गीतरत्न १:१-१७
१ शलमोनने रचलेलं अप्रतिम* गीत:+
२ “आपल्या ओठांनी माझं चुंबन घे,कारण तुझं प्रेम द्राक्षारसाहून गोड आहे.+
३ तुझ्या अत्तरांचा सुगंध मोहक आहे.+
तुझं नाव, डोक्यावर ओतलेल्या सुगंधी तेलासारखं आहे.+
म्हणूनच सगळ्या मुली तुझ्यावर भाळल्या आहेत.
४ राजाने मला त्याच्या आतल्या खोल्यांमध्ये आणलंय!
मला तुझ्यासोबत घेऊन चल;* आपण पळून जाऊ.
आपण आनंदी होऊन एकमेकांत रमून जाऊ.
आपण तुझ्या प्रेमाची प्रशंसा करू;* ते द्राक्षारसाहून गोड आहे.
त्या* काही उगीच तुझ्यावर भाळल्या नाहीत.
५ यरुशलेमच्या मुलींनो, मी काळीसावळी* असले तरी सुंदर आहे.
केदारच्या तंबूंसारखी,+ शलमोनच्या तंबूंसारखी+ मी आहे.
६ माझा रंग सावळा आहे म्हणून माझ्याकडे अशा एकटक पाहू नका,कारण माझी त्वचा उन्हाने काळवंडली आहे.
माझे भाऊ माझ्यावर रागावले होते,त्यांनी मला द्राक्षमळ्यांची राखण करायला सांगितलं.
पण माझ्या स्वतःच्या द्राक्षमळ्याची मी काळजी घेतली नाही.
७ माझ्या प्राणसख्या, मला सांग,तुझ्या कळपांना तू कुठे चरायला नेतोस?+
दुपारी तू त्यांना कुठे बसवतोस?
तुझ्या मित्रांच्या कळपांमध्ये,मी स्वतःला ओढणीने* झाकणाऱ्या स्त्रीसारखी का फिरू?”
८ “हे सर्वात सुंदर मुली, तुला माहीत नसेल,तर कळपाच्या पाऊलखुणांमागे जा
आणि आपल्या बकऱ्यांना मेंढपाळांच्या तंबूंजवळ चरायला ने.”
९ “माझ्या प्रिये, फारोच्या रथांना जुंपलेल्या एका* डौलदार घोडीसारखी तू सुंदर दिसतेस.+
१० दागिन्यांनी* तुझे गाल,आणि मण्यांच्या माळांनी तुझा गळा, किती सुरेख दिसतो.
११ आपण तुझ्यासाठी सोन्याचांदीचे दागिने बनवू.”
१२ “राजा आपल्या मेजाजवळ बसला असताना,माझ्या अत्तराचा*+ सुगंध दरवळतो.
१३ माझा सखा, रात्री माझ्या उराजवळ असलेल्या
गंधरसाच्या+ बटव्यासारखा आहे.
१४ माझा सखा, एन-गेदीच्या+ द्राक्षमळ्यांतल्या
मेंदीच्या फुलांच्या गुच्छासारखा आहे.”+
१५ “माझ्या प्रिये, तू सुंदर आहेस!
खरंच, तू सुंदर आहेस! तुझे डोळे कबुतरांच्या डोळ्यांसारखे आहेत.”+
१६ “माझ्या सख्या, तू देखणा आणि मोहक आहेस.+
ही हिरवळच आपला पलंग आहे.
१७ हे देवदाराचे वृक्ष म्हणजे आपल्या घराचे* खांब
आणि ही गंधसरूची झाडं आपलं छत आहे.
तळटीपा
^ किंवा “उत्कृष्ट.”
^ शब्दशः “मला आपल्यामागे ओढून घे.”
^ किंवा “वर्णन करू.”
^ म्हणजे, तरुण मुली.
^ शब्दशः “काळी.”
^ किंवा “शोकाच्या ओढणीने.”
^ किंवा “माझ्या.”
^ किंवा कदाचित, “गुंफलेल्या केसांमध्ये.”
^ शब्दशः “जटामांसी.”
^ किंवा “महालाचे.”