यांच्याकडे देवाने ठरवलेल्या पात्रता आहेत, ते तुम्ही अशा माणसाची चूक सौम्यतेने सुधारण्याचा प्रयत्न करा.+ पण, तुम्हीही मोहात पडू नये+ म्हणून स्वतःकडे लक्ष द्या.+ २  एकमेकांची ओझी वाहत राहा.+ अशा रितीने तुम्ही ख्रिस्ताचा नियम पूर्ण कराल.+ ३  कारण, काहीही नसताना जर आपण काहीतरी आहोत असा कोणी विचार करत असेल,+ तर तो स्वतःलाच फसवत आहे. ४  पण, प्रत्येकाने आपापल्या कामांचं परीक्षण करावं,+ म्हणजे मग दुसऱ्‍या कोणाशी तुलना केल्यामुळे नाही,+ तर स्वतःच्या कामांमुळे त्याला आनंदी होता येईल. ५  कारण प्रत्येक जण स्वतःचा भार* वाहील.+ ६  तसंच, ज्याला देवाच्या वचनाचं शिक्षण दिलं* जात आहे, त्याने हे शिक्षण* देणाऱ्‍याला सगळ्या चांगल्या गोष्टींत आपल्यासोबत सहभागी करून घ्यावं.+ ७  फसू नका: देवाची थट्टा केली जाऊ शकत नाही. कारण एखादा माणूस जे काही पेरतो, त्याचीच तो कापणीही करेल.+ ८  जो शरीरासाठी पेरणी करतो, तो आपल्या शरीरापासून नाशाच्या पिकाची कापणी करेल. पण, जो पवित्र शक्‍तीसाठी* पेरणी करतो, तो पवित्र शक्‍तीपासून सर्वकाळाच्या जीवनाची कापणी करेल.+ ९  म्हणून, आपण हिंमत हारून चांगलं ते करत राहायचं सोडू नये. कारण जर आपण खचून गेलो नाही,* तर योग्य वेळी आपल्या पदरी पीक पडेल.+ १०  म्हणून, संधी* आहे तोपर्यंत आपण सगळ्यांचं आणि खासकरून विश्‍वासात असलेल्या आपल्या भाऊबहिणींचं भलं करू या. ११  पाहा! मी किती मोठ्या अक्षरांत स्वतःच्या हाताने तुम्हाला पत्र लिहिलं आहे. १२  जे शरीराच्या बाबतीत इतरांवर छाप पाडायचा प्रयत्न करतात,* तेच तुम्हाला सुंता करायला भाग पाडत आहेत. ख्रिस्ताच्या वधस्तंभासाठी* त्यांचा छळ होऊ नये फक्‍त एवढ्यासाठी ते असं करतात. १३  कारण जे सुंता करतात ते स्वतःसुद्धा नियमशास्त्राचं पालन करत नाहीत.+ पण, तुमच्या शरीराबद्दल बढाई मारायचं निमित्त मिळावं, म्हणून तुमची सुंता व्हावी असं त्यांना वाटतं. १४  पण मला तर आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या वधस्तंभाशिवाय* दुसऱ्‍या कशाचीही बढाई मारायची इच्छा नाही.+ त्याच्याद्वारे जग माझ्यासाठी मेलं* आहे आणि मी जगासाठी मेलो आहे. १५  कारण सुंता करण्याला किंवा न करण्याला काही महत्त्व नाही,+ तर नवीन सृष्टीला महत्त्व आहे.+ १६  जे या नियमाप्रमाणे सुव्यवस्थितपणे चालतात त्या सगळ्यांवर, अर्थात देवाच्या इस्राएलवर शांती आणि दया असो.+ १७  यापुढे कोणी मला त्रास देऊ नये; कारण माझ्या शरीरावर, येशूचा दास अशी माझी ओळख करून देणाऱ्‍या खुणा आहेत.+ १८  बांधवांनो, तुम्ही दाखवत असलेल्या चांगल्या मनोवृत्तीमुळे आपला प्रभू येशू ख्रिस्त याची अपार कृपा तुमच्यावर असो. आमेन.

तळटीपा

किंवा “जबाबदारीचा भार.”
किंवा “तोंडी शिकवलं.”
किंवा “तोंडी शिक्षण.”
किंवा “थकलो नाही.”
शब्दशः “ठरवलेली वेळ.”
किंवा “ज्यांना बाहेरून चांगलं दिसायचं आहे.”
किंवा “जगाला वधस्तंभावर खिळून मृत्युदंड देण्यात आला.”